-जान्हवी सामंतविनोदी भयपट हा चित्रपटांचा एक अतिशय मनोरंजक प्रकार आहे. एखादा भयपट कायम प्रेक्षकांच्या स्मृतीत राहणारा ठरू शकतो. वर्षानुवर्षे सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणूनही मिरवू शकतो. अर्थात त्यासाठी भन्नाट विनोद आणि त्याच तोडीची अंगाचा थरकाप उडवणारी कथा याची अचूक मात्रा लागू पडायला हवी.‘नानू की जानू’ हा विनोदी भयपट या कसोटीवर पूर्णपणे अपयशी ठरतो. हा चित्रपट ना घाबरवत, ना यातील विनोद हसवत.या चित्रपटाची कथा आहे नानू (अभय देओल) या एका गुंडाची. दिल्लीतील एका घरमालकीनीसाठी नानू काम करत असतो. लोकांना घाबरवून, धमकावून घरांवर कब्जा मिळवणे, हेच त्याचे काम असते. एकदिवस गाडीतून जात असताना नानूला रस्त्यावर एक अपघात झालेला दिसतो. एक मुलगी जखमी होऊन रस्त्यावर पडलेली त्याला आढळले. नानू तिला तात्काळ रूग्णालयात हलवतो. नानू आणि डॉक्टर सगळेच शर्थीचे प्रयत्न करतात. पण त्या मुलीचा मृत्यू होतो. इथूनच चित्रपटाला एक वेगळे वळण मिळते. त्या मुलीच्या मृत्यूचा नानूवर असा काही परिणाम होतो की, नेहमी दादागिरी, गुंडगिरी करणारा नानू अचानक प्रचंड हळवा होतो. अगदी लहान-सहान गोष्टींवरूनही तो रडायला लागतो. नको त्या लोकांबद्दलही अपार सहानुभूती दाखवायला लागतो. याचकाळात त्याच्या घरीही चमत्कारी गोष्टी घडू लागतात. बॉटर ओपनर नाहिसा होऊनही बॉटल आपोआप फुटतात. पसा-याने व्यापलेले घर अचानक नीटनेटके होते. या चमत्कारांनी नानू प्रचंड घाबरतो. त्याचे मित्रही गोंधळून जातात. नानूला भूतांची भीती वाटते म्हणून रात्री मित्र त्याच्या मदतीला पोहोचतात. पण भूत मित्रांनाही घाबरवून सोडतो. मांत्रिकाला तर हे भूत सरळ पळवून लावते. काही दिवसांत हे भूत कुणाचे हे नानूला कळून चुकते. अपघातात ज्या मुलीला वाचवण्याचे प्रयत्न केलेत त्याच सिद्धीचे(पत्रलेखा) हे भूत असल्याचे त्याला समजते. यानंतर नानू लगेच कामाला लागतो. सिद्धीच्या वडिलांना भेटून तिची माहिती मिळवण्याचे प्रयत्न करतो. तिच्या अपघातामागचे गुपित आणि तिच्या मारेक-याला शोधण्याचे काम करतो. ते कसे, हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटचं पाहावा लागेल.अभय देओल संपूर्ण चित्रपट स्वत:च्या खांद्यावर पेलण्याचा प्रयत्न करताना दिसतो. पण फार यशस्वी होत नाही. पत्रलेखाच्या भूमिकेला तर फारसा वावचं नाही. अन्य कलाकाराही ठीक-ठीक श्रेणीत मोडणारे आहेत. चित्रपट विनोदी आहे. पण फार प्रभावी नाही. काही दृश्यात नको तितका नाटकीपणा असल्याने विनोद फिके वाटतात. चित्रपट खरे तर भयपट आहे. पण यातील हॉरर सीन्स अगदी जेमतेम आहेत आणि जे आहेत ते सगळे हॉलिवूडची कॉपी आहेत. ‘द रिंग’या चित्रपटांसारखेच लांब फ्रॉक आणि लांब केसांचे भूत यात दिसतात. चित्रपटाची गती, हे या चित्रपटाची सर्वात मोठी त्रूट आहे. चित्रपट अगदी एकाच लयीत चालतो आणि ताल गमावून बसतो. प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण होईल असा कुठलाच सन्सपेन्स, टिष्ट्वस्ट नसल्याने चित्रपट रटाळ वाटतो. टाईमपास म्हणून हा चित्रपट बरा आहे. पण त्यासाठी चित्रपटगृहांत जावून पाहण्याचे कष्ट घेण्याची गरज नक्कीच नाही.