- जान्हवी सामंतबॉलिवूडमध्ये मसालेदार आणि विनोदी चित्रपटांनाच मनोरंजक मानले जाते. ‘डियर माया’ सारखे वेगळ्या विषयाला वाहिलेले चित्रपट त्यामुळेच आपसूक गंभीर किंवा मेंदूला झिंग आणणाºया चित्रपटांच्या रांगेत जावून बसतात. पण अनेकदा सत्य यापेक्षा वेगळे असते. ‘डियर माया’मध्ये काहीसा गडदपणा असला तरी, हा चित्रपट निश्चितपणे गंभीर वा कंटाळवाणा नाही. चित्रपटांची अतिशय विचारपूर्वक निवड करणाºया मनीषा कोईरालाने आपल्या पुनरागमनासाठी ‘डियर माया’ या चित्रपटाची निवड करणे अतिशय योग्य निर्णय म्हणता येईल.‘डियर माया’ हा चित्रपट माया (मनीषा कोईराला) या आपल्याच भावविश्वात रमणा-या एकाकी व भावनिक स्त्री व्यक्तिरेखेची कथा आहे. एना या किशोरवयीन मुलीच्या नजरेतून तिची कथा उलगडत जाते. शिमल्यात एनाच्या शेजारी एका भयावह अशा घरात माया एकटी राहत असते. तिच्याबद्दल ना-ना तºहेच्या कथा ऐकवल्या जातात. तिच्या एकाकीपणापासून तिला नैतिक- अनैतिक ठरविण्यापर्यंतच्या अनेक कथा लोक चघळत असतात. एना आणि तिची मैत्रिण इरा या दोघींच्या मनात या कथांचा मोठा परिणाम होतो. या कथा मायाबद्दल त्या दोघींच्या मनात अपार कुतूहल निर्माण करतात. पण त्यापेक्षा तिचा एकाकीपणा या दोघींना छळू लागतो. कित्येक वर्षांपासून माया पुरूषाशिवाय एकाकी राहतेय, हे प्रेमाचा अंकूर फुटण्याच्या किशोरवयीन वयात असलेल्या एना व इरा या दोघींच्याही कल्पनेपलिकडचे असते. मायाचे हे एकाकीपण दूर करण्यासाठी, तिच्या आयुष्यात रोमान्स आणण्यासाठी एना व इरा या दोघींच्या डोक्यात एक बालिश युक्ती आकार घेते. ही युक्ती म्हणजे, मायाला बनावट प्रेमपत्र लिहून पाठवण्याची. एना व इरा वेद नावाच्या एका पुरूषाच्या नावाने मायाला प्रेमपत्र पाठवायला सुरुवात करतात. पण यासगळ्यांत इरापेक्षा अधिक भावूक असलेल्या एनाच्या मनात मायाबद्दल अपार सहानुभूती निर्माण होते. दुसरीकडे या प्रेमपत्रांनी मायाचे भावविश्वही प्रेमाच्या तरंगांनी भरून उठते. खोट्या प्रेमपत्रांना भुलून माया वेद नावाच्या त्या काल्पनिक पुरूषाच्या प्रेमात पडते आणि एकदिवस आपली सगळी संपत्ती विकून प्रेमाचा शोधात बाहेर पडते. मायाचे हे असे अचानक बेपत्ता होणे, एनासाठी मोठा धक्का ठरतो. आपल्यामुळेच माया बेपत्ता झाली, या पश्चातापाने एनाचे मन भरून येते आणि पुढे या घटनेच्या संदर्भाने इरा व एनाच्या मैत्रीचे संदर्भही बदलतात. इरासोबत तुटलेली मैत्री आणि मायाचे आयुष्य उद्वस्त केल्याची बोच एनाला स्वस्थ बसू येत नाही. पश्चातापाने आतल्या आत पोखरलेली एना दिल्लीत कॉलेजात शिकायला जाते आणि इथून सुरु होतो मायाचा शोध. मायाचा शोध आणि या प्रवासात एनाचा स्वत:च्या आयुष्याकडे बघण्याचा बदलेला दृष्टिकोन अशा अंगाने चित्रपट पुढे सरकरतो.चित्रपटाचा पहिला भाग उत्सुकता वाढवणारा आहे. लहान शहरातील दैनंदिन आयुष्याचे चित्रण दिग्दर्शकाने या भागात रंगवले आहे. ‘सामान्य’ लोकांच्या कक्षेत बसत नसलेल्या मायासारख्या काही लोकांबद्दल समाजात असलेले कुतूहल, नैतिक-अनैतिकतेचे मापदंड असे सगळे या चित्रपटात अतिशय प्रभावीपणे दाखवले आहे. मात्र त्याचवेळी चित्रपटाचा अतिशय मंद वेग आणि त्यामुळे पटकथेची लांबलेली उकल हे खटकणारे आहे. माया या व्यक्तिरेखेवर केंद्रीत असेपर्यंत हा चित्रपट मनाची चांगली पकड घेतो. मनीषा कोईरालाने यात शानदार पुनरागमन केले आहे. संयमी, सावध, विक्षिप्त पण तरीही करारी, आनंदी अशी माया तिने अफलातून पद्धतीने पडद्यावर जिवंत केली आहे. अशाप्रकारची भूमिका अगदी हुबेहुब पडद्यावर जिवंत करणे, हे मनीषातील प्रगल्भ अभिनेत्रीचे कसब म्हणावे लागेल. मनीषाने माया या व्यक्तिरेखेला अगदी परिपूर्ण न्याय दिला आहे. एना रंगवणा-या अभिनेत्रीचा अभिनयही सहज सुंदर आहे. केवळ चित्रपटाची अनावश्यक लांबी आणि दुसºया भागातील एनाच्या आयुष्यातील काही अस्पष्ट भाग याच तेवढ्या ‘डियर माया’तील उणीवा आहेत. सेकंड हाफमध्ये अगदी काही मिनिटातच चित्रपटाची लय त्यामुळे बिघडलेली दिसते. एना आणि इरा यांच्यातील त्याच-त्या मुद्यांची पुनरावृत्ती खटकायला लागते. अर्थात तरिही नॉन बॉलिवूड आणि तरिही मनोरंजक असा चित्रपट साकारल्याबद्दल दिग्दर्शकाला श्रेय द्यावेसे वाटते.एकंदर काय तर काही तरी वेगळे आणि मन प्रसन्न करणारे पाहायचे असेल तर हा चित्रपट पाहायला हरकत नाही.