‘सेक्रेड गेम्स’ या नेटफ्लिक्सच्या पहिल्या ओरिजनल वेबसीरिजचे पहिले सीजन तुफान गाजले आणि ‘सेक्रेड गेम्स 2’ कधी येणार, याकडे प्रेक्षक डोळे लावून बसले. अखेर 405 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर 14 ऑगस्टला मध्यरात्रीनंतर ‘सेक्रेड गेम्स 2’ स्ट्रीम केले गेले. चाहत्यांनी अक्षरश: ‘झोपेचे बलिदान’ देत ‘सेक्रेड गेम्स 2’चे हे दुसरे सीझन पाहिले. पहिल्या सीझनप्रमाणेच ‘सेक्रेड गेम्स’चे दुसरे सीझनही त्याच ‘टेस्ट’मध्ये आहे. ‘सेक्रेड गेम्स 2’ची सुरूवात होते ती गणेश गायतोंडेच्या (नवाजुद्दीन सिद्दीकी) धमाकेदार वापसीने. पण यावेळी गणेश गायतोंडेच्या या भूमिकेत इतके काही आहे, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.
दुस-या सीझनमध्ये पंकज त्रिवेदीची एन्ट्री होते आणि आपल्या वरही कुणीतरी आहे, याची जाणीव गणेश गायतोंडेला होते. पहिल्या सीझनमध्ये आपण गायतोंडेच्या नजरेतून मुंबई पाहिले आणि त्याचा उदयही. दुसरे सीझन गायतोंडेच्या अध:पतनाची कथा आहे. एकीकडे गायतोंडेची कथा आहे आणि दुसरीकडे हवालदार काटेकरच्या मृत्यूने दु:खी असलेल्या इन्स्पेक्टर सरताज सिंगची (सैफ अली खान) कथा आहे.गायतोंडे देशापासून दूर केन्यात संघर्ष करतोय. याचदरम्यान तो सरताज सिंगच्या वडिलांना फोन करतो आणि त्याला गुरु शोधण्याचा सल्ला मिळतो. इथून गुरुजी (पंकज त्रिपाठी)ची एन्ट्री होते. फ्लॅशबॅक आणि वर्तमानातील बदल अतिशय शानदार पद्धतीने यात दाखवण्यात आला आहे. पंकज त्रिपाठी व कल्की कोच्लिन यासारख्या नव्या कलाकारांच्या अभिनयामुळे हे दुसरे सीझन आणखीही दमदार बनले आहे. या नव्या सीझनमध्ये असे अनेक सीन्स आहेत, जे पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा होईल. डायलॉगही तितकेच जबरदस्त आहेत. ‘सेक्रेड गेम्स 2’चे डायरेक्शन आणि एडिटींग याला तोड नाही. नवाजुद्दीन आणि सैफ अली खान या सीझनमध्येही भाव खावून जातात. पण सोबत पंकज त्रिपाठी, कल्की कोल्चिन या सगळ्या नव्या पात्रांचे कामही या वेबसीरिजमध्ये जीव ओतते. नीरज घायवान आणि अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केलेले हे दुसरे सीझन शेवटपर्यंत तुमची उत्सुकता ताणून धरले. गाणी आणि खास प्रॉप हे अनुराग कश्यपची ट्रेडमार्क स्टाईल तुम्हाला दिसते. शिवाय राजकारणाची एक रोचक बाजूही दिसते. गायतोंडेच्या नजरेतील एक गुन्हेगार आणि इन्स्पेक्टर सरताज सिंहच्या नजरेतून पोलिस आणि सरकारची कथा या वेबसीरिजला आणखीच रोचक बनवतात.