जान्हवी सामंतअक्षय कुमारचे सॅनेटरी नॅपकिन बरोबरचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच तो अनेक कार्यक्रमात महिलांच्या मासिक पाळीवर उघडपणे बोलत आहे. याआधी कधीच मासिक पाळीवर इतके उघडपणे बोलले गेले नव्हते. दिवसेंदिवस होणाऱ्या चर्चांमुळे पॅडमॅन या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या टॉयलेट-एक प्रेम कथा या चित्रपटाप्रमाणे हाही चित्रपट फक्त उपदेशाचे डोस पाजणारा असेल की प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा असेल? असा प्रश्न जर तुमच्या मनात उपस्थित झाला असेल तर त्याचे उत्तर आहे की, तुम्ही हा चित्रपट नक्कीच थिएटरमध्ये जाऊन बघा... तुमचे नक्कीच मनोरंजन होईल.हा सामजिक विषय असल्यामुळे या चित्रपटात इतर बॉलिवूड चित्रपटांप्रमाणे मसाला टाकणे शक्य नव्हते. त्यामुळे एका साधारण माणासाची असाधारण कामगिरी या चित्रपटात पाहायला मिळते. या साधारण माणसाने लाखो महिलांच्या आरोग्यात आणि आयुष्यामध्ये बदल घडवले.एका गंभीर विषयाला हलक्या-फुलक्या शब्दात मांडणे हे या चित्रपटाचे यश आहे असे म्हणावे लागेल. पॅडमॅन हा चित्रपट कोईम्बतुरमध्ये राहणाऱ्या अरूणाचलम मुरूगनाथनमच्या आयुष्यावर आधारित आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या मशिनचा शोध लावला. अरुणाचलम यांच्या या शोधामुळे अनेक गरीब महिलांना गावो-गावी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध झाले. या कारणामुळे त्यांना अरूणाचलम पॅडमॅन हा किताब मिळाला. अरूणाचलम यांचा सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचा हट्ट आणि त्या शोधा करता त्याने केलेला संघर्ष यावर आधारित पॅडमॅन चित्रपट आहे. या चित्रपटातील गोष्ट कोईम्बतुर ऐवजी मध्यप्रदेश मधल्या महेश्वरमधल्या एक छोट्याशा गावात घडते. एका इंजिनीरिंग वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या लक्ष्मीकांत चौहानचे नुकतेच लग्न झालेले असते. बायको गायत्रीवर त्याचे खूप प्रेम असते. तिच्या छोट्या-छोट्या समस्या सोडवण्यात लक्ष्मीकांतला खूप आनंद मिळत असतो. लग्नाच्या काही महिन्यांतच त्याच्या लक्षात येते की, राधिका मासिळ पाळी दरम्यान अतिशय घाणेरडे कपडे वापरते. या कपड्यामुळे तिच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो असे त्यांचे म्हणणे असते. पण बाजारात मिळणारे सॅनटरी नॅपकिन खूपच महाग असतात. त्यामुळे लक्ष्मीकांत स्वत:च नॅपकिन बनवण्याचा प्रयत्न करतात. काही दिवसात त्यांचे नॅपकिन बनवण्याचे वेड वाढत जाते. त्यांनी बनवलेले सॅनिटरी नॅपकिन ते आपल्या बायकोला वापरायला देतात. मात्र बायको त्यांच्या या सॅनटरी नॅपकिनच्या प्रयोगाला कंटाळलेली असते. बायकोबरोबर त्यांची बहीणसुद्धा त्यांच्यावर नाराज असते. त्यानंतर ते सॅनटरी नॅपकिनची ट्रायल स्वत:वरच घेऊ लागतात. गावात हा सगळा प्रकार कळल्यानंतर त्यांची खूप बदनामी होते. त्यांची बहीण आणि बायको त्यांना सोडून निघून जाते. ते देखील आपले हे संशोधन सुरू ठेवण्यासाठी गाव सोडून निघून जातात. घराकामं आणि छोटी-मोठी कामं करुन ते आपले संशोधन सुरूच ठेवतात. अखेर अनेक कष्टांनंतर त्यांचा स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचा प्रयोग यशस्वी होतो. या प्रयोगासाठी ते कर्ज देखील काढतात. पण ग्राहकाने ते वापरल्याशिवाय नॅपकिन चांगला की वाईट हे कसे कळणार? असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. याच दरम्यान लक्ष्मीकांत यांना तबला वादक परीजी (सोनम कपूर ) भेटते. ती त्याला त्याच्या सॅनटरी नॅपकिनबाबतची प्रतिक्रिया देते. परी त्याला आयआयटीमध्ये होणाऱ्या एक स्पर्धेची माहिती देते. याच स्पर्धेत लक्ष्मीकांत भाग घेतात आणि जिंकतातसुद्धा. ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते अॅवॉर्ड मिळतो. आपल्या मशिनचे पेटंट लक्ष्मीकांत यांना आपल्या गावातल्या महिलांच्या उपयोगासाठी वापरायचे असते. ते करण्याची युक्ती आणि मनोबल त्यांना परी देते. आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परी त्यांना त्याच्या कामात मदत करते. त्यांच्या या शोधामुळे लक्ष्मीकांत यांचा अनेक ठिकाणी सन्मान करण्यात येतो. हळूहळू त्यांच्या गावातील लोकांचे आणि कुटुंबीयांचे त्यांच्याबाबतचे मत परिवर्तन होते. अक्षय कुमार कोणतीही भूमिका अगदी सहजपणे साकारतो. मात्र या चित्रपटातील भूमिका त्याला आणखीन चांगली करता आली असती. राधिकाची भूमिका अनेकवेळा आपल्याला चित्रपट पाहताना रडवीच वाटते. मात्र सोनम कपूर तिच्या भूमिकेत फिट बसली आहे. तिने साकारलेली परीची भूमिका लक्षात राहण्यासारखी आहे.मासिक पाळी यावर आजही आपल्या समाजात किंवा कुटुंबात उघडपणे बोलले जात नाही. तर अशा विषयावर चक्क सव्वा दोन तास चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य करणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. अतिशय गंभीर विषय हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडताना चित्रपटातील मूळ कथा कुठेही भरकटू नये याबाबतची दक्षता दिग्दर्शक बाल्की यांनी घेतली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे.
Padman review : गंभीर विषयावर हलक्या फुलक्या शब्दांत भाष्य करणारा पॅडमॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2018 10:38 AM