- जान्हवी सामंतसन १९८१ मध्ये लखनौतील एका हाय- प्रोफाईल धाडीच्या घटनेवर आधारित ‘रेड’ हा चित्रपट आज शुक्रवारी चित्रपटगृहांत रिलीज झाला. ‘हिरो हमेशा यूनिफॉर्म में नहीं आते,’अशी टॅग लाईन असलेल्या या चित्रपटात अजय देवगण आयकर अधिकारी बनून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतोय. मनोरंजनाच्या कसोटीवर हा चित्रपट किती खरा उतरला ते जाणून घेऊ यात....काळा पैसा हा मुद्दा गेल्या दोन-तीन वर्षांत प्रचंड चर्चेत आहे. राजकारण्यांसह अनेक बड्या उद्योगपतींंनी वेड्या वाकड्या मार्गांनी कमावलेले काळे धन आणि ते लपवण्यासाठी केलेला खटाटोप,करबडवेगिरी याच्या अनेक कथा आपण अनेकदा ऐकल्या आहेत. भिंतीत, गाडीत, धान्यांच्या गोणीत दडवून ठेवलेला हा काळा पैसा आयकर अधिका-यांनी कसा शोधून काढला, याच्या सुरस कथांनी रंगलेल्या ८०-९० च्या दशकातील बातम्यांही आपल्यासाठी नव्या नाहीत. ‘रेड’ हा चित्रपट अशाच एका धाडसी आयकर धाडीवर बेतलेला, एका साहसी आयकर अधिका-याची सत्यकथा आहे.अमेय पटनाईक (अजय देवगण) हा एक सच्चा आणि साहसी आयकर अधिकारी असतो. आपल्या या प्रामाणिकपणाची पुरेपूर किंमतही त्याला मोजावी लागली असते. उण्यापु-या सात वर्षाच्या करिअरमध्ये त्याच्या ४९ बदल्या झालेल्या असतात. या बदल्या अमेयची पत्नी मालिनी (इलियाना डिक्रूज) हिच्याही अंगवळणी पडल्या असतात. इतक्या की,बि-हाड बांधून बदलीसाठी ती अगदी तयार असते. लखनौमध्ये अमेय बदलून येतो. नवी नवी बदली असताना येथील एक स्थानिक नेता रामेश्वर सिंग (सौरभ शुक्ला)याच्या घरी अमाप निनावी माया दडवून ठेवली असल्याची गुप्त माहिती त्याला मिळते आणि इथून कथा सुरू होते. या गुप्त माहितीनंतर अमेय लगेच कामाला लागतो आणि थोड्याच दिवसांत आयकर विभागच्या वरिष्ठाकडून रामेश्वरच्या घरी धाड टाकण्याची परवानगीही मिळवतो. पण रामेश्वरच्या व्हाईट हाऊस नावाच्या बंगल्यावर धाड टाकायची म्हटल्यावर अमेयचे अर्ध्या आयकर अधिका-यांची पार घाबरगुंडी उडते. पण अमेय मागे हटणा-यांपैकी नसतोच. या धाडीमुळे आपल्याला, आपल्या टीमला आणि आपल्या कुटुंबाला धोका आहे, हे कळूनही अमेय मात्र धाडीच्या निर्णयावर ठाम असतो. तिकडे रामेश्वरही गप्प बसणा-यांपैकी नसतो. धाड टाकण्यासाठी आलेल्या अमेयचा तो जिव्हारी लागणारा अपमान करतो आणि माझ्याकडे काळा पैसा असेल तर शोधून दाखवचं, असे उघड आव्हान त्याला देतो. अमेय हे आव्हान स्वीकारतो आणि प्राण पणाला लावून रामेश्वरच्या घराची झडती घेतो. या धाडीत अमेयच्या हाती काही लागत का? रामेश्वर सिंग या अपमानाचा बदला कसा घेतो? या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर तुम्हाला चित्रपटगृहात जावूनच चित्रपट बघावा लागेल.चित्रपटाबद्दल सांगायचे तर दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांनी आपल्या ‘आमिर’ आणि ‘नो वन किल्ड जेसिका’ या यापूर्वी आपण पाहिलेल्या चित्रपटांच्या ढंगानेच ‘रेड’ साकारला आहे. या वास्तवदर्शी चित्रपटात विनोद केवळ नावापुरताचं पाहायला मिळेल. पण जितका काही विनोद आहे, तो लाजवाब आहे. चित्रपटाच्या सुरूवातीला आयकर विभागातील गमतीजमती, धाडीचे नियम आणि अमेय व रामेश्वर सिंग यांचे सुरूवातीचा शाब्दिक संघर्ष मनोरंजक आहे. पण यानंतर थोड्याच वेळात चित्रपटाची गती मंदावते. संपूर्ण चित्रपटात केवळ एकाच धाडीवर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याने हळूहळू चित्रपट संथ होत जातो आणि मध्यांतरापर्यंत तोच तोचपणा पाहून काहीसा कंटाळा यायला लागतो. दुसºया भागात रामेश्वर आपल्या घरातील धाडीची कारवाई थांबवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. पण काहीच मिनिटांत ही दृश्येही कंटाळा आणायला लागतात. मुळात चित्रपटाच्या सुरूवातीपासून अमेय हा आयकर अधिकारी असा काही रंगवले गेलेयं की, त्याचा पराभव होईल,अशी पुसटशी शंकाही प्रेक्षकांच्या येत नाही. त्यामुळे चित्रपटाची कथा कुठल्या वळणाला जाईल, याची कल्पना आधीच येते. अडीच तास खेचण्यासारखे चित्रपटात काहीही नाही. अर्थात तरीही चित्रपट एकदा पाहायला हरकत नाही.