सुवर्णा जैन
'साहो'… हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट… दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या साहो या चित्रपटाची रसिकांना उत्सुकता होती. अखेर हा चित्रपट दणक्यात रुपेरी पडद्यावर दाखल झाला आहे. बिग बजेट चित्रपट, प्रभास-श्रद्धाची केमिस्ट्री, तुफानी अॅक्शन आणि दमदार स्टारकास्ट यामुळे साहो रसिकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. चित्रपटाचा नायक सिद्धांत नंदन (प्रभास) हा एक अंडर कव्हर एजंट असून त्याचा भूतकाळ विविध घटनांमुळे गडद आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलीस अमृता नायर(श्रद्धा कपूर) हिच्या प्रेमात असतो. या दोघांवर मुंबईतील २००० कोटींच्या दरोडा प्रकरणाचा छडा लावण्याची जबाबदारी सोपवण्यात येते. या दरोड्याचा तपास करताना त्यांना एका ब्लॅक बॉक्सचा शोध घ्यायचाय. यांत अनेकांच्या नशिबाची चावी दडलेली आहे.
मुंबईतील या दरोडा प्रकरणाचा तपास करताना चित्रपटाची कथा जगभरातील विविध शहरात रंगत जात असल्याचं पाहायला मिळतं. प्रत्येकवेळी चित्रपटाच्या नायकाला म्हणजे सिद्धांत नंदनला वेगवेगळ्या खलनायकांचा सामना करावा लागतो आणि चित्रपटाच्या कथेत रंग भरू लागतात. चित्रपटाच्या पूर्वाधातच जबरदस्त अॅक्शनची सुरुवात होते. सुरुवातीपासूनच रुपेरी पडद्यावर प्रभासचा प्रभाव जाणवू लागतो.
सिद्धांत नंदनच्या या भूमिकेत प्रभास एकदम फिट बसल्याचे पाहायला मिळते. मात्र ‘बाहुबली’मधील प्रभासची जादू दरवेळी प्रकर्षाने जाणवते. त्याचे संवाद डबिंगमुळे काहीसे रटाळ आणि फिके वाटतात. प्रभासची व्यक्तीरेखा गूढ करण्याच्या नादात दिग्दर्शकाने त्याच्या संवादांची गती सोईस्करपणे धीमी ठेवल्याचे जाणवते. चित्रपटात श्रद्धाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो. मात्र एक तिची व्यक्तीरेखा रुपेरी पडद्यावर फिकी पडते. एक महिला पोलीस अधिकारी असलेली अमृता वेळोवेळी कमजोर पडत असल्याचे दिसून येते. प्रत्येक वेळी अमृताला वाचवण्यासाठी नायकाला पुढे यावे लागतं. प्रभास आणि श्रद्धाच्या केमिस्ट्रीतही काहीतरी कमी आहे असं वाटत राहतं.
चित्रपटातील जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर, टिनू आनंद, मल्ल्याळम स्टार लाल, अरुण विजय, चंकी पांडे या खलनायकांनी आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या सगळ्यात जास्त चंकी पांडेने साकारलेली व्यक्तीरेखा भाव खावून जाते. खादीच्या सिल्क साडीतील मंदिरा बेदीची भूमिकाही रुपेरी पडद्यावर उठून दिसते. चित्रपटातील अॅक्शन सीन्स थक्क करणारे आणि काळजाचा ठोका चुकवणारे आहेत. अॅक्शन चित्रपटप्रेमींसाठी ही एक जणू काही ट्रीट असेल. हे अॅक्शन पाहताना 'बाहुबली' आणि 'साहो'ची स्क्रीप्ट यांची सरमिसळ तर झाली नाही ना असं एका क्षणाला वाटतं. चित्रपटाचा मध्यांतर तर रसिकांच्या काळजाला भिडतो. चित्रपटाची गाणी उत्तमरित्या चित्रीत करण्यात आली आहे. या गाण्यासाठी दर्जेदार आणि सर्वोत्तम लोकेशन्स निवड केल्याबद्दल दिग्दर्शक सुजीत यांचं कौतुक केलं पाहिजे. श्रद्धाच्या या गाण्यातील दिलखेचक अदा घायाळ करतात. प्रभासच्या नृत्याचंही कौतुक व्हायला हवं.
जॅकलिन फर्नांडिसने 'बॅड बॉयज' या गाण्यातून रसिकांना घायाळ केले आहे. मात्र कथानकात चुकीच्या ठिकाणी ही गाणी घुसवली आहेत असं वाटतं. यामुळे चित्रपटाचं कथानक विनाकारण खेचलं गेलं आणि कथेचा वेग कमी होऊन चित्रपट रटाळवाणा वाटतो. कथा आणि दिग्दर्शनातील उणीवांमुळे दिग्दर्शक सुजीत यांनी एक चांगली संधी गमावली आहे. चित्रपटात साहो कोण? साहोचं नेमकं गूढ काय आहे?, सिद्धांत आणि अमृता यांच्यातील केमिस्ट्री कशी आहे?, बाहुबलीनंतर प्रभासचा नवा अवतार कसा आहे या सगळ्याची उत्तरं मिळवण्यासाठी साहो चित्रपट पाहावा लागेल. प्रभासच्या चाहत्यांसाठी साहो नक्कीच ट्रीट असेल.