प्राजक्ता चिटणीसप्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या प्रेमाला एक वेगळीच जागा असते. तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा खूपच खास असतो. कितीही वर्ष उलटून गेली तरी तिच्या आठवणी काही पुसल्या जात नाहीत. ती संपर्कात नसली तरी कॉमन फ्रेंड्सकडून ‘ती’ची चौकशी तरी केली जाते. आजच्या सोशल नेटवर्किंगच्या जगात तर तुमच्या जुन्या मित्रमैत्रिणींना पुन्हा भेटणे खूप सोपे झाले आहे. आज फेसबुक किंवा व्हॉट्सअँप वर जुन्या मित्र मैत्रिणीचा ग्रुप बनवला जातो आणि सगळे त्यातून पुन्हा एकमेकांना भेटतात. जुन्या आठवणींना उजाळा देतात. या ग्रुपमधूनच एखादे गेट टूगेदर करायचे ठरते आणि अनेक वर्षांनी पुन्हा एकमेकांना भेटून तीच धमाल मस्ती पुन्हा केली जाते.आपल्या मित्र मैत्रिणींना भेटण्याचा एक वेगळाच आनंद असतो आणि त्यात आपले पहिले प्रेम आपल्याला पुन्हा भेटले तर तिच्याशी काय बोलू आणि काय नाही अशी अवस्था होते आणि त्यात काही कारणाने गेटटूगेदरला ती आली नाही तरी ती सध्या काय करतेय याची माहिती इतर मित्रमैत्रिणींकडून मिळवल्याशिवाय मनाला समाधान मिळत नाही. ‘ती सध्या काय करते’ ही कथा आहे अशाच जुन्या मित्रमैत्रिणीची. अनुराग अगदी लहान असतानाच पाहताच क्षणी तन्वीच्या प्रेमात पडतो. तिने एकदा तरी आपल्याकडे पाहावे, आपल्याकडे बघून हसावे यासाठी प्रयत्न करत असतो. तन्वीलादेखील अनुराग मित्र म्हणून आवडतो आणि त्यांची पक्की गट्टी जमते. दोघांचे एकमेकांशिवाय पानदेखील हलत नसते. दोघे शाळेत-कॉलेजमध्ये एकत्रच जातात. पण कॉलेजमध्ये गेल्यावर अनुरागला इतर मुली तन्वीपेक्षा अधिक आकर्षक वाटू लागतात. पण कुठेतरी त्याच्या मनाच्या कोपऱ्यात तो इतर मुलींची तन्वीसोबत तुलना करू लागतो आणि यात तन्वीच आपले खरे प्रेम असल्याची त्याला जाणीव होते. पण काही कारणांनी त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. अनुराग आणि तन्वीची मैत्री तुटते आणि त्यांचा कायमचा संपर्कच तुटतो. दरम्यानच्या काळात अनेक वर्षं निघून जातात. दोघेही आपल्या आयुष्यात सेटल होतात. पण कुठे तरी त्या दोघांच्याही मनात पहिल्या प्रेमाच्या आठवणी ताज्या असतात. याच आठवणींच्या तरल भावनांचा प्रवास म्हणजे हा चित्रपट. हा प्रवास दिग्दर्शक सतीश राजवाडेंनी खुप चांगल्या प्रकारे मांडला आहे.‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाची कथा ही मनाला नक्कीच स्पर्श करून जाते आणि ही कथा तितकीच सशक्तपणे दिग्दर्शकाने लोकांसमोर मांडली आहे.या चित्रपटाचे मुख्य आकर्षण म्हणजे अभिनय बेर्डे. अभिनय हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा. त्याचे वडील लक्ष्मीकांत यांनी आपल्या अभिनयाने मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टी गाजवली. ती सध्या काय करते या चित्रपटाचा प्रोमो आल्यापासूनच अभिनय लक्ष्मीकांत यांचा अभिनयाचा वारसा चालवणार का याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. पहिल्याच चित्रपटात अभिनयने सिक्सर मारली आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. अभिनयने अनेक एकांकिकांमध्ये पुरस्कार मिळवले आहेत. तो एक गुणी अभिनेता असल्याचे हा चित्रपट पाहाताना नक्कीच वाटते. हा अभिनयाचा पहिला चित्रपट आहे असे कुठेच जाणवत नाही. संवादफेक, अभिनय सगळे काही लाजवाब. तसेच अभिनय एक खूप चांगला डान्सरदेखील आहे. त्याने पहिल्याच चित्रपटात त्याची ही खुबीदेखील लोकांसमोर आणली आहे. या चित्रपटामुळे एक चांगला अभिनेता अभिनयच्या रूपाने मराठी इंडस्ट्रीला मिळाला आहे. आर्या आंबेकर एक गायिका असूनही तिनेदेखील खूपच चांगला अभिनय केला आहे. अंकुश चौधरीने तरुण अनुरागची भूमिका खूपच चांगल्या प्रकारे साकारली आहे. तसेच बालपणाचे तन्वी आणि अनुराग रंगवणारे बालकलाकारही चित्रपट संपल्यानंतरही लक्षात राहातात. अभिनय आणि अंकुशच्या तुलनेत तेजश्री प्रधान आणि उर्मिला कोठारेच्या वाट्याला छोट्या भूमिका आल्या आहेत. पण त्यांनी दोघांनीदेखील त्या भूमिका सशक्तपणे पेलल्या आहेत.ती सध्या काय करते या चित्रपटाची सगळीच गाणी ओठांवर रुळणारी आहेत. विश्वजीत जोशी, निलेश मोहरीर, मंदार आपटे यांनी या चित्रपटाच्या गीतांना खूपच छान संगीत दिले आहे. हृदयात वाजते समथिंग हे गाणे तरुणांना भुरळ घालणार यात काही शंकाच नाही. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे या गीतासाठी गीतकार देवायनी कर्वे-कोठारेचे जितके कौतुक करावे तितके कमी.प्रत्येकाच्या आयुष्यात असा खास मित्र किंवा खास मैत्रीण असतेच. याच मित्राच्या, मैत्रिणीच्या आणि आपल्या पहिल्या प्रेमाच्या आठवणीत रमण्यासाठी नक्कीच एकदा तरी ती सध्या काय करते पाहा.