The Sky Is Pink Movie Review: 'जिंदगी बडी होनी चाहिए लम्बी नहीं'
By गीतांजली | Published: October 11, 2019 04:30 PM2019-10-11T16:30:05+5:302019-10-14T10:15:27+5:30
आयेशा चौधरी आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन देऊन जाते.
गीतांजली आंब्रे
आयुष्य सुंदर आहे आणि त्यातील प्रत्येक क्षण भरभरुन जगा हे वाक्य आपण आयुष्यात कितीतरी वेळा ऐकतो. पण खऱ्या आयुष्यात ते खूप कमी वेळा जगतो. 'द स्काय इज पिंक' सिनेमा आयुष्याच्या याच धाग्याला धरुन तयार करण्यात आला आहे. यातील आयेशा चौधरी आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन देऊन जाते. देसी गर्ल प्रियंका चोप्रा 'द स्काय इज पिंक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार म्हणून या सिनेमाची वाट तिचे फॅन्स मोठ्या आतुरतेने पाहत होते. प्रियंका शेवटची संजय लीला भन्साळींच्या बाजीराव मस्तानीमध्ये दिसली होती त्यानंतर तब्बल तीन वर्षींनी बॉलिवूडमध्ये परतली आहे. बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी तिने द स्काय इज पिंक सारख्या संवेदनशील सिनेमाची निवड केली. ना तर या सिनेमात अॅक्शन आहे, ना आयटम साँग, ना ड्रामा मात्र तरीदेखील हा सिनेमा आर्वजून पाहावा असाच आहे.
द स्काय इज पिंक सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारित दिल्लीतल्या चौधरी कुटुंबीयांची आहे. ही गोष्ट आहे निरेन (फरहान अख्तर) - आदिती( प्रियंका चोप्रा) आणि त्यांची दोन मुलं इशान (रोहित सुरेश सराफ) आणि आयेशाची(जायरा वसीम). आयशाला सहा महिन्यांची असताना दुर्मिळ आजार होता. निरेन आणि आदिती तिला उपचारासाठी दिल्लीवरुन लंडनला घेऊन जातात. कारण याच आजारामुळे त्यांनी त्यांची मुलगी तान्यालासुद्धा गमावले असते. त्यामुळे आयेशाला वाचवण्यासाठी अदिती आणि निरेन जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात. जणू आयेशला वाचवणे हेच अदिती आणि निरेनच्या जगण्याचे उद्दिष्ट्य होऊन जाते. आयेशा सहा महिन्यांच्या असताना तिला बोन मॅरो ट्रांसप्लांटचा सामना करावा लागतो यामुळे आयेशाला काही काळानंतर साइड-इफेक्टमुळे पल्मोनरी फायबरोसिस सारखा घातक आजार होतो. पण आयेशा तिचे आयुष्य आनंद सिनेमातील डायलॉग प्रमाणे जगते 'बाबूमोशाय जिंदगी बड़ी होनी चाहिए लम्बी नहीं' मुलीचा आजार आणि माता-पित्याचा संघर्ष पाहाताना तुमच्या अंगावर काटा येतो.
मोटिवेशनल स्पीकर आयेशा चौधरीच्या आयुष्यावर आधारित 'द स्काय इज पिंक' सिनेमाची कथा आहे. आयेशाने वयाच्या 18 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. पण तिची जगण्याची गोष्ट प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. लेखिका आणि दिग्दर्शिका शोनाली बोसचे या सिनेमासाठी कौतूक करावं तेवढे कमी आहे. आयेशा आणि चौधरी कुटुंबाच्या संघर्षाची कथा मोठ्या कॅनव्हॅसवर दाखवण्याचे धारिष्ट्य तिने केले. सिनेमातील असे अनेक सीन्स आहेत ज्यात तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. सिनेमा सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला खिळवून ठेवतो याचे सगळे श्रेय शोनालीला जाते. सिनेमातील संवाद खूपच दमादार आहेत. एक अत्यंत गंभीर विषयाला मोठ्या नाजुकतिने तिने मोठ्या पडद्यावर मांडले आहे. प्रियंकाने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा अदितीची भूमिकाच वेगळी आहे. बाजीराव मस्तानीमधील काशीबाईंची भूमिका असो किंवा बर्फी सिनेमातील झिल्मिलची भूमिका असो प्रत्येक भूमिकेत प्रियंकाने आपली वेगळी अशी छाप सोडली आहे. अदितीच्या भूमिकेतही तिने एक खंबीर आणि हळुवार आई मोठ्या बखुबीने पडद्यावर उभी केली आहे. प्रियंकाने साकारलेली अदिती तुमच्या आमच्यातील एक वाटते. फराहनने आतापर्यंतच्या त्याच्या करिअरमध्ये अनेक वेगगेवळ्या भूमिका साकारल्या आहेत मात्र निरेनच्या भूमिकेला त्याने चार चाँद लावले आहेत. आपल्या मुलीच्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आनंदाचा जावा म्हणून सतत झटणारा निरेन, तिला वाचवण्यासाठी जीवाचे रान करणारा निरेन फराहनने सक्षमपणे उभा केला आहे. जायरा वसीमने या सिनेमानंतर बॉलिवूडमधून जर संन्यास घेतला असले तर तिची ही भूमिका अनेक वर्षे लक्षात ठेवली जाईल. जायराने आयशा आपली समोर जीवंत केली आहे. आयशाच्या भावाची भूमिका साकारलेल्या रोहित सुरेश सराफ याने देखील आपल्या वाटेला आलेली भूमिका चोखपणे साकारली आहे. गुलजार यांचे शब्द आणि प्रतिमचे संगीत यांने सिनेमाला चार चाँद लावले आहेत. प्रत्येक कलाकारांने आपल्या अभिनयाच्या जोरावर हा सिनेमा एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवाल आहे. सहकुटुंब आर्वजून पाहाव असा हा सिनेमा आहे जो तुम्हाला आयुष्य जगण्याचा एक नवा कानमंत्र देऊन जातो.