प्राजक्ता चिटणीस
मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील गौरी आणि गौतम हे आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे असल्यामुळे हे दोघे त्यांना आपलेसे वाटतात. याच गौरी आणि गौतमच्या आयुष्यातील लग्नानंतरचा पुढचा प्रवास म्हणजे मुंबई पुणे मुंबई 3. आजची पिढी ही करियरच्या मागे धावत आहे. त्यामुळे त्यांना लग्नानंतर लगेचच मूल नकोय. लग्नाला तीन-चार वर्ष झाल्यानंतरही मुलांचा विचार करायला ही पिढी घाबरतेय. पण या सगळ्यामुळे भविष्यात त्यांना कोणत्या समस्येचा सामना करावा लागणार हेच त्यांना कळत नाहीये. आजच्या पिढीचा हा महत्त्वाचा प्रश्न सतीश राजवाडे यांनी मुंबई पुणे मुंबई 3 मध्ये मांडला आहे.
गौरी (मुक्ता बर्वे) आणि गौतम (स्वप्निल जोशी) यांच्या लग्नाला तीन वर्ष झाले आहेत. आपल्या आयुष्यात ते दोघे खूप खुश आहेत. घर, करिअर अशा दोन्ही गोष्टी ते खूप चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत. गौतमचे आई (मंगला केंकरे) वडील (प्रशांत दामले) त्यांच्या अगदी जवळ राहत असून त्यांचे एक सुखी कुटुंब आहे. लग्नाला तीन वर्ष झाली असली त्या दोघांनी अजून मुलाचा विचार केलेला नाहीये. पण गौरी गरोदर असल्याचे अचानक त्या दोघांना कळते. मुलाला जन्म द्यायला आम्ही तयार नाही असे त्यांचे स्पष्ट मत असते. पण एका क्षणाला ते त्यांचा निर्णय बदलतात. त्यांनतर त्यांचे आयुष्य कसे बदलते. त्यांच्या या नव्या जबाबदारीला ते कसे स्वीकारतात, त्यांचा आई बाबा होण्याचा हा प्रवास मुंबई पुणे मुंबई 3 चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतो.
मुंबई पुणे मुंबईची कथा ही नवीन नसली तरी ती खूप चांगल्याप्रकारे मांडण्यात आली आहे. चित्रपटाच्या पहिल्या दृश्यपासून आपण नकळत या कथेत गुंतले जातो. मध्यंतरपर्यंत चित्रपटात अनेक गोष्टी घडतात. पण मध्यंतरानंतर चित्रपट काहीसा संथ वाटतो. चित्रपट ताणला जात आहे असे वाटत असतानाच चित्रपटाचा शेवट पुन्हा एकदा आपल्याला खिळवून ठेवतो. चित्रपटात स्वप्निल, मुक्ता या दोघांनीही अफलातून काम केले आहे. दोघांची केमिस्ट्री तर लाजवाब. प्रशांत दामले यांचे काम पण मस्त झाले आहे. रोहिणी हट्टंगडी, सुहास जोशी, विजय केंकरे, मंगला केंकरे या सगळ्यांनीच आपली भूमिका चोख पार पडली आहे. सजनी आणि कोणी येणार ही गाणी ओठावर चांगलीच रुळतात आणि चेरी ऑफ द केक म्हणजे प्रशांत दामले यांनी गायलेली गाणी. ही गाणी विशेष रंगत आणतात. तसेच गौरी आणि गौतमच्या होणाऱ्या बाळाचे चित्रपटात मध्ये मध्ये दाखवलेले मनोगत ऐकायला मस्त वाटते. गौतमच्या आई वडिलांना त्यांची गुड न्यूज कळल्यानंतर त्यांची जमून आलेली गाण्याची मैफिल, गौतमने बाळाच्या जबाबदारीसाठी तयार व्हावे यासाठी त्याचे वडील त्याला समजवतात ही दृश्य मस्त जमून आलेली आहेत. चित्रपटाचे संवाद तर प्रेक्षकांच्या टाळ्या घेणार यात काही शंकाच नाही. आजच्या पिढीची करियर आणि नाते सांभाळताना होत असलेली फरपट, त्यांनी मनस्थिती चित्रपटात चांगल्या प्रकारे मांडण्यात आलेली आहे. मुंबई पुणे मुंबईचा हा प्रवास करायला काहीच हरकत नाही.