सुपरहिरोपासून एमसीयूच्या पुढच्या टप्प्याचे नेतृत्व करण्यापर्यंत, स्पायडरमॅनने खूप मोठा पल्ला गाठला होता. बर्याच प्रतिक्षेनंतर हा उत्कंठावर्धक स्पायडर-मॅन: नो वे होम चित्रपट (Spider-Man: No Way Home Movie) अखेर या आठवड्यात प्रदर्शित झाला. नेहमीप्रमाणे या स्पायडरमॅनने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे, मात्र कोणालाही फारसा आश्चर्यचकित करू शकत नाही.
- संदीप आडनाईक
कथानक :
स्पायडर-मॅनची ओळख आता उघडकीस आल्याने पीटर पार्करचे सामान्य जीवन आता सुपरहिरोपासून वेगळे नाही. शेजारचा वेब-स्लिंगरही अनमास्क आहे. जेव्हा पीटरने डॉक्टर स्ट्रेंजकडे मदत मागितली, तेव्हा त्याचे जीवन आणखी धोकादायक होते. त्याला स्पायडर-मॅन होण्याचा खरोखर अर्थ काय आहे हे शोधण्यास भाग पाडले जाते. पीटर पार्कर या नव्या लढाईत टिकून राहील का हे या सिनेमातून पाहता येईल.
दिग्दर्शन :
सिनेमा अपेक्षेप्रमाणे जात नाही. पूर्वार्ध आकर्षक आहे त्यामुळे त्यातील वेगवान घडामोडी दर्शकांना जागेवर बसवून ठेवतो, मात्र स्पायडर-मॅन: नो वे होम मुलांना, किंवा कोणालाही फारसा आश्चर्यचकित करू शकत नाही. यातील घडामोडी देखील अनोख्या आहेत आणि त्यापूर्वी मार्वल चित्रपटात किंवा इतर कोणत्याही चित्रपटात कधीही दिसल्या नाहीत. क्लायमॅक्स आणि मिड आणि पोस्ट क्रेडिट सीन्स देखील मजा आणतात, आणि नाट्यमयता वाढवतात. दिग्दर्शक जॉन वॉट्सने यापूर्वीच्या एमसीयूच्या चित्रपटांमधील विनोद, भावना आणि आकर्षकता टिकवून ठेवण्याचे कौतुकास्पद काम केले आहे. मुख्य विषयासह विनोदी शिडकाव्याने स्क्रीनवरील स्पायडरमॅन सुसह्य होतो.
अभिनय :
अभिनयाबाबत बोलायचे तर टॉम हॉलंड, झेंडाया, बेनेडिक्ट कंबरबॅच आणि मारिसा टोमी यांनी त्यांच्या भूमिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. हॉलंडने त्याच्या व्यक्तिरेखेच्या चेहऱ्यावरील अंतर्गत गोंधळाचे चित्रण उत्कृष्टरित्या दाखवले आहे. मात्र जॉन फेराऊला फार कमी प्रसंगात वापरले आहे. एक हुशार अभिनेता असूनही, त्याला बाजूची भूमिकेत वाया घालवले आहे. नेडच्या भूमिकेत जेकब बटालोन पीटर पार्करचा सर्वात चांगला मित्र आणि कॉमिक इंटरल्यूड म्हणून प्रशंसनीय काम करतो. मायकेल गियाचिनोने दिलेले संगीत दर्शकांना बांधून ठेवते. सिजीआय आणि व्हीएफएक्सची कामे अर्थातच उच्च दर्जाची आणि निर्दोष आहेत.