जान्हवी सामंत१९६२ च्या चीनच्या आक्रमणानंतर भारताने लष्करीदृष्ट्या सक्षम होण्यासाठी, आपली संरक्षणसिद्धता जगाला दर्शविण्यासाठी १९९८ मध्ये पोखरण येथे अणुचाचण्या केल्या होत्या. ११ मे १९९८ रोजी राजस्थानातील पोखरण येथे एकाच वेळी ३ अणुस्फोट घडवून आणले होते तर १३ मे १९९८ रोजी पुन्हा दोन अणुस्फोट घडवून आणले होते. यास ‘आॅपरेशन शक्ती’ या नावानं आपण ओळखतो. याच धर्तीवर ‘परमाणू:स्टोरी आॅफ पोखरण’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तसं म्हटलं तर परमाणूच्या ट्रेलर्स आणि प्रमोशनमधून त्या चित्रपटाची गोष्ट कळते. ह्या भारत सरकारने आॅर्डर केलेल्या अत्यंत गुप्त चाचण्या कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या आव्हानांना सामोरे जाऊन केल्या ह्याचा आढावा घेणारा चित्रपट म्हणजे परमाणू. परमाणूची कथा १९९५ या वर्षापासून सुरू होते. भारत सरकारमध्ये रिसर्च आणि स्ट्रॅटेजी डिपार्टमेंटमधून आयएएस अधिकारी अश्वत रैना हे कथेचा सुत्रधार आहेत. अश्वत एका आर्मी आॅफिसरचा मुलगा असतो. खुप इच्छा असूनही अश्वतला आर्मीत दाखल व्हायला जमत नसते. पण, देशसेवा त्याच्या रक्तातच असते. १९९५मध्ये चीनचा न्युक्लीअर प्रोग्राम आणि अमेरिके च्या आधारामुळे पाकिस्तानच्या वाढत्या अरेरावीचे ठोस उत्तर म्हणून भारताने ही अणुचाचण्या कराव्यात, असा सल्ला रैना पंतप्रधानांच्या आॅफिसला देतो. ह्या चाचण्यांमुळे भारताची जगभरात मान वाढेल आणि भारताच्या शत्रुंनाही भारताच्या सबलतेचा निश्चित पुरावा मिळेल, असे रैना यांना वाटत असते. परंतु कमी वेळेत आणि आततायीपणा केल्यामुळे या अणुचाचण्या करण्यात असफल होतात. ह्यामुळे जगभरात भारताची बदनामी होते. ह्या अपयशामुळे रैना यांना काढुन टाकण्यात येते. आपल्या कुटुंबाला घेऊन रैना मसुरीला येऊन स्थायिक होतो. तीन वर्ष खूप दु:खात आणि नाराजीत रैना जगतात. परंतु, १९९८ मध्ये पंतप्रधान वाजपेयींच्या सेक्रेटरी हिमांशु शुक्ला (बोमण इराणी) परत रैना यांना एक प्रोजेक्ट देतात. परत पद्धतशीर आणि व्यवस्थितरित्या अमेरिकेचा डोळा चुकवून अणुचाचण्या आणि आपल्या देशाची मान उंच करायची जबाबदारी रैना यांना मिळते. इथून सुरू होते रैना यांची परीक्षा. आपल्या पांडवाची टीम गोळा करणे, त्यांच्या अनुभवाने अणुचाचणीसाठी पद्धतशीर तयारी करणे आणि सगळा प्रोग्राम व्यवस्थित पार पाडणे, हे रैनाचे ध्येय ठरते. ह्यात त्याला आणि टीमला खूप अडथळयांना सामोरे जायला लागतात, पाकिस्तानी आणि अमेरिकन गुप्तहेर, भारतीय राजकीय दबाव, अमेरिकन सॅटेलाइट अशा खुप अडचणी असतात. त्यांना सामोरे जाऊन कसे अश्वतची टीम आपली कामगिरी यशस्वीपणे पार पाडते ही परमाणुची गोष्ट आहे. चित्रपटाची आखणी थ्रिलरस्टाईलमध्ये केल्यामुळे तो जास्त तांत्रिक वाटत नाही. ही कथा ‘स्पेशल २६’,‘बेबी’,‘अ वेडनसडे’ चित्रपटांच्या स्टाईलमध्ये सांगितलेली आहे. तरीही पहिला भाग अश्वतच्या आयुष्यातील इतिहास सांगण्यात कंटाळवाणा होऊन जातो. सततचे देशसेवेचे धडेही थोडे रटाळ होऊन जातात. त्यामुळे सुरूवातीला हा चित्रपट खुप कंटाळवाणा वाटतो. परंतु दुसऱ्या भागानंतर चित्रपट अगदी मनोरंजक बनतो. १९९८ मध्ये पोखरणमध्ये नक्की काय झालं ह्याचे वास्तविक दृश्य आपल्याला बघायला मिळते. जॉन अब्राहम (अश्वत रैना) एका वेगळया भूमिकेत बघायला मिळेल. डायना पेंटी (अंबालिका), बोमण इराणी, मार्क बेनिंगटन, जचरी कॉफिन (स्टिफन) या कलाकारांचेही परफॉर्मन्सेस चांगले आहेत. थ्रिलर आणि राष्ट्रभक्तीचे मिश्रण असलेला अनोखा चित्रपट म्हणजे परमाणू असे म्हणायला हरकत नाही. जरूर पहावा.