प्राजक्ता चिटणीसकामगारांच्या मिल बंद पडल्यानंतर त्यांची कुटुंब कशाप्रकारे उद्ध्वस्त झाली हे आपल्याला लालबाग परळ या चित्रपटात पाहायला मिळाले होते. याच प्रकारे शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोलच्या भावाने विकल्या गेल्याने त्यांच्या कुटुंबाची दशा काय झाली हे मुळशी पॅटर्न या चित्रपटात मांडण्यात आले आहे.
सखाराम (मोहन जोशी) गावचे पाटील असतात. त्यांची खूप शेत जमीन असते, ती जमीन विकून त्यांना चांगला पैसा देखील मिळतो. पण हा पैसा ते खर्च करून टाकतात आणि सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करण्याची त्यांची वेळ येते. पण तिथे गावच्या सरपंचाकडून त्यांचा अपमान केला जातो आणि त्यांना नोकरी वरून काढून टाकण्यात येते. त्यांनतर ते मार्केट यार्डात हमालीचे काम करू लागतात. तिथे त्यांचा मुलगा राहुल (ओम भूतकर) त्यांच्या सोबत काम करत असतो. त्या मार्केटमधील एका व्यापाऱ्यासोबत त्याचा वाद होतो आणि राहुल त्या व्यापाऱ्याचा खून करतो आणि अशा प्रकारे तो गुन्हेगारी विश्वाकडे वळला जातो. तिथे त्याची भेट नन्या भाई (प्रवीण तरडे) सोबत होते. तो एक मोठा भाई असतो. त्याच्या हाताखाली काम करत राहुल देखील एक मोठा भाई बनतो. राहुल या वाईट मार्गाकडे वळल्यानंतर त्याच्या आयुष्यात पुढे काय होते. तो गुन्हेगारी विश्वातून बाहेर पडतो का या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळतील.
खरे तर या चित्रपटाच्या कथेत काहीच नावीन्य नाही. अशा प्रकारची कथा आपण वास्तव, सत्या, लालबाग परळ यांसारख्या अनेक चित्रपटात पहिली आहे. पण एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते एक अट्टल गुन्हेगार हा राहुलचा प्रवास दिग्दर्शकाने चित्रपटात खूप चांगल्या प्रकारे मांडला आहे. चित्रपटाच्या पहिल्या दृश्यपासून आता चित्रपटात पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहते. चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा खूप चांगल्या प्रकारे रेखाटण्यात आल्या आहेत. त्यामुळे सगळ्याच व्यक्तिरेखा तितक्याच चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. चित्रपटात मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, मालविका गायकवाड, सविता मालपेकर, सुरेश विश्वकर्मा, क्षितिज दाते, सुनील अभ्यंकर यांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. ओम भूतकरने तर राहुल ही भूमिका खूपच चांगल्याप्रकारे रंगवली आहे.
उपेंद्र लिमये आणि ओम भूतकर यांचे एकत्र असलेली दृश्य मस्त जमून आली आहेत. चित्रपटाचे संवाद प्रेक्षकांच्या टाळ्या घेणार यात काहीच शंका नाही. पोलिसांची मानसिक अवस्था, आपली न्यायनव्यवस्था, गुन्हेगारी विश्वातील टोळी युद्ध या गोष्टींवर खूप चांगल्याप्रकारे प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. केवळ चित्रपट खूप मोठा असल्याने काहीसा कंटाळवाणा होतो. तसेच चित्रपटाचा शेवट रुचत नाही. अनेक जण रस्त्यावर तलवारी घेऊन फिरतात पण त्यांना पोलीस थांबवत नाहीत या गोष्टी अतिशयोक्तीच्या वाटतात. चित्रपट सुरुवातीपासून प्रेक्षकांना खिळवून ठेवतो पण शेवट नक्कीच निराशा करतो.