Join us

redu marathi movie review: रेडूची मजेशीर गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 10:58 AM

रेडू या चित्रपटात शशांक शेंडे, छाया कदम, विनम्र भाबल, गौरी कोंगे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Release Date: May 18, 2018Language: मराठी
Cast: शशांक शेंडे, छाया कदम, गौरी कोंगे, विनम्र भाबल, मृण्मयी सुपल
Producer: नवल फिल्म्स नवलकिशोर सारडा , ब्लिंक मोशन पिक्चर्स प्रा. लिDirector: सागर छाया वंजारी
Duration: २ तास १० मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स
प्राजक्ता चिटणीस कधीकधी आर्थिक परिस्थितीमुळे एखादी वस्तू घेणे आपल्या परवडत नाही. पण ती वस्तू आपण घ्यावी असे आपल्या मनात सतत सुरू असते आणि तीच वस्तू कोणी आपल्याला दिली तर आपल्या आनंदाला पारावर उरत नाही. रेडू या चित्रपटात देखील रेडिओसाठी वेड्या असणाऱ्या एका माणसाची कथा आपल्याला पाहायला मिळते. आपण कधी रेडिओ घेऊच शकत नाही असे या व्यक्तिला वाटत असते. पण तोच रेडिओ त्याच्या आयुष्यात आल्यानंतर हा रेडू त्याच्या आयुष्याचा भाग कसे बनतो हे मजेशीरपणे दिग्दर्शकाने चित्रपटात मांडले आहे.एका छोट्याशा गावात राहाणाऱ्या तातू (शशांक शेंडे) आणि छाया (छाया कदम) या जो़डप्याची परिस्थिती अतिशय बेताची असते. मोलमजुरी करून ते कसेबसे घर चालवत असतात. तात्याला रेडिओविषयी प्रचंड आकर्षण असते. रेडिओचा आवाज देखील कुठे ऐकायला मिळाला तर ते त्या दिशेने जात असतात. पण रेडिओ घेणे आपल्या आवाक्यात नाही याची त्यांना चांगलीच कल्पना असते. एकदा त्यांच्या घरी त्यांच्या बायकोची बहीण सुमन (गौरी कोंगे) आणि तिचा नवरा बबन (विनम्र भाबल) येतो. ते दोघे मुंबईत राहात असतात आणि त्यांची आर्थिक परिस्थिती तातूच्या तुलनेत खूपच चांगली असते. ते मुंबईवरून येताना एक रेडिओ घेऊन येतात. तो रेडिओ पाहून तात्या खूप खूश होतो. खरे तर त्या दोघांचे येणे तात्याला आवडलेले नसते. पण त्यांचा हा रेडिओ पाहून त्यांचा तो खूपच चांगला पाहुणचार करतो. काही दिवसांनी बबन आणि सुमन मुंबईला परत जायला निघतात. त्यावेळी तात्या प्रचंड दुःखी होतो. बबन आणि सुमन जाणार यापेक्षा त्याचा रेडिओ त्याच्यापासून दूर जातो यामुळे त्याला अधिक वाईट वाटत असते. पण परतताना बबन रेडिओ तात्याला देऊन जातो. रेडिओ कायमचा तात्याचा झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय काय घडते याची मजेशीर गोष्ट दिग्दर्शक सागर छाया वंजारीने मांडली आहे.एका साध्या गोष्टीद्वारे एक खूप चांगला संदेश रेडू या चित्रपटात देण्यात आला आहे. चित्रपटाची कथा खूपच वेगळी आणि चांगली आहे. शशांक शेंडे आणि छाया कदम यांनी तर अफतालून अभिनय केला आहे. विनम्र भाबल आणि गौरी कोंगे यांच्या भूमिका छोट्या असल्या तरी ते दोघेही लक्षात राहातात. या चित्रपटाचे सगळेच संवाद हे मालवणीत असल्याने मालवणी भाषा येत नसल्यास चित्रपटातील काही पंचलाइन कळत नाही. त्यामुळे चित्रपटाचे संवाद मराठीत असते तर एक चांगला विषय अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आला असता असे चित्रपट पाहाताना नक्कीच वाटते. चित्रपटाची मांडणी दिग्दर्शकाने खूपच चांगल्याप्रकारे केली आहे. रेडू या चित्रपटातील सगळ्यांची वेशभूषा आणि रंगभूषा देखील मस्त जमून आली आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहाताना आपल्याला नक्कीच सत्तरच्या दशकाची आठवण येते. तसेच या चित्रपटाचे पार्श्वसंगीत मनाला भिडते. देवाक काळजी हे गाणे तर चांगलेच ओठावर रुळते. चित्रपटाचा शेवट चांगला झाला असला तरी काही शेवटी काही गोष्टी अनुत्तरित ठेवल्या असल्याचे जाणवते. तसेच मध्यांतरानंतर चित्रपट काहीसा ताणला देखील गेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची चित्रपटावरची पकड सैल सैल होते. पण एकंदर हा सिनेमा प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करतो.