Join us

Shubh Mangal Zyada Saavdhan : चाकोरीबाहेरील प्रेमकथा !

By सुवर्णा जैन | Published: February 21, 2020 2:28 PM

'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा 'शुभ मंगल सावधान' सिनेमाचा सिक्वेल असून या चित्रपटातील प्रेमकथा थोडी हटके आहे.

Release Date: February 21, 2020
Cast: आयुष्यमान खुराणा, जितेंद्र कुमार, भूमि पेडणेकर, नीना गुप्ता, गजराज राव आणि इतर
Producer: भूषण कुमारDirector: हितेश केवाल्या
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स

सुवर्णा जैन

हिंदी चित्रपटसृष्टीत हटके आणि तितकाच बोल्ड विषयावर आधारित चित्रपट घेऊन येणारे मोजके दिग्दर्शक असतात. चाकोरीबाहेरील चित्रपटांच्या माध्यमातून रसिकांची मनं जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. असाच काहीसा प्रयत्न दिग्दर्शक हितेश केवाल्याने 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटातून केला आहे. 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा 'शुभ मंगल सावधान' सिनेमाचा सिक्वेल असून या चित्रपटातील प्रेमकथा थोडी हटके आहे. ही कथा आहे बनारसमध्ये राहणा-या त्रिपाठी कुटुंबाची. ज्यांचे एकत्र कुटुंब असते. याच कुटुंबाचा मुलगा असतो अमन (जितेंद्र कुमार). 

अमनहा मुलीच्या नाहीतर मुलाच्या प्रेमात पडतो. कार्तिक (आयुष्यमान खुराणा) असे त्या मुलाचे नाव असते. जेव्हा त्रिपाठी कुटुंबाला त्यांचा मुलगा 'गे' असल्याचे कळते. तेव्हा कुटुंबाची होणारी तगमग या सगळ्या गोष्टी सिनेमात उत्तमरित्या दिग्दर्शकाने मांडण्यात यश मिळवले आहे. समलैंगिक लव्हस्टोरीसारखा बोल्ड आणि तितकाच संवेदनशील  विषय हलक्या फुलक्या पद्धतीने चित्रपटातून हाताळण्यासाठी दिग्दर्शकाचे ख-या अर्थाने कौतुक व्हायला हवं. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेमाच्या व्याख्येबाबत कथा नव्याने विचार करायला भाग पाडते. चित्रपटातील अनेक प्रसंग मनोरंजन करतात, कधी हसवतात त्याचवेळी दुसऱ्या क्षणाला भावूकही करतात. सत्य ऐकल्यानंतर कुटुंबावर कोणती परिस्थिती ओढावते ?, अमन आणि कार्तिकच्या प्रेमकथेचं काय होतं?, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं  'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटातून मिळतील. 

आयुष्यमान खुराणाने पुन्हा एकदा दमदार परफॉर्मन्स दिला आहे. कार्तिकच्या भूमिकेत आयुष्यमान खुराणा पुन्हा एकदा भाव खाऊन जातो. एक जबरदस्त परफॉर्मन्स त्याने या चित्रपटात दिला आहे. त्याने साकारलेला  कार्तिक शेवटपर्यंत रसिकांना  खिळवून ठेवतो.  तर जितेंद्र कुमारनेही अमन ही भूमिका उत्तम साकारली आहे. तर वडिलांच्या भूमिकेत गजराज राव यांनी ही विनोदी, प्रेमळ, भावुक पिता अशा विविध छटा उत्तमरित्या साकारल्या आहेत. तर आईच्या भूमिकेत नीना गुप्ता यांनीही आपल्यातील अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे. या सगळ्या भूमिकांप्रमाणे अभिनेत्री मानवी गगरूची भूमिकाही लक्षवेधी ठरते. तिने आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. तर अभिनेत्री भूमि पेडणेकरही छोट्याशा भूमिकेतून रसिकांची मनं जिंकते. चित्रपटाचं संगीतही श्रवणीय आहे.     

काही वर्षापूर्वीच समलैंगिक संबंधांबाबत न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला असला तरीही चित्रपटाची ही कथा रसिकांच्या पचनी पडणार का हासुद्धा एक प्रश्न आहे. समलैंगिक प्रेमकथा रसिक किंवा समाज कितपत स्वीकारेल हे पाहणे रंजक ठरेल. 

टॅग्स :शुभ मंगल ज़्यादा सावधानआयुषमान खुराणा