सध्या मराठीत दर आठवड्याला खोऱ्याने सिनेमा येत आहेत. सिनेमांचा दर्जाही वाढला आहे. मात्र एखाददुसरे अपवाद सोडले तर मराठी सिनेमांच्या पटकथांवर मेहनत करण्यात आजही अनेकजण अपयशी ठरत आहेत हे दुर्देवाने नमूद करावेसे वाटते. लेखक,दिग्दर्शक शशांक उदापूरकर यांच्या प्रवास या सिनेमाचंही तसंच झालंय. मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्येही एखाद्या सिनेमात दिग्गज कलाकार असले ,त्यांचा अभिनयही तोडीस तोड असला तरी पटकथेतच दम नसेल तर सिनेमा अक्षरक्ष कोसळतो. प्रवासची वाट ही त्याच्या पटकथेमुळे आणि दिर्ग्दशनामुळे अडखळती झाली आहे. अशोक सराफ ,पद्मिनी कोल्हापुरे असे दिग्गज कलाकार सिनेमात असूनही कथेतील आणि पटकथेतील ढिसाळपणामुळे हा प्रवास आपल्याला आनंद देत नाही.प्रवासची कथा ही तशी फार जुनी नसली तरी गोष्टीत नाविन्य आहे. मात्र गोष्टीला मूर्त स्वरूप देण्यात शशांक उदापूरकर कमी पडलेत. जे शेष आहे ते विशेष आहे ही या सिनेमाची टॅगलाईन . या सिनेमाचे मुळात सारच या एका वाक्यात आहे. अभिजात इनामदार ( अशोक सराफ) आता आपलं निवृत्तीनंतरचं आयुष्य आपली बायको लता इनामदार (पद्मिनी कोल्हापुरे) यांच्यासोबत व्यतीत करतायत. एकुलता एक मुलगा दिलीप इनामदार (शशांक उदापूरकर) नोकरीनिमित्ताने अमेरिकत राहतो. आयुष्यभर कुटुंबासाठी झटणारे अभिजात इनामदार आयुष्यातील शेवटच्या इनिंगमध्ये आता थकलेत. दोनही किडण्या निकामी झाल्याने आठवड्यातून दोन दिवस त्यांना सक्तीने डायलिसीस घेणे गरजेचे आहे. त्यांचं शरीर जरी थकलेलं असलं तरी त्यांनी जगण्याची उमेद सोडलेली नाही. आयुष्यात कामानिमित्ताने आपल्या आवडीनिवडी ,इच्छा आकांक्षा पूर्ण करू न शकलेला अभिजात एका प्रसंगानंतर आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यास सुरवात करतो. आपल्या खाजगी गाडीला रूग्णवाहिका बनवून गरजूंसाठी मोफत सेवा देण्याचं काम अभिजात सुरू करतो. आजाराने त्रस्त असला तरी गरजूंना मदत करताना मिळणाºया आत्मिक समाधानाने अभिजात आपलं आजाराचं दुख कायमचं विसरतो. या त्याच्या धडपडीचा सुरवातीला लताचा थोडासा विरोध असतो मात्र अभिजातसोबत त्याचं हे काम पाहिल्यावर तिला ही त्याच्या गरजूंना आधार देण्याच्या वृत्तीचा अभिमानच वाटतो. उतारवयात आजाराने त्रस्त असूनही अभिजातने घेतलेला हा निर्णय योग्य असतो का ? त्याने निस्वार्थी वृत्तीने समाजासाठी जे काम केलं आहे त्यात टप्प्या टप्प्यावर काय काय प्रसंग घडतात ? या प्रसंगांचा ,अनुभवांचा अभिजातच्या आयुष्यावर खरंच परिणाम घडतो का ? हे पाहण्यासाठी तुम्हांला हा प्रवास अनुभवावा लागेल.
प्रवासची गोष्ट नाविन्यपूर्ण असली तरी या कथेला एकसंध बांधण्यात शशांक उदापूरकर सपशेल अपयशी ठरलेत. ही या सिनेमाची सर्वात मोठी कमतरता आहे. सिनेमातील कथेचा जीव फारच छोटा आहे. दिग्दर्शकाने वाढीव प्रसंग वाढवून या सिनेमाची लांबी वाढवण्यासाठी त्यात पाणी घातलंय. या पाणी घातलेल्या प्रसंगांनाच संकलकाने कात्री लावली असती तर सिनेमाचा परिणाम ह्यापेक्षा जास्त असता. सिनेमातील संवांदही अतिशय लांबलचक आणि शब्दबंबाळ आहेत. पात्रांच्या तोंडी अतिशय भरगच्च वाक्य प्रत्येक प्रसंगात असल्याने काहीवेळानंतर त्याचा अतिशय कंटाळा यायला लागतो. दिग्दर्शकाला या कथेचा जो अपेक्षित परिणाम साधायचा आहे तो त्याला सिनेमात आणि सादरीकरणात अजिबात साधता आलेला नाही. सुरेश देशमाने यांच्या कॅमेºयाने सिनेमा जरी सुंदर दिसत असला तरी शाब्दिक बडबडीत अडकल्याने ही सुंदरताही नंतर आपल्याला फारशी परिणाम साधून देत नाही. शशांक उदापूरकर यांचा प्रयत्न जरी चांगला असला तरी त्यांच्याकडून अभिनयातही आणि दिग्दर्शनातही अजून खूप अपेक्षा आहेत. सिनेमाचं संगीत सलीम-सुलेमान या जोडीमुळे श्रवणीय असलं तरी या पार्श्वसंगीताचा कधी कधी अती वापर करण्यात आला आहे. प्रवासचं शीर्षक गीत अतिशय श्रवणीय आहे. मात्र काही गाण्यांची खरंच गरज या कथेला होती का असा प्रश्नही पडतो.
अशोक सराफ हे दिग्गज अभिनेते आहेत ह्यात काही नवीन नाही . मात्र अश्या दिग्गज अभिनेत्याला त्यांच्या अभिनय क्षमतेनुसार कथा आणि भूमिका मिळत नाही हे फार खेदाने म्हणवासं वाटतं. तरीही अभिजात हे पात्र अशोक सराफ यांनी आपल्या नेहमीच्या शैलीनुसार एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे. आजाराने त्रस्त असला तरी आपल्या नवीन इनिंगमध्ये वेगळीच खेळी खेळणारा अभिजात अशोक सराफांनी उत्तम रंगवला आहे. अशोक सराफांप्रमाणेच लता इनामदार हे पात्र पद्मिनी कोल्हापुरेंनी तितकंच उत्तम साकारलं आहे. आपल्या पतीच्या निर्णयात योग्य साथ देणारी पत्नी पद्मिनी कोल्हापुरेंनी उत्तम साकारली आहे. बाकी डॉक्टरच्या भूमिकेत विक्रम गोखले, रजित कपूर यांनीही आपल्या छोट्या भूमिका उत्तम रंगवल्या आहेत. एकंदरीतच पटकथा आणि दिग्दर्शनात कमी पडलेला हा प्रवास वळणावळणाचा, शब्दबंबाळ आणि रेंगाळलेला झालेला आहे.