'भगवान भी शायद इन्साफ का इंतजार कर रहा है', या संवादाप्रमाणे दिग्दर्शक जयप्रद देसाई पुन्हा हसीन दिलरुबाची रहस्यमय कहाणी घेऊन आले आहेत. चित्रपटात जरी तीन मुख्य कॅरेक्टर्स असली तरी अपेक्षेप्रमाणे चित्रपटाची कहाणीच खरा हिरो आहे. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या दोन जीवांची एकत्र येण्याची धडपड यात आहे.
कथानक : सिक्वेलमध्ये कथा ज्वालापूरहून आग्य्राला पोहाचली आहे. कारण राणी कश्यप आणि रिषभ सक्सेना इथेच आहेत. राणी महिलांना मेकअपचं काम करतेय, तर रिषूही तिच्या आसपास राहून थायलंडला पलायन करण्याचा प्लॅन आखत आहे. पहिल्या भागातील नीलचे काका पोलिस अधिकारी मृत्युंजय प्रसाद पुतण्याच्या हत्याऱ्याचा शोध घेण्यासाठी राणीच्या मागाावर आग्य्रात पोहोचले आहेत. त्यांच्यापासून वाचण्यासाठी राणी-रिशूची जोडी अभिमन्यू पंडीत नावाच्या तरुणाला मोहरा बनवतात, पण तो दोघांचाही बाप निघतो.
लेखन-दिग्दर्शन : कनिका धिल्लों यांनी पुन्हा एक उत्कंठावर्धक पटकथा लिहिली आहे. त्याला दमदार आणि संवादांची सुरेख जोड देण्यात आली आहे. छोट्या शहरातील वातावरण सुरेखरीत्या उभं केलं आहे. 'इंतजार से डर नहीं लगता, डर तो मुलाकात से लगता है', 'मैं तेरी हर जिद मान लूंगा, बस याद रखना इस झगडे में कोई तिसरा शामिल न हो', 'हम लाईफ में इतना गलत जा रहे है ना रानी, क्या लगता है प्यार में सही बैठेंगे...' असे बरेच संवाद लक्षात राहतात. काही ठिकाणी गती संथ झाल्यासारखी वाटते. पंडीतजी कहते है... हा बऱ्याचदा येणारा डायलॅाग कंटाळा आणू शकतो. पटकथेत व्यक्तिरेखांची अचूक पेरणी करत त्यांची एन्ट्री केली आहे. रहस्य अखेरपर्यंत उलगडू न देण्याचं काम चोख बजावलं आहे. 'हंसते हंसते...' या गाण्यासोबतच इतरही गाणी चांगली आहेत. राणी इतरांपेक्षा वेगळी आणि सुंदर दिसावी यासाठी कॅास्च्युमवर विशेष भर दिला आहे.
कलाकार : कलाकारांची निवड या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॅाईंट आहे. तापसी पन्नूने जणू पहिल्या भागाचं चित्रीकरण संपवून लगेच सिक्वेलला सुरुवात केल्यासारखं राणीचं कॅरेक्टर अचूक पकडलं आहे. जीवाची बाजी लावणाऱ्या रिषूच्या व्यक्तिरेखेत विक्रांत मॅसीने पुन्हा जीव ओतला आहे. सनी कौशलची व्यक्तिरेखा बऱ्याच ठिकाणी आश्चर्याचे धक्के देणारी असून ती त्याने अत्यंत संयतपणे साकारली आहे. त्याचा गेटअपही छोट्या शहरांतील तरुणांसारखा आहे. जिमी शेरगीलने साकारलेला हुषार पोलीस अधिकारीही चांगला झाला आहे. आदित्य श्रीवास्तव, तृप्ती खामकर, दुबे, आलोक पांडे, मानवेंद्र कुमार त्रिपाठी यांनी चांगली साथ दिली आहे.
सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, पार्श्वसंगीत, गीत-संगीत, कॅास्च्युमनकारात्मक बाजू : काही ठिकाणी संथ गती, तपासकार्यथोडक्यात काय तर हि संगीतप्रधान रोमँटिक क्राईम स्टोरी पुन्हा एकदा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. काही उणिवा असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकते.