- जान्हवी सामंतबॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक शुजीत सरकार यांचा ‘अक्टूबर’ हा चित्रपट आज रिलीज झाला. प्रेक्षकांना नेहमीच काही तरी वेगळे देणा-या शुजीत यांनी या चित्रपटातही एक आगळा-वेगळा प्रयोग केला आहे. होय, एप्रिलच्या गर्मीत प्रेक्षकांना ‘अक्टूबर’च्या गुलाबी थंडीचा अनुभव देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांत ते किती यशस्वी ठरलेत, ते बघूयात...‘अक्टूबर’ पाहिल्यानंतर एक गोष्ट आधीचं स्पष्ट करावी वाटते. ती म्हणजे, पडद्यावर कायम ‘ढिशूम ढिशूम’ आणि डायलॉगबाजी ऐकण्यासाठी सरावलेल्या प्रेक्षकांना ‘अक्टूबर’ नक्की कसा आहे, हे कळणे थोडे अवघड आहे. कारण ‘अक्टूबर’ हा पारिजातकाच्या फुलाइतकाच नाजूक, सुंदर अन् सुगंधी चित्रपट आहे. ही कथा आहे,डेन (वरूण धवन) नामक एका सर्वसामान्य तरूणाची. डेन हा हॉटेल मॅनेजमेंटचा प्रशिक्षणार्थी असतो. साधा व स्पष्ट बोलणारा, अन्याय सहन न होणारा, यथास्थितीला आव्हान देणारा. ट्रेनिंगदरम्यान अनेक लहान मोठ्या गोष्टी डेनला वैताग आणतात. स्वत:तला हा असंतोष कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तो लोकांना दर्शवत असतो. डेन सगळ्यांची मदत करणारा असला तरी सोबतच्या विद्यार्थ्यांचा नको तितका आज्ञाधारकपणा आणि अतिकष्टाळूवृत्ती त्याला खटकत असते. त्यामुळे त्यांच्या कामात डेन सतत अडचणी निर्माण करत असतो. याच डेनच्या आयुष्यात एकदिवस अनपेक्षित घटना घडते. वरूणच्या अनुपस्थित हॉटेलचा स्टाफ न्यू ईयर पार्टी करतो आणि या पार्टीत डेनची एक सहकारी मैत्रिण शिवली (बनिता संधू) तिसºया माळ्याच्या बाल्कनीतून खाली पडते. यानंतर कोमात गेलेल्या रूग्णासारखी तिची अवस्था होते. डेन आणि शिवलीची या अपघाताआधी फार जवळीक नसते. पण डेनला शिवलीची ही स्थिती बघवत नाही. माणुसकीच्या नात्याने तो तिच्या कुटुंबाला मदत करतो. बाल्कनीतून पडण्याआधी शिवली आपल्याबद्दल विचारत होती, हे कळल्यावर तर डेन तिच्याकडे आणखीच ओढला जातो. तिची प्रचंड सेवा करतो, तिचे मन रमवण्यासाठी तिच्याशी बोलतो, तिच्या आवडी निवडी जपतो. तिच्या आवडीची प्राजक्ताची फुले आणून देतो. पण शिवलीत काहीच प्रगती नसते. शिवलीचे कुटुंब तिच्या उपचारावर पाण्यासारखा पैसा खर्च करतात आणि अखेर सगळे प्रयत्न करून थकतात. नातेवाईकही आता खर्च नको म्हणून कुरबुरायला लागतात. जवळचे मित्रही हळूहळू शिवलीला भेटायला यायचे थांबवतात. पण डेन मात्र मनापासून शिवलीच्या सेवेत गुंततो. नोकरीच्याठिकाणी त्याला तंबी मिळते, आई-वडिलही विरोध करतात पण डेन कुणालाच बधत नाही. तो शिवलीच्या सेवेत दिवस-रात्र एक करतो. शिवलीचे आई-वडिल आणि बहिण-भावाला धीर देतो. त्याची ही सेवा, त्याची ही निष्ठा किती फळास येते? शिवली पूर्णपणे बरी होते का? तिला डेनच्या सेवेची जाणीव होते का? डेन इतक्या नि:स्वार्थपणे शिवलीची सेवा का करतो? प्रेम हे केवळ या प्रेमाची परतफेड करू शकेल, अशाच माणसावर करायचे असते का? प्रत्येक नाते हे देवाण-घेवाण यावरच आधारित असावे का? नातेचं नाही तर नोकरी, सेवा, उपचार, मदत हे सर्व यशासाठी किंवा स्वार्थासाठीच करायचे का? जिथे देवाण-घेवाण नाही, तिथे दोन लोकांमध्ये कशाप्रकारचे नाते रूजू शकते? असे अनेक गूढ प्रश्न हा सिनेमा उपस्थित करतो. या प्रश्नांची उत्तरे निश्चितचं सोपी नाहीत. मसालेदार आणि सहसोपी नाटकीय दृश्ये पाहणाºया आणि गाण्यांची सवय असलेल्या प्रेक्षकांसाठी तर ती अजिबात सोपी नाहीत. निश्चितपणे शूजीत सरकारच्या या चित्रपटात काही त्रूटीही आहेत. डेन आणि शिवलीचे अपघाताआधीचे नाते, त्यांची मैत्री कधी, कशी होते, हे प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडले असते. डेनची सुरूवातीची असामाधानी वृत्ती आणि शिवलीच्या अपघातानंतर त्याच्यातील पराकोटीचा बदल यामागची पार्श्वभूमी पाहणेही लोकांना भावले असते. शिवली आणि डेन यांचा भावनिक बंध पाहणेही प्रेक्षकांना रूचले असते. पण या त्रूटींकडे दुर्लक्ष केले तर शूजीत सरकारचा हा चित्रपट संवेदनशीन मनांना भावणार आहे. समांतर चित्रपटांचा तात्त्विक बोजडपणा आणि व्यावसायिक चित्रपटांचा उथळपणा टाळून शूजीत सरकार यांनी एक हळूवार कथा गुंफली आहे. त्यांच्या दिग्दर्शनातला हाच हळूवारपणा, सौम्यपणा, साधेपणा मनाला भावणारा आहे. ‘बदलापूर’नंतर वरूण धवन पहिल्यांदा इतकी तगडी भूमिका साकारली आहे. वरूण धवनने या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला आहे. शिवलीच्या आईच्या भूमिकेत गीतांजली राव हिने जिवंत भूमिका साकारली आहे. बनिता संधू हिनेही पहिल्याच चित्रपटात आपल्यातील सगळी अभिनयशक्ती पणाला लावली आहे. त्यामुळे एकदा तरी ही हळूवार कथा जरूर पाहावी.