सुवर्णा जैन
आणखी एका स्टार किडच्या बॉलीवूड एंट्रीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला 'पल पल दिल के पास' चित्रपट अखेर रुपेरी पडद्यावर दाखल झाला आहे. हा स्टार किड म्हणजे बॉलीवूडचे हिमॅन धर्मेंद्र यांचा नातू आणि ढाई किलो का हात फेम अभिनेता सनी देओल यांचा पुत्र करण देओल. त्यातच आपल्या लेकाला लॉन्च करण्यासाठी सनी पाजींनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आपल्या नातवाच्या पहिल्या चित्रपटासाठी निर्मितीची जबाबदारी धरमपाजींनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. हिमाचल प्रदेशच्या सुंदर आणि कुणालाही खुणावतील अशा पर्वतरांगांच्या बॅकड्रॉपवर चित्रपटाच्या कथेला सुरूवात होते. कथेचा नायक करण सेहगल (करण देओल) हा तरूण मनालीमध्ये ट्रेकिंग कंपनी चालवत असतो. तो पर्यटक आणि सेलिब्रिटींचा लाडका गाइड आहे.
दुसरीकडे चित्रपटाची नायिका सेहर सेठी (सेहर बाम्बा) ही दिल्लीतील प्रसिद्ध ब्लॉगर आहे. मात्र फॅमिलीच्या वार्षिक रियुनियनमध्ये सहभागी होण्याची तिची इच्छा नाही. त्यामुळे साहसी ट्रीपला जाण्याचा ती निर्णय घेते. या ट्रीपमध्येच करण आणि सेहर यांची भेट होते. इथूनच साहस, रोमान्स आणि थ्रिलचा खेळ सुरू होतो. या ट्रीपच्या निमित्ताने करण आणि सेहर बराच काळ एकत्र घालवतात. या काळात दोघांमध्ये लव्ह हेटचा सिलसिला सुरू होतो. दोघांतील या प्रेमळ तू तू मैं मैं-मुळे चित्रपटाचा पूर्वांध रंगतो. मात्र साहसी टूर संपते आणि दोघांनाही एकमेकांवरील प्रेमाची जाणीव होऊ लागते. यानंतर दोघं पुन्हा भेटतात का?, दोघांच्या प्रेमकथेचे पुढे काय होतं?, त्यांच्या प्रेमकथेत काय काय थ्रिल तसंच ड्रामा घडतो हे पाहण्यासाठी तुम्हाला पल पल दिल के पास चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहावा लागेल. चित्रपटाच्या कथेबाबत नवं असं काहीच नाही. त्यामुळे दोन अडीच तास रसिकांना खिळवून ठेवण्यात कथा अपयशी ठरते.
तोच बॉलीवूडचा ड्रामा आणि तीच प्रेमकथा वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र हा प्रयत्न रटाळवाणा वाटतो. गेले अनेक दशकं रसिक जी कथा पाहतायत तीच कथा, तोच ड्रामा आणि तोच रोमान्स यामुळे रसिकांची निराशा होईल. करण आणि सेहर यांचा हा पदार्पणाचा चित्रपट आहे. मात्र दोघांकडून रसिकांची निराशा होईल. कथेत तितका दम नसल्याने दोघांना आपल्यातील अभिनयाची कला दाखवण्याचा फार वाव मिळाला नाही. मात्र आपल्या वाट्याला जी काही भूमिका आली तिला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. करणने इमोशनल सीन प्रभावीपणे साकारलेत तर सेहरही ग्लॅमरस दिसली आहे. मात्र अभिनयात आणखी सुधारणेचा वाव असून दोघांतही ती क्षमता असल्याचे पाहायला मिळतं. चित्रपटाचं संगीत उत्तम असून श्रवणीय आहे.
प्रेक्षणीय आणि रमणीय ठिकाणं, पर्वतरांगा, दऱ्या, डोंगर यांचं चित्रीकरण रसिकांना नक्कीच आवडेल. त्यामुळे एकदा तरी हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. दिग्दर्शक म्हणून सनी देओलने चांगला प्रयत्न केला आहे. सरळ, साधी आणि साऱ्यांना आवडेल अशी प्रेमकथा रुपेरी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र कथेत तितकासा दम नसल्याने त्याला अपयश आलं आहे. एकूणच हा चित्रपट रसिकांच्या पल पल दिल के पास नाही तर 'पल पल दिल के दूरच' असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.