एखादी उत्तम कलाकृती घडवायची असेल तर त्याची संहिता,दिग्दर्शन,अभिनय ,तांत्रिक बाबी ह्या सर्वच परफेक्ट असाव्या लागतात. आणि अशी कलाकृती फिल्ममेकरच्या हातून घडली तरच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं 'स्माईल'येऊ शकतं. बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांनी हृदयांतर या सिनेमाचं दिग्दर्शन करून मराठीमध्ये पदार्पण केलं. हृदयांतर हा सिनेमा तसा आश्वासक होता. त्यामुळेच विक्रम फडणीसच्या स्माईल प्लीज या दुसऱ्या सिनेमाकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या. विक्रम फडणीस हा असा दिर्ग्दशक आहे जो मानवी नात्यांमधली गुंतागुंत उत्तमरित्या पडद्यावरती साकारतो. स्माईल प्लीजची कथाही विक्रम फडणीसचीच आहे. आपलीच कथा पडद्यावर साकारायची असली कि दिग्दर्शक खूप आत्मीयतेने आपली कलाकृती पडद्यावर साकारण्याच्या प्रयत्नात नेहमीच असतो. या सिनेमातही नात्यांमधली गुंतागुंत आहे. मात्र स्माईल प्लीज पाहिल्यावर आपल्या चेहऱ्यावर कधी आसू आणि कधी हसू येईलही. मात्र सिनेमाचा परिणाम पाहिजे त्या प्रमाणात न झाल्याने ते आसू आणि हसू परिणामकारक करण्यात दिग्दर्शक विक्रम फडणीस काहीसा कमी पडला आहे.
सिनेमाची कथा थोडी नावीन्यपूर्ण आहे. या कथेची नायिका नंदिनी जोशी (मुक्ता बर्वे) एक नामांकित फोटोग्राफर , आपल्या कामाप्रती अत्यंत प्रामाणिक आणि मेहनती असणारी नंदिनी. व्यावसायिक आयुष्यात अत्यंत यशस्वी असलेल्या नंदीनीची वैयक्तिक आयुष्यात मात्र फारशी चांगली बाजू नाही . सिनेसृष्टीतील नामांकित दिग्दर्शक शिशिर (प्रसाद ओक) याच्यापासून ती विभक्त झालेली आहे. आणि आपल्या वडिलांबरोबर म्हणजेच अप्पांसोबत(सतीश आळेकर) ती राहते आहे. नंदिनी आणि शिशिरची मुलगी नुपूर (वेदश्री महाजन) ही विभक्त झाल्यावरही शिशिरसोबत राहते आहे. आणि सतत बिझी असलेल्या आपल्या आईबद्दल तिच्या मनात एकप्रकारचा राग आहे. आणि हिच गोष्ट नंदीनीच्या मनाला कित्येक वर्ष लागलेली आहे. आपल्या मुलीचं आपल्यासोबत असं वागणं तिच्या मनाला भयंकर त्रास देतं. या सर्व गोष्टींचा तणाव तिच्या आयुष्यात पडायला सुरवात होत असते. आपल्या मुलीला शाळेतून पिक अप करायला विसरणं, आपल्या वस्तू भलत्याच ठिकाणी ठेवणे, सांगितलेल्या गोष्टी विसरणे हे प्रकार नंदीनीसोबत घडायला लागतात. यातून मार्ग काढण्यासाठी ती आपली मानसोपचारतज्ञ मैत्रिण डॉक्टर अंजलीचा(आदिती गोवित्रीकर) सल्ला घेते.नंदीनीच्या गोष्टी विसरण्याच्या प्रमाणात हळूहळू वाढ होते. आणि तिच्या करण्यात आलेल्या टेस्टनुसार तिला झालेला आजार कधीच बरा होणार नाही आणि हा आजार गंभीर आहे असं कळतं. या धक्क्यामुळे नंदीनी खूप खचते आणि विसरण्याच्या या आजारामुळे नंदीनीला खूप जपावं लागतं ,ति तिच्या कामातूनही ब्रेक घेते. मात्र ती तिचा आत्मविश्वास गमावून बसते. एवढ्यात नंदिनीच्या घरी पाहुणा म्हणून विराज (ललित प्रभाकर) काही महिन्यांसाठी राहायला येतो. नंदीनीची एकूण परिस्थिती पाहता विराज तिच्या आयुष्यात सकारात्मक बदल करतो. ह्या बदलांनी तिच्या आयुष्यात खरंच बदल घडतो का ? तिच्या चेहऱ्यावर खरंच स्माईल येतं का ? नात्यांमधला वाढलेला ताण दूर होता का ? ह्याची उत्तरं तुम्हांला सिनेमाच्या शेवटाला मिळतील.
विक्रम फडणीसची कथा आणि इरावती कर्णिकने लिहिलेले संवाद उत्तमच जमले आहेत. मात्र या सिनेमाची कथा जरी नाविन्यपूर्ण असली तरी सिनेमा मध्यंतरानंतर काहीसा गडबडतो. नंदीनीच्या आयुष्यात आलेली स्थित्यंतरं आणि विराज तिच्या आयुष्यात आल्यानंतर तिच्यात जो सकारात्मक बदल करू पाहतोय. हा बदल सिनेमात कुठेच दिसला नाहीये. आपण एखाद्या व्यक्तीमध्ये बदल घडवतोय तर त्याच्याशी संवाद साधू हा संवादच मुळात नंदीनी आणि विराज या दोघांमध्ये कुठे होताना दिसलेला नाही. त्यामुळे नंदीनीमध्ये अचानक बदल झाला हे पाहणं थोडं खटकतं. नंदीनीची मुलगी नुपूरचं कॅरेक्टर गरजेपेक्षा जास्त लाऊड करण्यात आलं आहे. विभक्त झालेले आपले पालक आणि त्याला कारणीभूत आईच आहे असं मानणारी नुपूर जास्त लाऊड वाटते आहे. बरं मुळात तिला जे विभक्त होण्याचं कारण वाटतंय ते ही फार काही इंटरेस्टिंग दाखवण्यात आलेलं नाही. नंदीनीच्या भूमिकेत मुक्ता बर्वे आणि विराजच्या भूमिकेत ललित प्रभाकरने कमाल केली आहे. ललितचं पात्र मध्यंतरानंतर येऊनही कमाल करतं हे जास्त महत्वाचं. प्रसाद ओक, आदिती गोवित्रीकर, ,सतीश आळेकर यांनी आपपाल्या भूमिका चोख केल्या आहेत. ज्योतीच्या भूमिकेतील तृप्ती खामकर विशेष लक्षात राहते. सिनेमाचं संगीतही श्रवणीय झालं आहे. रोहन रोहन या जोडीने पुन्हा एकदा सिनेमाला साजेचं असं संगीत दिलं आहे. एकूणच एकदा पाहावा अशी ही कलाकृती आहे. मात्र सिनेमा नेमका परिणाम साधण्यात थोडा कमी पडलाय इतकं नक्की.