नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिग्दर्शक समीत कक्कडने यावेळी दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असलेला ॲक्शनपॅक्ड सिनेमा बनवला आहे. या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना साऊथ स्टाईलमधील रानटी ॲक्शन पाहायला मिळते.
कथानक : ही कथा पाताळपूरमधल्या विष्णू आंग्रे नावाच्या तरुणाची आहे. विष्णूचे वडील वामन यांना शिव रुद्र पाताळपूरच्या बंदरावर कोकेन उतरवण्याची ऑफर देतो, पण ते नकार देतात. त्यामुळे दलाल सदा राणे त्यांची हत्या करतो. त्यानंतर विष्णूची आई पार्वती त्याला घेऊन मुंबईत येते आणि हाणामारी न करण्याचे वचन घेते. पण, पाताळपूरमधील जीवलग मित्र बाळाच्या वडीलांचा सूड घेण्यासाठी विष्णू शस्त्र हाती घेतो. ही सर्व रक्तरंजीत कथा चित्रपटात आहे.
लेखन-दिग्दर्शन : पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित हा चित्रपट जरी दक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असला तरी त्याचे सुरेख मराठीकरण करण्यात यश आले आहे. चित्रपटातील संवाद टाळ्या-शिट्ट्या मिळवणाऱे आहेत. प्रत्येक कॅरेक्टर वेगळ्या शैलीत सादर केले असून, प्रत्येकाला स्वभावानुसार ट्रीटमेंट देण्यात आली आहे.
अभिनय : शरद केळकरने अफलातून अभिनय करत यशस्वी ॲक्शन सीन्सही केले असले, तरी शीर्षक भूमिकेत वयस्कर वाटतो. नायकाच्या तुलनेत कमी लांबीची भूमिका असलेल्या खलनायकी व्यक्तिरेखेला संजय नार्वेकरने अचूक न्याय दिला आहे. नायिकेच्या भूमिकेत शान्वी श्रीवास्तवने चांगले काम केले आहे. नागेश भोसलेंनी साकारलेला शिव रुद्रही खतरनाक आहे. हितेश भोजराजने आपल्या अभिनयाने प्रभावित केले. छाया कदमने टिपिकल मराठमोळी आई साकारली आहे. इतर कलाकारांनी चांगली साथ दिली आहे.
सकारात्मक बाजू : पटकथा, दिग्दर्शन, ॲक्शन, अभिनय, पार्श्वसंगीत, लोकेशन्स, सिनेमॅटोग्राफी, कला दिग्दर्शननकारात्मक बाजू : गीत-संगीत, मिसमॅच जोडी, रक्तपातथोडक्यात काय तर ॲक्शनपटांच्या चाहत्यांना हा चित्रपट आवडेलच, पण मराठी चित्रपटात धडाकेबाज ॲक्शन पाहण्यासाठी एकदा वेळ काढायला हवा.