Join us

Nude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 6:00 AM

आपल्या समाजात नग्नतेकडे केवळ वासना म्हणून पाहिले जाते. पण या नग्नतेकडे काही जण कला म्हणून देखील पाहतात याचा सगळयांना विसर पडतो. कलेला कसलेच बंधन नसते हे सत्य असले तरी या गोष्टीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते, याच एका आगळ्यावेगळ्या विषयावर रवी जाधवचा न्यूड हा चित्रपट आहे.

Release Date: April 27, 2018Language: मराठी
Cast: कल्याणी मुळ्ये, ओम भूतकर, नेहा जोशी, मदन देवधर
Producer: रवी जाधवDirector: रवी जाधव
Duration: दोन तासGenre:
लोकमत रेटिंग्स
प्राजक्ता चिटणीस आपल्या समाजात नग्नतेकडे केवळ वासना म्हणून पाहिले जाते. पण या नग्नतेकडे काही जण कला म्हणून देखील पाहतात याचा सगळयांना विसर पडतो. कलेला कसलेच बंधन नसते हे सत्य असले तरी या गोष्टीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते, याच एका आगळ्यावेगळ्या विषयावर रवी जाधवचा न्यूड हा चित्रपट आहे. मराठीच काय तर बॉलीवूड चित्रपटसृष्टीमध्ये देखील इतक्या महत्त्वाच्या विषयाला आजवर हात घातला गेला नव्हता. पण रवी जाधवने ते शिवधनुष्य पेलले आहे. यमुनाच्या (कल्याणी मुळ्ये) पतीचे (ओम भूतकर) माणिक (नेहा जोशी) सोबत विवाहबाह्य संबध असतात. त्यामुळे तो यमुनाला नेहमीच प्रचंड मारहाण करत असतो. तिच्या कडून सतत पैसे मागत असतो. या सगळ्याला ती प्रचंड कंटाळलेली असते. त्यामुळे ती तिचा मुलगा लक्ष्मण (मदन देवधर) ला घेऊन मुंबईला आपल्या मावशीकडे (छाया कदम) येते. मुंबईला आल्यावर ती अनेक दिवस काम शोधते. पण काही केल्या तिला काम मिळत नाही. तिची मावशी एका कॉलेजमध्ये शिपाई म्हणून काम करत असते. आपल्याला पण आपल्या मावशीने त्या कॉलेज मध्ये नोकरी मिळून द्यावी असे तिला वाटत असते. त्यामुळे एक दिवस ती तिच्या मावशीचा पाठलाग करते. मावशीचा पाठलाग केल्यानंतर तिला कळते की मावशी कॉलेज मध्ये शिपायाचे काम करण्यासोबतच न्यूड मॉडेल म्हणून काम करत असते. विद्यार्थ्यांच्या कलेला वाव मिळावी यासाठी हे करण्यात काहीच चुकीचे नाहीये असे तिचे म्हणणे असते आणि यासाठी तिला चांगला पैसा देखील मिळत असतो. आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे हीच केवळ यमुनाची इच्छा असल्याने ती देखील हे काम करायला लागते. एक न्यूड मॉडेल बनल्यावर तिच्या आयुष्यात काय काय घडते हे प्रेक्षकांना न्यूड या चित्रपटात पाहायला मिळते.दिग्दर्शक रवी जाधवने एक खूपच वेगळा विषय लोकांच्या समोर आणला आहे आणि तो तितक्याच ताकदीने सादर केला आहे त्यामुळे त्याचे करावे तितके कौतुक कमी आहे. चित्रपटाचे नाव न्यूड असले तरी या चित्रपटात कोणताही विभित्सपणा नाहीये. चित्रपट कुठेच बोल्डनेसकडे वळत नाही हेच रवी जाधवच खरे श्रेय आहे. या चित्रपटात काही मोजक्याच व्यक्तिरेखा असून त्या खूपच चांगल्या प्रकारे मांडल्या आहेत. कल्याणी मुळ्ये आणि छाया कदम यांनी खूपच चांगले काम केले आहे. छाया कदमचा पडद्यावरील वावर तर अफलातून आहे. चित्रपटाची सिनेमोटोग्राफी देखील खूपच सुंदर आहे. चित्रपटातील सगळीच गाणी कथेनुसार चपळख बसतात. सायली खरेने ही गाणी खूपच  छान गायली आहेत. यमुनाला पैशाची गरज असल्याने ती या व्यवसायात ओढली जाते पण याच व्यवसायावर पुढे जाऊन प्रेम करायला लागते हे खूपच चांगल्या प्रकारे मांडले आहे. नसिरुद्दीन शहा चित्रपटात केवळ काही मिनिटांसाठी असले तरी त्यांनी आपली एक छाप सोडली आहे. कपड़ा जिस्म पे पहनाया जाता है , रूह पे नहीं... हा नसिरुद्दीन शहा यांच्या तोंडी असलेला संवाद चित्रपद्वारे लेखक, दिग्दर्शकाला काय सांगायचे आहे हे प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचवतो. चित्रपट पाहताना आता या चित्रपटाचा शेवट काय होणार याची नक्कीच उत्सुकता लागून राहते. हा शेवट तर आपल्याला नक्कीच सुन्न करतो. एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा हा न्यूड सिनेमा अवश्य पहा.