जान्हवी सामंत‘नाम शबाना’ हा चित्रपट कसा आहे, मनोरंजक की कंटाळवाणा? हे सांगणं खरं तर मुश्कीलच म्हणावं लागेल. कारण चित्रपटाची कथा पूर्णत: गुंतागुंतीची असल्याने, प्रेक्षकांच्या मनात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘बेबी’ या चित्रपटाचा प्रीक्वेल म्हणून उत्साहाने सिनेमागृहात जाणाºया प्रेक्षकांचा हिरमोड होणे स्वाभाविक आहे. शिवाय चित्रपटाच्या कथानकात तर्क आणि विचारांचा दुरान्वये संबंध नसल्याचे दिसून येत असल्यानेही प्रेक्षकांचा रसभंग होऊ शकतो. वास्तविक ‘नाम शबाना’ या चित्रपटाची कथा ‘शबाना खान’ या पात्राच्या अवतीभोवती फिरते. शबाना एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी असते. मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेणारी शबाना तिच्या करिअरविषयी खूपच गंभीर आणि ध्यान केंद्रित असते. तिला बॉयफ्रेण्डही असतो. एका दुर्दैवी घटनेत तिचा सामना काही गुंडांशी होतो, ज्यात तिच्या बॉयफ्रेण्डची हत्त्या केली जाते. येथूनच कथेला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला गेला. आपल्या बॉयफ्रेण्डच्या हत्त्येचा प्रतिशोध घेण्यासाठी शबानाची धडपड सुरू असते. अशातच तिला एका सिक्रेट एजन्सीकडून फोन कॉल्स येण्यास सुरुवात होते. ही एजन्सी कुठलेही श्रेय अथवा ग्लॅमरविना केवळ देशप्रेमापोटी आतंकवादी आणि क्रिमिनलचा खात्मा करण्याचे काम करीत असते. अतिशय गुप्तता हे या एजन्सीचे वैशिष्ट्य असते. अशातही त्यांना शबाना नावाच्या महाविद्यालयीन तरुणीला आपल्यात सहभागी करून का घ्यावेसे वाटते हा मात्र अनुत्तरित प्रश्नच म्हणावा लागेल. कारण एजन्सीमध्ये अक्षय कुमार, अनुपम खेरसारखे दिग्गज असताना एवढी मोठी जबाबदारी शबाना नावाच्या तरुणीवर सोपविण्याची गरजच काय? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पण शबानाला लगेचच एजन्सीमध्ये सामावून घेत तिला प्रशिक्षण दिले जाते अन् एका मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारीही तिच्यावर सोपविली जाते. हा संपूर्ण घटनाक्रम एवढ्या झटपट घडतो की, मनात अचानकच काही प्रश्न उपस्थित होतात. वास्तविक चित्रपटाच्या कथेत बराचसा खंड असल्याचे क्षणाक्षणाला जाणवते. कारण चित्रपटात दाखविण्यात आलेल्या घडामोडी या शबाना या पात्राशिवाय सहज घडू शकतात. त्यामुळे शबाना नावाच्या पात्रात फार काही आढळून येत नाही, असेच म्हणावे लागेल. चित्रपटाच्या कथेतील ट्विस्टमध्ये फार काही तात्त्विकता नसल्याने मध्यंतरांपर्यंत चित्रपटातील रस निघून जातो. संबंध चित्रपटात अक्षय कुमारसारख्या भारदस्त अभिनेत्याच्या वाटेला केवळ दहाच मिनिटांची भूमिका आली आहे. त्यामुळे व्हिडीओ गेमसारखे शबानाला एकापाठोपाठ एक करताना बघून कंटाळा येतो. तापसीविषयी बोलायचे झाल्यास ही भूमिका तिला समोर ठेवूनच बनविण्यात आली असावी असे दिसते. शिवाय तिने या भूमिकेला पूर्णत: न्याय दिल्याचे प्रकर्षाने जाणवते; मात्र प्रेक्षकांना तापसीला किती वेळ स्लो मोशनमध्ये धावताना बघायला आवडणार, हा एक गुंताच म्हणावा लागेल. त्यामुळे ‘बेबी’ यासारखा खुसखुशीत, अॅक्शन आणि तणाव निर्माण करणाºया चित्रपटाची अपेक्षा डोक्यात ठेवून जर तुम्ही ‘नाम शबाना’ बघायला जाणार असाल तर तुम्ही कंटाळणार हे मात्र नक्की! एकंदरीत ‘नाम शबाना’ हा चित्रपट दम नसलेला किंवा वाईट नसला तरी ‘बेबी’सारखा रोमांच निर्माण करणारा अन् अखेरपर्यंत खुर्चीवर खिळवून ठेवणारा नाही हे मात्र नक्की!