- तेजल गावडे
देशभरात बलात्कार व लैंगिक शोषणाबद्दल दररोज ऐकायला व वाचायला मिळत असतं. तसंच मागील वर्षी बॉलिवूडमध्ये मीटू मोहिमेनं जोर धरला होता. या मोहिमेअंतर्गत सिनेइंडस्ट्रीतील महिलांनी लैंगिक शोषण व अन्यायाविरोधात आवाज उठविला होता. तसंच दिल्ली येथील २०१२ साली झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर कायद्यात दुरूस्ती करण्यात आली. बलात्काराच्याच संदर्भातील एक कायदा म्हणजे सेक्शन ३७५. याच कायद्यावर दिग्दर्शक अजय बहल यांनी चित्रपट बनविला आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना व रिचा चड्ढा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातून सेक्शन३७५चे वेगवेगळे पैलू अधोरेखित करण्यात आले आहेत.
'सेक्शन ३७५' हा एक कोर्टरूम ड्रामा आहे. या चित्रपटाच्या कथेची सुरूवात सिनेइंडस्ट्रीतील दिग्दर्शक रोहन खुराना (राहुल भट) त्याच्या चित्रपटासाठी काम करणारी ज्युनिअर असिस्टंट कॉश्च्युम डिझायनर अंजली डांगळे (मीरा चोप्रा)वर झालेल्या बलात्कारापासून होते. त्यानंतर सुरू होतो कोर्टरूम ड्रामा. या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयात रोहन खुराना (राहुल भट) ला दोषी करार करत १० वर्षांची शिक्षा सुनावली जाते. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात जाते. वकील तरूण सलूजा (अक्षय खन्ना) आरोपीच्या बाजूनं आणि पीडितेच्या बाजूने सरकारी वकील हिरल गांधी (रिचा चड्ढा) हे प्रकरण लढवत असते. त्यानंतर कोर्टात साक्षीदार, पोलिसांचा हलगर्जीपणा आणि व्यवस्थेतील ढिसाळ कारभार रेखाटण्यात आला आहे. अंजली डांगळेला न्याय मिळतो की नाही आणि रोहन खुरानाला दोषी करार केलं जातं की नाही, हे पाहण्यासाठी हा चित्रपट पहावा लागेल.