- जान्हवी सामंत
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनादिवशी जॉन अब्राहम व मनोज वाजपेयी यांचा 'सत्यमेव जयते' हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा चित्रपट भ्रष्ट व्यवस्थेवर भाष्य करतो. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत फारच उत्सुकता होती. त्यांची ही उत्सुकता आज अखेर संपली. तेव्हा जाणून घेऊयात कसा आहे 'सत्यमेव जयते' चित्रपट...भ्रष्टाचारावर आतापर्यंत बॉलिवूडमध्ये बरेच चित्रपट बनले आहेत. त्यात आता आणखीन एका सिनेमाची भर पडली आहे ती म्हणजे सत्यमेव जयतेची. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर या चित्रपटाबाबतच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र त्यांच्या या अपेक्षेवर विरजन पडले आहे. 'सत्यमेव जयते' चित्रपटात अखेर सत्याचा विजय होतो असे सांगितले असले तरी एकटा माणूस पूर्ण व्यवस्थेला आव्हान देतो हे पचनी पडत नाही. अशा जॉनरच्या सिनेमात क्विक अॅक्शन आणि स्ट्रॅटेजिक प्लॉट असणे गरजेचे असते. मात्र 'सत्यमेव जयते' चित्रपटाचा मध्यवर्ती भाग खूपच कंटाळवाणा ठरतो.ही कथा आहे वीर (जॉन अब्राहम) नामक एका विचित्र देशभक्ताची. तो एक आर्टिस्ट आणि सोबतच एक खुनीदेखील आहे. वीर भ्रष्ट पोलिसांना मारून टाकत असतो आणि मेल्यानंतर त्यांचे स्केच बनवतो. दोन पोलीस अधिकाऱ्यांचा बळी गेल्यानंतरही आरोपीला पकडण्यात पोलीस अपयशी ठरतात. अखेर हे प्रकरण डीसीपी शिवांश (मनोज वाजपेयी) यांच्याकडे सोपवले जाते. शिवांश हा कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक करणारा पोलीस असतो. त्यामुळे तो या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तपास सुरू करतो. त्या दरम्यान त्याला समजते की खुन्याचे जाळे बरेच मोठे असून तो त्याच्या टार्गेटवर असलेल्या व्यक्तीचा जीव घेऊ शकतो. शिवांश खुनी वीरला पकडण्याचा प्रयत्न करत असतो, पण वीर पोलिसांना मारण्याचा क्रम सुरु ठेवतो. आधीच पोलीस अधिकारी लाच घेताना आणि अत्याचार करताना दाखवल्यामुळे त्यांना मारणाऱ्या गुन्हेगाराबद्दल चीड अजिबात येत नाही. त्यात या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना वाचवण्याची जबाबदारी घेणारा हा पोलीस मुळात मुर्ख वाटतो. जर कथानक एकदम खिळवून ठेवणारे असते तर हा चित्रपट मनोरंजक ठरला असता. पण 'सत्यमेव जयते' हा चित्रपट दोन तास एकतर्फी लढाई असल्यासारखे वाटते. या चित्रपटातील पहिला ट्विस्ट येईपर्यंत प्रेक्षक कंटाळून जातील. त्यात जॉन अब्राहम व मनोज वाजपेयी यांच्यासारखे अभिनयातील तगडे कलाकार घेतले असले तरी त्या दोघांची केमिस्ट्री फारशी जुळलेली नाही. या चित्रपटातील 'दिलबर...' हे नोरा फतेहीवर चित्रीत झालेले गाणे सोडले तर बाकी गाणी तितकी खास नाहीत. मध्यांतरानंतर चित्रपटात खूप अॅक्शन सीन पाहायला मिळतात आणि देशभक्तीवरील संवादाचा भडीमार केला आहे. या चित्रपटाचा विषय चांगला असूनही दिग्दर्शकाला आणखीन वेगळ्या पद्धतीने सादर करता आले असते. या चित्रपटात जॉन व मनोज वाजपेयी यांच्याव्यतिरिक्त अमृता खानविलकर, देवदत्त नागे, आयशा शर्मा हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहे. या तिघांना या सिनेमात डझनभर डायलॉग सोडले तर त्यांचे काहीच काम नाही. थोडक्यात काय तर हा कंटाळवाणा सिनेमा आहे. त्यामुळे चित्रपट तिकिट काढून थिएटरमध्ये जाऊन पाहण्याचे अजिबात कष्ट घेऊ नका.