श्वेता पांडे
रणवीर सिंगचा आणि सारा अली खानचा 'सिम्बा' आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'सिम्बा' हा टिपिकल रोहित शेट्टी स्टाईल सिनेमा आहे. एक डॅशिंग हिरो आणि सुंदर हिरोईन यांच्यासोबत डान्स, अॅक्शन, कॉमेडी, रोमांसचा डबल धमाका म्हणजे सिम्बा. फ्रेममध्ये जेव्हा सिम्बासोबत सिंघम आला तेव्हा थिएटरमध्ये टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा एकच आवाज होतो.
ही गोष्ट आहे संग्राम भालेराव उर्फ सिम्बाची (रणवीर सिंग) जो अनाथ मुलगा आहे आणि 'सिंघम' म्हणजेच बाजीराव सिंघमच्या शिवगढ गावातला आहे. त्याचे स्वप्न असते पोलिस होण्याचे ज्याला पॉवर आणि पैसा कमवायचा असतो. तो आपलं हे स्वप्न पूर्णदेखील करतो आणि बेईमानी पण पूर्ण इमानदारीने करतो. याचदरम्यान त्याचे पोस्टिंग गोव्यातल्या मिरामारमध्ये होते जो परिसर दुर्वा रानडे (सोनू सूद)चा असतो.
जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी सिम्बा दुर्वा रानडेशी हातमिळवणी करतो. सिम्बाला त्याच्या पोलिस ठाण्यासमोर चाहाची टपरी चालवणाऱ्या शगुन (सारा अली खान)शी प्रेम होते. सिम्बा आयुष्यात सगळं स्वप्नासारखं घडत असताना अचानक एक घटना घडते ज्यामुळे त्याच्या आयुष्यात एक मोठे वादळ येते. ज्या दुर्वाशी त्याने पैशासाठी हितमिळवणी केली असते आता तोच त्याचा शत्रू बनतो. पुढे काय होते हे पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जावं लागेल.
'सिम्बा' हा तेलुगू 'टेम्पर' सिनेमाचा ऑफिशियल रिमेक आहे, मात्र संपूर्ण सिनेमावर रोहित शेट्टीची छाप आहे. सिनेमाचा फर्स्ट हॉफ कॉमेडीचा डोस आहे तर सेकेंड हॉफ जरबदस्त अॅक्शन सीक्वेंसचा. सिनेमा रंजक बनवण्याच्या नादात रोहित शेट्टीने सिनेमाची गती मात्र फारच हळू केली आहे. सिनेमात सामाजिक संदेश देण्यासाठी काही 'निर्भया हत्याकांड'सारख्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. 'सिंघमा'च्या (अजय देवगण) एंट्रीने एक नवा ट्विस्ट सिनेमात येतो. नेहमीच्या गोष्टीला रोहित शेट्टी टाईपने तडका लावण्यात आला आहे. सिनेमॅटोग्राफी ही सिनेमाच्या जमेची बाजू आहे.
अजयनंतर अक्षय कुमारची एंट्रीदेखील आहे, त्यामुळे यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते रोहित शेट्टीला आता अक्षय कुमारसोबत नवा प्रोजेक्ट करायचा आहे. रणवीर सिंगने या सिनेमात जीव ओतून अभिनय केला आहे असे म्हटले तर वावगे ठरणारा नाही. रणवीरचा मराठी अंदाज प्रेक्षकांचा चांगलाच भावला आहे. मात्र काही सीन्समध्ये त्याने ओव्हर अॅक्टिंग केल्याचे ही जाणवते. साराबाबत बोलायचे झाले तर तिला सिनेमात करण्यासाठी फारसा काही वाव नाही आहे. मात्र तरीही तिने तिच्या वाटेला आलेली भूमिका चोख बजावली आहे. सोनू सूद आणि आशुतोष राणाने आपली भूमिका चांगली साकारली आहे. तर सिद्धार्थ जाधव आपल्या कॉमेडी अंदाजात रसिकांना खिळवून ठवतो. सिम्बाच्या संगीत मनाचा ठेवा घेणारे नसले तरी 'आंख मेरे', 'तेरे बिन' आणि 'आला रे आला' ही गाणी रिलीजच्या आधीपासूनच रसिकांच्या ओठांवर रुळली आहेत.