-चित्राली चोगले
गोष्ट तशी आपल्या ओळखीचीच. म्हणजे या गोष्टीतली पात्र तशी फार काही नवीन नाहीत आपल्यासाठी. अहो, सोळा वर्षांपूर्वी फुरसतगंजमध्ये बंटी आणि बबली यांना भेटल्याचं आठवत असेल तुम्हाला. त्यांचीच गोष्ट आहे ही ‘बंटी और बबली 2’. गोष्ट सुरु सुद्धा तिथेच होते जिथे 2005 मध्ये सिनेमाचा प्रिक्वेल ‘बंटी और बबली’ संपला होता. ओरिजनल बंटी-बबली आणि अचानक त्यांच्या आयुष्यात येणारे ज्युनियर बंटी-बबली सोबत धमाकेदार ट्विस्ट. त्यामुळे ही ओरिजनल बंटी-बबलीची जोडी आजही तितकीच हिट आहे का पाहा.
तर गोष्टीची सुरुवात तर होते ती बंटी बबली स्टाईल मध्ये घडणाºया एका मोठ्या फसवणुकीने. पण ही फसवणूक आपल्या ओरिजनल बंटी-बबलीने केलेली नसते कारण दुसरीकडे आपले हे ओरिजनल बंटी-बबली म्हणजेच राकेश आणि विम्मी त्यांच्या दैनंदिन आयुष्यात आणि संसारात गुंतलेले असतात. बंटी-बबली स्टाईलने फसवणूक करणं सोडून देऊन त्यांना दहा वर्षे उलटली आहेत पण असं असताना सुद्धा जेव्हा पुन्हा एकदा बंटी-बबली स्टाईलने फसवणुकीचे कारभार समोर यायला लागतात, पोलिसांसाठी पहिलं टार्गेट असतं ओरिजनल बंटी आणि बबली. अचानक आयुष्यात आलेला हा नवा ट्विस्ट आणि आपली आयडेंटिटी चोरु पाहणारे नवीन बंटी आणि बबली यानंतर राकेश आणि विम्मी यांचं आयुष्य काही क्षणात बदलतं आणि तिथेच सिनेमाला खरी सुरुवात होते. हे ज्युनिअर बंटी-बबली आणि ओरिजनल बंटी-बबली एकमेकांसमोर उभे ठाकणार तेव्हा काय घडणार? ओरिजनल बंटी-बबली शेरास सव्वाशेर ठरणार की जूनियर बंटी-बबली त्यांच्या तोंडचा घास पळवणार? पोलिसांचा या सगळ्यात काय गोंधळ उडणार? हे आणि असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील ना? या प्रश्नांची उत्तरं मिळवायची तर ‘बंटी और बबली 2’ पाहावा लागेल. आता तो पहायचा की नाही, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सिनेमाची सुरुवात तर अगदी फ्रेश स्टाईलने होते कारण जूनियर बंटी-बबली म्हणजेच अभिनेता सिद्धांत चतुवेर्दी आणि अभिनेत्री शर्वरी वाघ यांचा स्क्रीन प्रेझेन्स एकदम मस्त वाटतो. पण मग जसं आम्ही सांगितलं की सिनेमाची खरी सुरुवात होते ती ओरिजनल बंटी-बबली बॅक इन अॅक्शन येतात तेव्हापासून. त्यात पहिलाच सिक्सर लावलाय तो राणी मुखर्जीने. 2005 मध्ये साकारलेली विम्मी म्हणजेच बंटी आणि तिची स्टाईल तुम्हाला आठवत असेलच. कॉलरवाला कुर्ता, तिचा तो झोला आणि तिचा पंजाबी ठसका. नवीन आणि हटके स्टाइल घेऊन 2021 मधली बंटी म्हणजेच मिम्मी त्रिवेदी आपल्यासमोर अवतरते आणि अगदी पहिल्या फ्रेमपासून ते शेवटच्या फ्रेमपर्यंत राणी मुखर्जी ही ओरिजनल बंटी का आहे, ते अगदी तो-यात, तिच्या स्टाईलमध्ये आणि तिच्या पंजाबी ठसक्यात अगदी सहज सांगून जाते. राणी मुखर्जीने सिनेमा खाल्ला आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आता राहिली गोष्ट बंटीची, तर सिनेमा पाहायला जाण्याआधीच ओरिजनल बंटी सिनेमात नाही याची रुखरुख लागलेली असते आणि हा नवीन बंटी आपल्या बबलीला तोडीस तोड ठरेल का? त्याकडे लक्ष लागलेलं असतं. आमचं ही तसंच झालं होतं आणि खरं सांगायचं तर सिनेमा पाहताना ओरिजनल बंटी म्हणजे अभिषेक बच्चनला अनेक ठिकाणी आम्ही फार मिस केलं. सैफने खूप चांगला प्रयत्न केला आहे ओरिजनल बंटी बनण्याचा पण कुठेतरी हा शिवधनुष्य पेलण्यात सैफ जरा मागे पडलाय असं सारखं वाटलं. राणी आणि सैफची केमिस्ट्री तशी छान जुळून आली आहे त्यामुळे काही ठिकाणी बंटीची कमी तेवढी जाणवत नाही पण तरीसुद्धा ओरिजनल बंटी असता तर? असा प्रश्न मनात येतोच. या सीनिअर बंटी-बबलीच्या जोडीमध्ये बंटी उजवी ठरते हे मात्र नक्की.
दुसरीकडे ज्युनियर बंटी-बबलीचं बोलायचं झालं तर एमसी शेर म्हणून लोकप्रिय ठरलेला सिद्धांत चतुर्वेदीने ज्युनियर बंटी छान निभावलाय. त्याची बॉडी लैंग्वेज, त्याचा स्क्रीनवरचा वावर आणि त्याचा अभिनय, या सगळ्याचा उत्तम उपयोग करत हा बंटी प्रेक्षकांपर्यंत उत्तमरित्या पोहोचवण्याचं काम सिद्धांतने केलंय. तिकडे जुनियर बबली म्हणजे ‘क्या बात’. बॉलीवूडमध्ये झळकणारी ही मराठमोळी शर्वरी आणि तिचा अंदाज एकदम हिट आहे. तिच्या अभिनयातील विविध छटा आणि त्या सहज जी निभावणारी शर्वरी मनात घर करून जाते. ज्युनिअर बंटी-बबलीच्या जोडी मध्ये सुद्धा बबली थोडी उजवी वाटते हे निश्चित. ज्युनियर बंटी-बबलीने ओरिजनल बंटी-बबलीला टफ फाईट नक्कीच दिली आहे.
या चौघांमुळे सिनेमाची पकड तशी कुठेच सैल होत नाही. इंटरवलच्या आधीचा सिनेमाचा पेस छान जमलाय. इंटरवलनंतर कुठेतरी सिनेमा रेंगाळतोय असं वाटतं पण कलाकारांनी तो उचलून धरला. सिनेमात अनेक जमेच्या बाजू आहेत आणि त्यातील एक जमेची बाजू म्हणजे त्यातील कलाकार. हे चौघे सोडले तर सिनेमात अजूनही कलाकार आहेत ज्यांनी सिनेमाला ती गमतीशीर आणि कथेला ती पूरक बाजू दिली आहे. सिनेमाच्या प्रीक्वेलमध्ये अतिशय लोकप्रिय पात्र साकारलेले ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा पुन्हा एकदा सिनेमात त्याच भूमिकेसाठी परतताना दिसतात. याशिवाय सुद्धा सिनेमात एक धमाल कॅरेक्टर आहे आणि ते म्हणजे 2005 मध्ये सिनेमाच्या शेवटाकडे दिसलेला पप्पू. बंटी आणि बबली म्हणजेच राकेश आणि वीम्मीचा हा दहा वर्षांचा लेक पप्पू सिनेमात बरीच मज्जा आणि धमाल आणतो. आता हे सगळं वाचल्या नंतर तुम्हाला एका गोष्टीची कमी नक्कीच जाणवली असेल ती म्हणजे दशरथ सिंगची. ‘बंटी और बबली’ मध्ये दशरथ सिंग आहे की नाही? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अमिताभ बच्चन यांनी साकारलेला दशरथ तर नाहीये पण दशरथ सिंगच्या जागेवर एक पोलीस अधिकारी सिनेमात आहे आणि तो साकारलाय पंकज त्रिपाठी यांनी. बिग बी यांनी सिनेमात आणलेली धमाल तर आपण नक्कीच मिस करतो पण पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या परीने सिनेमा तारुन नेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.
अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर सिनेमात ओरिजनल बंटी-बबली पैकी बबलीने सिनेमा उत्तम जमून आणलाय. तिला साथ लाभली आहे ती ज्युनियर बबलीची. राणी मुखर्जीची स्टाइल 2005 मध्ये जितकी गाजली होती तितकी पुन्हा गाजली तर नवल नसावं. सैफ अली खान सिनेमा ठीक ठाक वाटला आहे. सिद्धार्थ चतुर्वेदीने मात्र उत्तम काम केलं आहे. हा सिनेमा एक धमाल राईड नक्कीच ठरतो. पूर्ण फॅमिलीसोबत पहावा असा हा सिनेमा हा नक्कीच आहे. काही ठिकाणी सिनेमाच्या कथानकात त्रुटी आहेत. त्यामुळे कुठेतरी सिनेमा रेंगाळतो खरा पण अगदी शेवटाकडे जाताना सिनेमात आणलेला ट्विस्ट पाहून मज्जा येते. पूर्ण अनुभव सांगायचा झाला तर सोळा वर्षांनतर सुद्धा ‘बंटी और बबली’ची जोडी चुना लावण्यात हिट ठरते.