जान्हवी सामंतशाहरुख खान याची मुख्य भूमिका असलेला ‘रईस’ रिलीज व्हायला आता काही तास राहिले आहेत. राहुल ढोलकिया दिग्दर्शित, फरहान अख्तर व रितेश सिधवानी आणि गौरी खान निर्मित या चित्रपटात माहिरा खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतेय. गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या ‘रईस’ची बॉक्सआॅफिसवर फाईट होणार आहे ती हृतिक रोशनच्या ‘काबिल’सोबत. चित्रपटगृहात ‘रईस’ पाहायला जाण्यापूर्वी जावे की नाही, या संभ्रमात असाल तर ही या चित्रपटाची ही समीक्षा तुम्हाला वाचायलाच हवी. रईस ही कथा एका रईस (शाहरुख खान) या अवैध दारू गाळणाºया मद्यतस्कराची आहे. ज्याच्या मनात उद्योगाबाबत विचार सुरू असतात. गुन्हेगारीचे वास्तव्य असलेल्या गुजरातमधील फतेहपुरा येथील एका गरीब भंगारवालीच्या घरी रईसचा जन्म होतो. लहानपणापासूनच त्याची अम्मी त्याला सल्ला देते ‘कोई धंदा छोटा नही होता और धंदे से बडा कोई धर्म नही होता’. तिच्या या वाक्यापासून प्रेरणा घेऊन तो जयराजसोबत दारूधंद्याचे अवैध साम्राज्य उभे करतो. रईस हा आपल्या हुशारीने जयराजसोबत त्याचा व्यवसाय वाढवितो. ज्यावेळी रईस स्वत:चा वेगळा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवितो, त्यावेळी त्याचे आणि जयराजचे शत्रुत्व निर्माण होते. या व्यवसायात सुरुवातीच्या काही अपयशानंतर रईसचा व्यवसाय वाढीस लागतो. त्याचवेळी रईसची एका प्रामाणिक पोलीस अधिकारी मजुमदार (नवाजुद्दीन सिद्दीकी) याच्याशी त्याची गाठ पडते. रईसला अटक करण्याचे प्रयत्न अयशस्वी होतात. यानंतर मात्र मजुमदारला रईसच्या अटकेसाठी आणखी त्वेष चढतो.रईसच्या अटकेचा कट आणखी संघर्षमय आणि गुंतागुंतीचा होतो. व्यवसायाच्या नावाखाली रईस त्याची ताकद अजून वाढवितो. मध्यंतरापर्यंत रईसचे पात्र हे त्याच्या हुशारीबाबत, धंद्यातील अडचणी, त्याचा दयाळूपणा आणि लोकांबाबतचे त्याचे प्रेम याची महती सांगते. तथापि, मध्यंतरानंतर हे पात्र गुंतागुंतीचे आणि गतीमान होते. कथा वेगाने सांगण्याच्या कचाट्यात सापडते. थोडक्यात रईस हा टिपीकल शाहरुख खानच्या पठणीतल्या चित्रपटासारखा नाही, असे म्हणता येईल. यामध्ये त्याच्या नेहमीच्या ब्लॉकबस्टर चित्रपटासारखा मसाला नाही. हा केवळ सत्यासारखा असंबद्ध अथवा वास्तव नसून अग्निपथसारखा स्टायलिश आणि बिनधास्तही आहे.तथापि रईसला हिरो करण्याच्या नादात आणि नि:स्वार्थीपणाच्या प्रयत्नात हा चित्रपट दर्शकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होत नाही. रईसच्या माध्यमातून दिग्दर्शक राहुल ढोलकिया हे ८० आणि ९० च्या दशकात निर्माण झालेले दयावान, काला पत्थर आणि अग्निपथसारख्या चित्रपटांची आठवण करून देतात. जुन्या पाश्चात्य पद्धतीचे पार्श्वसंगीतही आहे. शाहरुख खान हा नेहमी शहरीपद्धतीचा शिकलेला रोमँटिक हिरो म्हणून आपल्याला दिसतो. एसआरकेने आपली इमेज बदलताना तो हिंसाचारी, आक्रमक गँगस्टर म्हणून संपूर्ण चित्रपटात दिसतो. मोहम्मद झिशान अय्युब याने अत्यंत शांत संयमी भूमिका केली आहे. नवाजने त्याच्या शत्रूची भूमिका सहजगत्या साकारली आहे. या संपूर्ण चित्रपटात माहिरा खान ही एकमेव चुकीच्या भूमिकेत दिसून येते. त्याशिवाय एसआरकेच्या चित्रपटाप्रमाणे संगीत देखील नाही.