हास्य, करुण, श्रृंगार, वीर, अद्भुत, रौद्र, शांत, भयानक आणि विभत्स हे अभिनयातील नऊ मूळ रस मानले जातात. या चित्रपटात प्रवीण हिंगोनिया यांनी या नऊ रसांची सांगड घालून गुंफलेल्या नऊ कथा एकाच चित्रटात सादर केल्या आहेत. यात प्रत्येक रसाचे वेगळेपण दाखवताना त्याच बाजाची कथाही निवडण्यात आली आहे.
कथानक : यातील पहिली कथा कोयलसोबत लग्न करून दुबईला जाणाऱ्या रोहितची आहे. यात हुंडाबळीचा मुद्दा अधोरेखित केला आहे. रूहानाची दुसरी कथा दिल्ली बस सामूहिक अत्याचारावरून प्रेरीत आहे. हि कथा सामाजिक संदेश देणारी आहे. तिसरी कथा मुंबईत अॅक्टर बनण्यासाठी आलेल्या पुरुषोत्तम लाल मिश्राची आहे. यामध्ये सकारात्मक विचारांचा संदेश आहे. चौथी 'खिलौना' नावची कथा घरगुती हिंसाचारावरील आहे. 'मैं भगत सिंह बनना चाहता हूं' हि कथा देशभक्तीवर आधारीत आहे. 'समय चक्र'मध्ये एका ऑटो ड्राइवरची कथा आहे. 'व्हॅाट हॅपन्ड इन सुहागरात'मध्ये लग्नानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या घटस्फोटाची स्टोरी आहे. 'हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी'मध्ये लग्नाच्या वाढदिवशी आश्चर्यचकीत करणारी, तर 'संतान'मध्ये वडील आणि मुलाची कथा आहे.
लेखन-दिग्दर्शन : प्रत्येक कथेमध्ये वेगळा रस सादर होईल याची काळजी घेण्यात आली आहे. काही प्रसंगानुरूप संवाद मनाला भिडतात. काही दृश्यांमध्ये गती थोडी मंदावल्यासारखी वाटते, पण एकाच चित्रपटात अडीच तासांच्या आत नऊ कथा सादर करण्याचे आव्हान दिग्दर्शकाने लीलया पेलले आहे. प्रत्येक कथा काही ना काही संदेश देणारी आहे. नामवंत कलाकारांचे चेहरे नसल्याच फटका या चित्रपटाला बसू शकतो. समाज व्यवस्थेपासून चित्रपटसृष्टीपर्यंत आणि घरगुतील नातेसंबंधांपासून पती-पत्नीमधील दुराव्यापर्यंत बऱ्याच पैलूंना एकाच चित्रपटात स्पर्श करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तांत्रिक बाबींमध्ये चित्रपट सामान्य दर्जाचा आहे. वेशभूषा चांगली आहे.
अभिनय : नऊ वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारताना चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही प्रवीण हिंगोरियांनी सांभाळल्याने त्यांचे विशेष कौतुक वाटते. प्रत्येक व्यक्तिरेखेतील वेगळेपण सादर करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतल्याचे जाणवते. त्यांच्या जोडीला असलेल्या प्रत्येक कलाकाराने आपल्या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. शीबा चड्ढा, राजेश शर्मा, अल्का अमीन, अतुल श्रीवास्तव, पारितोष त्रिपाठी, शाजी चौधरी, दयानंद शेट्टी, रेवती पिल्लई आदी सर्वच कलाकारांनी चांगली साथ दिली आहे.
सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, वेशभूषानकारात्मक बाजू : काही दृश्यांमधील संथ गतीथोडक्यात काय तर नऊ कथांमध्ये गुंफलेला नऊ रसांचा कोलाज एकदा वेळ काढून बघण्याजोगा आहे.