भाईजान सलमान खानचा ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला. तेव्हा जाणून घ्या, कसा आहे हा सिनेमा?
कथा - तर भाईजानच्या या सिनेमाची स्टोरी रंगते ती मुंबईत. स्वप्नांची नगरी म्हणवणा-या मुंबईत ड्रग्ज माफियांचे राज्य आहे आणि या माफियांचा सफाया करणे गरजेचे आहे. राधे (सलमान खान) या पोलिस अधिका-यावर ही जबाबदारी सोपवली जाते. 10 वर्षांच्या पोलिस सेवेत 97 एन्काऊंटर करणारा राधे मुंबईत दाखल होतो. हा राधे आपल्या अंदाजात माफियांचा सफाया करतोच. सोबत दीयाभोवती (दिशा पाटनी) प्रेमाचे जाळेही विणतो. कसे? तर त्यासाठी तुम्हाला अख्खा सिनेमाच बघावा लागेल़.
सलमानचा सिनेमा म्हटल्यानंतर तो एक टिपिकल बॉलिवूड सिनेमा असणार, हे नव्याने सांगायला नको. सलमानच्या या सिनेमातही अॅक्शन आहे, ड्रामा आहे, कॉमेडी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे भाईजानही आहे. (चाहते भाईजानसाठीच सिनेमे त्याचे पाहतात.) सिनेमा सुरु होतो, तसा तो बांधून ठेवतो. सलमान व रणदीप हुड्डा यांच्यातील टक्कर पाहताना मजा येते. सिनेमातील अॅक्शन सीन्स पाहतांना काहीतरी नवे जाणवते. पण जसाजसा सिनेमा पुढे जातो, तसा अनेकठिकाणी भरकटतो. दिशा पाटनी सिनेमात ग्लॅमरचा तडका लावते. पण तिची एन्ट्री मूळ कथेला भलत्याच दिशेला नेते. मध्येच येणारी गाणी कथेत ‘अनफिट’ वाटतात. सलमानसोबतची तिची केमिस्ट्रीही अनेकठिकाणी खटकते.
भाईजानचे काय तर, तो आपल्या चाहत्यांना निराश करूच शकत नाही. त्याची स्टाईल, स्वॅग, त्याची डायलॉगबाजी, अॅक्शन त्याच्यावर उठून दिसते. प्रभुदेवाने भाईजानला प्रेझेंट करताना किती मेहनत घेतलीये, हे ‘राधे’चे कॅरेक्टर पाहताना लक्षात आल्याशिवाय राहत नाही. काही ठिकाणी त्याचे डायलॉग फिल्मी वाटतात, हा एक अपवाद सोडला तर चाहत्यांना जे हवे ते देण्याचा भाईजानने पूर्ण प्रयत्न केला आहे. सिनेमात अनेक विलन आहेत. पण रणदीप हुड्डा या सर्वांवर भारी पडतो. सिनेमात हार्ड-कोर अॅक्शन आहे आणि सोबत कॉमेडी पंच. अर्थात प्रत्येकवेळी कॉमेडी जमेलच असे नाही. एकंदर काय तर सलमानचे फॅन असाल आणि अॅक्शन सिनेमाचे दिवाने असाल तर हा सिनेमा तुमच्यासाठी आहे. हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहणे एक रोमांचक अनुभव ठरला असता. पण कोरोना महामारीमुळे भाईजानच्या चाहत्यांना ओटीटीवरच या सिनेमाची मजा घ्यावी लागणार आहे. लॉकडाऊनच्या काळात टिपिकल बॉलिवूड सिनेमा बघायची इच्छा असेल तर एकदा तरी राधे तुम्ही पाहू शकताच.