मुळात आपलं आयुष्य हे सहजसोप्प नसतंच मुळी. त्यात सुख दुःखांचे चढउतार असतात. एका क्षणात आनंदी असणारं जीवन बदलतं. वास्तवाची जाणीव होऊन सभोवतालाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. वागण्यातला बालिशपणा जाऊन आपण नकळत प्रगल्भ होत जातो. 'पंचायत 3' मध्ये प्रत्येक क्षण समरसून जगणाऱ्या माणसांचं आयुष्य कसं बदलतं याचं चित्रण बघायला मिळतं. माणसं mature होताना तुम्ही पाहिलं असेलच. पण एखादी कलाकृती कशी mature आणि आशयघन होते, याचा प्रत्यय तुम्हाला 'पंचायत 3' बघून होईल.
कथानक : सुरुवातीलाच सांगितलं पाहिजे ज्यांनी 'पंचायत' चे आधीचे सिझन बघितले नाहीत त्यांनी आधी ते बघा. 'पंचायत 3' डायरेक्ट बघितली तर तुम्हाला कथा समजणार नाही, असं होणार नाही. पण तुम्ही आधीचे दोन सिझन बघितले तर तुम्हाला 'पंचायत 3' पाहायला जास्त मजा येईल. तर आधीच्या सिझनमध्ये सचिव अभिषेक त्रिपाठीची बदली झाली असते. पण 'पंचायत 3' मध्ये अभिषेकची बदली काही कारणाने रद्द होते आणि तो पुन्हा फुलेरा गावात येतो. मुलगा शहीद झाल्याने प्रल्हाद त्याच्या दुःखात पार बुडाला आहे. विकास त्याच्या संसारात प्रेम आणि आर्थिक खर्चाचा डोलारा सांभाळतोय. सचिवजी आणि रिंकी यांचं नातं मैत्रीच्या पलीकडे गेलं आहे. गावात पंचायत निवडणुकीचे वारे वाहत असतात. नवीन प्रधान होण्यासाठी मंजू देवी आणि भूषण अर्थात बनराकस या दोन्ही कुटुंबाची आपापसात चढाओढ सुरू असते. या दोन कुटुंबांना सावरता आवरता सचिव अभिषेकचं सँडविच होतं. दुसरीकडे मागील सिझनमध्ये अपमानित झालेला विधायक फुलेरा गावावर डूख धरून आहे. अशाप्रकारे 'पंचायत 3' मध्ये फुलेरा गावात आणखी काय घडणार, याची रंजक कहाणी तुम्हाला बघायला मिळेल. आणि हो.. 'पंचायत 3' सुद्धा अर्धवट वळणावर संपला आहे. त्यामुळे पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...!
दिग्दर्शन : 'पंचायत 3' चं दिग्दर्शन केलंय दीपक कुमार मिश्रा यांनी. दीपक यांनी पुन्हा एकदा नर्मविनोदी पद्धतीने फुलेरा गावातील कहाणी दाखवली आहे. 'पंचायत 3' च्या प्रत्येक एपिसोडमध्ये इमोशनल टच पाहायला मिळतो. त्यामुळे एकूण ८ भागांची असलेली ही सिरीज नकळत डोळ्यांत पाणी आणते. सुरुवात अनेकांना संथ वाटू शकते. परंतु दिग्दर्शकांनी दुसऱ्या भागाच्या शेवटी जी मोठी घटना घडली त्यानंतर गावातल्या लोकांची मानसिकता कशी आहे, यासाठी थोडा वेळ घेतलाय. सुरुवातीला प्रल्हादच्या मानसिक अवस्थेवर फोकस करण्यात आलाय. त्यामुळे प्रेक्षक म्हणून आपणही प्रल्हादच्या दुःखाशी जोडले जातो. हळूहळू कथेत रंग भरून शेवट अनपेक्षित वळणावर येऊन पोहोचतो. आणि विशेष म्हणजे आधीच्या दोन्ही सिझनमध्ये ज्या कलाकारांनी छोट्या छोट्या भूमिका गाजवल्या त्यांना तिसऱ्या सिझनमध्ये आणून एक वर्तुळ पूर्ण केलंय. 'पंचायत 3' मध्ये स्वानंद किरकिरे यांनी गायलेलं एक गाणंही ऐकायला मिळतं. आणि शेवटच्या भागात एका कलाकाराला पाहून आपल्याला सरप्राइज मिळतं. संगीत, गाणी सुध्दा सिरिजच्या विषयाला साजेसे.
अभिनय: 'पंचायत 3' मध्ये पुन्हा एकदा सर्व कलाकारांनी जबरदस्त अभिनय करत फुलेरा गावाच्या कहाणीला नवा साज चढवला आहे. जितेंद्र कुमार, रघुवीर यादव, नीना गुप्ता, सानविका, चंदन रॉय अशा सर्व कलाकारांनी पुन्हा एकदा सहजसुंदर अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. जितेंद्र आणि सानविका यांची खुललेली केमिस्ट्री बघायला मजा येते. या सर्वांना पुन्हा एकदा सतावणारा बनराकस म्हणजेच भूषणच्या भूमिकेत दुर्गेश कुमार दिसतात. भूषणची चीड येईल अन् राग येईल असा अभिनय त्यांनी केलाय. या सर्व कलाकारांवर कडी केलीय ती म्हणजे प्रल्हादच्या भूमिकेत असलेल्या फैसल मलिक यांनी. मुलगा शहीद झाल्यानंतर आयुष्याला आलेली अस्वस्थ पोकळी फैसल यांनी अभिनयातून दाखवलीय. अनेकदा एकही संवाद नसूनही केवळ हावभवांनी फैसल आपल्या डोळ्यात पाणी आणतात. आणि जेव्हा प्रल्हाद एका सीनमध्ये खळखळून हसतो तेव्हा आपणही आनंदी होतो. इतकं आपण प्रल्हादसोबत स्वतःला जोडून घेतो. ही किमया फैसल मलिक यांच्या अभिनयाची आहे. बाकी छोट्या छोट्या भूमिकेत असलेले कलाकारही जबरदस्त अभिनय करून लक्षात राहतात.
चांगली बाजू: हलकीफुलकी कहाणी, कथेला असलेला इमोशनल टच, कलाकारांचा अभिनय, अनपेक्षित शेवटवाईट बाजू: संथ गती, कॉमेडीचा अभाव
अशाप्रकारे सरतेशेवटी एवढंच सांगेन जास्त अपेक्षा ठेवून गेल्यास 'पंचायत 3' पाहून तुम्ही निराश होण्याची शक्यता अधिक. पण एकदम शांतपणे सर्व एपिसोड बघितले तर तुम्हाला 'पंचायत 3' ची गंमत कळेल. प्रत्येकवेळी आपल्याला हवं तेच बघायला मिळेल, अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. कधीकधी दिग्दर्शक वेगळ्या पद्धतीने आपल्याला आयुष्याबद्दल काहीबाही सांगू पाहतोय. 'पंचायत 3' मध्ये सुद्धा असेच काही प्रसंग लपले आहेत. त्यामुळे सिरीज संपल्यावर एक अस्वस्थ चुटपुट मनाला लागते. याशिवाय चौथ्या सिझनमध्ये काय होणार याचे आडाखे आपण बांधायला सुरुवात करतो. हेच 'पंचायत 3' चं यश आहे.