Join us

आयुष्याचा सकारात्मक दृष्टिकोन...!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2016 6:12 PM

आयुष्यात घडलेल्या एका घटनेमुळे स्वतःच्या जीवाला कंटाळलेला केशवची कहाणी 'निवडुंग' सिनेमात मांडण्यात आली आहे.

Release Date: October 21, 2016Language: मराठी
Cast: भूषण प्रधान, संस्कृती बालगुडे, प्राजक्ता दिघे,
Producer: मीना शमीम फिल्म्सDirector: मुन्नावर शमीम भगत
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
        राज चिंचणकर          आयुष्यात घडलेल्या एका घटनेमुळे स्वतःच्या जीवाला कंटाळलेला केशव हा चित्रपटाचा नायक आत्महत्या करण्याच्या निमित्ताने एका दुष्काळी गावात येऊन पोहोचतो. योगायोगाने त्याला काशीबाई व तिची मुलगी सुगंधा यांच्या घरी आसरा मिळतो. पुढे त्याच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की तो एका वेगळ्या निर्णयाप्रत येऊन पोहोचतो. सुगंधाचे त्याच्या आयुष्यातले स्थान निश्चित करत एका सकारात्मकतेकडे हा चित्रपट वाट चालू लागतो. ही छोटीशी गोष्ट आहे 'निवडुंग' या चित्रपटाची आणि ती सांगत खऱ्या आयुष्याचा पट हा चित्रपट उलगडतो.        माणसांतले सच्चेपण, आपुलकी, वेदना आणि संवेदना या सगळ्याला स्पर्श करत ही कथा घडत जाते. मुन्नावर शमीम भगत यांची कथा व दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात मांडलेला विषय योग्य आहे; मात्र त्याचे सादरीकरण जुन्या पद्धतीचे असल्याने हा चित्रपट थेट सत्तर-ऐंशीच्या दशकातल्या मराठी चित्रपटांची आठवण करून देतो. मुळात, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये धोका पत्करलेला, सुशिक्षित, गजल गायक असा या चित्रपटाचा नायक एका झटक्यात थेट आत्महत्येचा निर्णय घेतो, हे सहज पचनी पडत नाही. त्याच्या गजल गायनाचा संदर्भही पुढे कुठेच लागत नाही. चित्रपटाची पटकथा आणि संवादलेखन करणाऱ्या महेंद्र पाटील यांची लेखणी या सगळ्याबाबत अजून टोकदार असायला हवी होती. बाकी शेतकऱ्यांचे जिणे, दुष्काळ असे प्रश्न हा चित्रपट मांडत जातो. सगळ्यात फोल ठरला आहे तो या चित्रपटातला खलनायक ! त्याला विनोदी ढंगात सादर केल्याने या व्यक्तिरेखेची माती झाली आहे. न पटणाऱ्या काही गोष्टींचा समावेशही चित्रपटात आहे आणि चित्रपटाच्या एकूणच सादरीकरणाला ते मारक ठरले आहे.        मग या चित्रपटात आहे तरी काय, याचा विचार केल्यास त्याचे उत्तर या चित्रपटाचे संगीत आणि अभिनयात सापडते. संगीतकार रफिक शेख यांनी चित्रपटात योग्य अशी गाणी दिली आहेत आणि ती कथेत चपखल बसली आहेत. चित्रपटात सुगंधा रंगवणाऱ्या संस्कृती बालगुडे हिला चक्क नॉन-ग्लॅमरस रूपात पेश करण्याचे केले गेलेले धाडस तिने अजिबात वाया जाऊ दिलेले नाही. या अवतारातही तिने तिची छाप पाडत ही सुगंधा चांगली साकारली आहे. भूषण प्रधान याने यातला केशव मनापासून रंगवण्याचा केलेला प्रयत्न दिसून येतो. मात्र या भूमिकेत त्याला फार काही करण्यास वाव मिळालेला नाही. प्राजक्ता दिघे यांनी मात्र काशीबाईच्या भूमिकेत अनुभवाचे चार चाँद लावले आहेत. शेखर फडकेचा खलनायक लेखनातच बारगळल्यामुळे ही भूमिका करताना त्याची गोची झाली असावी हे स्पष्ट दिसते. एकूणच, कथा व पटकथा बळकट असती आणि दिग्दर्शकीय कौशल्य अधिक वापरले गेले असते, तर या निवडुंगावर नक्कीच सुगंधी फुले उमलली असती.