Join us

Paltan Movie Review : देशप्रेमाचा ‘ओव्हरडोज’!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 3:51 PM

दोन शब्दांत ‘पलटन’ या चित्रपटाची समीक्षा करायची असेल तर ‘देशप्रेमाचा ओव्हरडोज’ असेच म्हणावे लागेल.

Language: हिंदी
Cast: अर्जुन रामपाल, सोनू सूद, हर्षवर्धन राणे, गुरमीत चौधरी, सिद्धांत कपूर, लव सिन्हा
Producer: जे पी दत्ता Director: जे पी दत्ता
Duration: २ तास ३० मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

- जान्हवी सामंत

दोन शब्दांत ‘पलटन’ या चित्रपटाची समीक्षा करायची असेल तर ‘देशप्रेमाचा ओव्हरडोज’ असेच म्हणावे लागेल. अगदी अतिरेक वाटेल इतके देशप्रेमाचे भरते, यापलीकडे या चित्रपटात काहीही नाही. लेफ्टनंट कर्नल राय सिंग (अर्जुन रामपाल) हा ‘पलटन’च्या कथेचा मुख्य सूत्रधार आहे. आर्मीतील नव्या मोहिमेवर तो सिक्कीमला येतो. वर्ष १९६७. सन १९६२ ते १९६५ या कालखंडात चीनसोबत झालेल्या युद्धात जखमी झालेल्या आणि जीव गमावलेल्या जवानांच्या रूपातील हानी भारतीय लष्कर आणि मेजर जनरल सगता सिंग (जॅकी श्रॉफ) अजून विसरलेले नाहीत. सगता सिंग आणि राय सिंग हे दोघेही या जखमांचा सूड उगवण्यासाठी संधीच्या शोधात असतात.मातृभूमीच्या रक्षणासाठी त्यांची ‘पलटन’ही एकदम सज्ज असते. बॉर्डर’च्याच धर्तीवर ‘पलटन’मधील जवानांनाही आपल्या घराची, घरच्यांची, मिट्टीच्या ‘खुशबू’ची , ‘सरसोंच्या खेती’ची आठवण येत असते. नथुला पास अतिशय संवेदनशील भाग असतो. चीनी सैन्य या भागावर आपला कब्जा मिळवण्याच्या प्रयत्नात असते आणि भारतीय सैन्याला कुठल्याही स्थितीत हा भाग गमवायचा नसतो.  अशात चीनी सैन्य अगदी हास्यास्पद गोष्टी करून भारतीय सैन्यावर दबाव आणू इच्छितात. वाचायला ही गोष्ट फार शौर्याची वाटत असली तरी चित्रपटात मात्र ती अतिशय पोरकट पद्धतीने चितारण्यात आली आहे.

 या युद्धकथेत प्रेक्षकांना केवळ दगडफेक आणि हाणामारीचं बघायला मिळते. युद्धपटात हमखास दिसणा-या गोष्टी म्हणजे, गावी असलेली प्रेमिका किंवा दूर देशी प्रतीक्षा करणारी गर्भवती पत्नी, देशप्रेमाचे पाढे वाचणारे सरदार जवान, पाकिटात कुटुंबाचा फोटो बघून गायलेले गाणे असे सगळे या चित्रपटातही आहे. पण हा सगळा मसाला वापरूनही चित्रपटाला ती चव नाही. मुळात गल्लीतल्या पोरांची होते तशी दगडफेक, हाणामारी, पोरकट शिवीगाळ आणि अतिशय बोजड असे देशभक्तीने उसणे अवसान आणून रंगवलेले संवाद यापलीकडे या चित्रपटात सांगण्यासारखे काहीही नाही. त्यातच कलाकारांनीही अभिनयाचा ‘अतिरेक’ केल्याने हा चित्रपट आणखीच कर्कश वाटतो. तिस-या दृश्यापासूनच चित्रपट पाहताना कंटाळा येतो. अख्ख्या चित्रपटात भारतीय जवानांच्या देशप्रेमाच्या संवादांचा इतका मारा होतो की, एका क्षणाला ते ‘माथेफिरू’ वाटू लागतात. त्या तुलनेत चीनी सैनिक अधिक   चाणाक्ष वाटतात.  थोडक्यात काय तर देशप्रेमाचा हुरूप असलेल्यांनी हा चित्रपट बघावा. नाही तर टाळला तरी चालेल. 

टॅग्स :पलटन