Join us

Singham Again Movie Review : रामायणाच्या पटलावरील अ‍ॅक्शन-कॉमेडीचा फसलेला डाव, जाणून घ्या कसा आहे सिनेमा?

By संजय घावरे | Published: November 01, 2024 3:20 PM

Singham Again Movie Review : रोहित शेट्टीच्या बहुप्रतिक्षित 'सिंघम अगेन' सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. जाणून घ्या कसा आहे सिनेमा?

Release Date: November 01, 2024Language: हिंदी
Cast: अजय देवगण, करीना कपूर, रणवीर सिंग, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, जॅकी श्रॅाफ, अर्जुन कपूर, टायगर श्रॅाफ, दयानंद शेट्टी, श्वेता तिवारी, रवी किशन
Producer: रोहित शेट्टी, अजय देवगण, ज्योती देशपांडेDirector: रोहित शेट्टी
Duration: दोन तास २४ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

'सिंघम'सारख्या सुपरहिट चित्रपटाचा तिसरा भाग बनवताना रोहित शेट्टीने रामायणाचा आधार घेतल्याचे ट्रेलरमध्येच समजले. चित्रपटही त्यापेक्षा वेगळा नाही. नावीन्याचा अभाव आणि 'सिंघम'चा प्रभाव कमी असलेला हा चित्रपट म्हणजे रामायणाच्या पटलावरील अ‍ॅक्शन-कॉमेडीचा फसलेला डाव आहे.

कथानक : काश्मिरमध्ये तैनात असलेला बाजीराव सिंघम आणि रामलीलेच्या माध्यमातून रामायण सादर करणारी त्याची पत्नी अवनी यांची ही कथा आहे. सिंघमवर हल्ला करण्यासाठी आलेल्या अतिरेकी ओमर हाफिजला सिंघम पडकतो. त्यावेळी ओमर त्याला सांगतो की, कोणीतरी माझ्यापेक्षाही डेंजर असून, तो येणार आहे. दोन वर्षांनी ओमरचा नातू डेंजर लंका अवनीचे अपहरण करून तिला श्रीलंकेमध्ये नेतो. त्यानंतर सिंघम आणि त्याची सेना अवनीला सोडविण्यासाठी जीवाची बाजी लावते.

लेखन-दिग्दर्शन : रामायणाच्या या कथेत सिंघमला आधुनिक युगातील रामरूपात दाखवून एक असा चित्रपट तयार केला आहे, जो 'सिंघम' सिरीजमधील पूर्वीच्या चित्रपटांच्या तुलनेत प्रभावी वाटत नाही. शिवा स्कॅाडची स्थापना केली जाते, पण त्याचा इम्पॅक्ट मात्र दिसत नाही. काही संवाद दमदार आहेत. संकलनात गडबड वाटते. काही दृश्यांचा जुन्या चित्रपटांशी अचूक संबंध जोडण्यात आला आहे. शक्ती आणि सत्या या व्यक्तिरेखांचे सिंघमशी कनेक्शनमध्ये सुस्पष्टता नाही. सिंघमच्या मनात येते आणि अवनीला सोडवायला त्याचा प्रत्येक शिष्य तिथे कसा पोहोचतो ते समजण्या पलिकडले आहे. या सर्वांमध्ये सिम्बा स्टाईलमध्ये काॅमेडी करत रणवीर सिंग भाव खाऊन जातो. गीत-संगीत सामान्य आहे.

अभिनय : महत्त्वाच्या व्यक्तिरेखा खूप असल्याने अजय देवगणच्या वाट्याला फार कमी काम आले आहे. अजयने पुन्हा एकदा सिंघमच्या कॅरेक्टरचं अचूक बेअरिंग पकडलं आहे. कॅामेडीचा अचूक टायमिंग साधत रणवीर सिंग खूप हसवतो. करीना कपूरने रंगवलेली अवनीही चांगली झाली आहे. दीपिका पदुकोणने पती रणवीर सिंगच्या स्टाईलमध्ये लेडी सिंघम सादर केली आहे. अर्जुन कपूरने रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' शैलीत साकारलेला डेंजर लंका प्रभावी वाटतो. टायगर श्रॅाफने पुन्हा एकदा जबरदस्त अ‍ॅक्शन केली आहे. अक्षय कुमारची छोटीशी भूमिका अ‍ॅक्शनपॅक्ड आहे. जीवावर उदार झाल्यासारखा केवळ एका डायलॅागसाठी सलमान खान चुलबुल पांडेच्या रूपात प्रगटतो. जॅकी श्रॅाफ, दयानंद शेट्टी, श्वेता तिवारी, रवी किशन यांनी चांगली साथ दिली आहे.

सकारात्मक बाजू : संवाद, अ‍ॅक्शन, अभिनय, लोकेशन्स, सिनेमॅटोग्राफीनकारात्मक बाजू : पटकथा, संकलन, गीत-संगीत, दिग्दर्शनथोडक्यात काय तर या आधुनिक रामायणात अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा मेळ घालत मनोरंजनाचे परीपूर्ण पॅकेज देण्याचा केलेला प्रयत्न काहीसा कमी पडला आहे.

टॅग्स :रोहित शेट्टीअजय देवगणदीपिका पादुकोणरणवीर सिंगकरिना कपूरअक्षय कुमारजॅकी श्रॉफअर्जुन कपूरटायगर श्रॉफ