Join us

Srikanth Movie Review : शिखरावर पोहोचण्याची दृष्टी देणारा 'श्रीकांत', जाणून घ्या कसा आहे राजकुमार रावचा सिनेमा

By संजय घावरे | Published: May 11, 2024 4:41 PM

Srikanth Movie Review : श्रीकांत बोला यांचा प्रवास केवळ दृष्टिहिनांसाठीच नव्हे, तर डोळस व्यक्तींसाठीही सुपर प्रेरणादायी आहे. दिग्दर्शक तुषार हिरानंदानी यांनी या चित्रपटाद्वारे फक्त श्रीकांतची कारकिर्द जगासमोर आणली नसून, संकटांमुळे हतबल होणाऱ्यांसाठी एक उदाहरण सादर केलं आहे.

Release Date: May 10, 2024Language: हिंदी
Cast: राजकुमार राव, ज्योतिका, शरद केळकर, आलया एफ, जमील खान
Producer: भूषण कुमार, कृष्ण कुमार, निधी परमारDirector: तुषार हिरानंदानी
Duration: २ तास २ मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

>> संजय घावरे

श्रीकांत बोला यांचा प्रवास केवळ दृष्टिहिनांसाठीच नव्हे, तर डोळस व्यक्तींसाठीही सुपर प्रेरणादायी आहे. दिग्दर्शक तुषार हिरानंदानी यांनी या चित्रपटाद्वारे फक्त श्रीकांतची कारकिर्द जगासमोर आणली नसून, संकटांमुळे हतबल होणाऱ्यांसाठी एक उदाहरण सादर केलं आहे. या चित्रपटात राजकुमार राव(Rajkumar Rao)ने साकारलेली शीर्षक भूमिका आघाडीच्या पुरस्कारांसाठी त्याचा दावा सिद्ध करणारी ठरणार आहे.

कथानक : छोट्याशा गावात जन्मलेल्या श्रीकांतची ही कथा आहे. डोळ्यांसमोर अंधार असलेला श्रीकांत प्रामाणिक, प्रॅक्टिकल, जिद्दी आणि अभ्यासात खूप हुशार असतो. मुख्याध्यापिकांचीच पोलखोल केल्याने शाळेतून हाकलून दिल्याने तो रस्त्यावर येतो. शिक्षीका देविका त्याला आपल्या घरी नेते. दहावीला ९६ टक्के मिळालेल्या श्रीकांतला सायन्समध्ये शिकायचं असतं, पण भारतीय शिक्षण व्यवस्थेत दृष्टिहिनांसाठी सायन्समधून शिक्षणाची तरतूद नसल्याने तो न्यायालयात जातो. उच्च शिक्षणासाठी पुन्हा तोच मुद्दा आल्यावर तो परदेशी शिक्षणसंस्थांमध्ये अर्ज भरतो. जगातील जवळपास सर्वच विद्यापीठे त्याला शिष्यवृत्ती द्यायला तयार होतात. श्रीकांतचा पुढील प्रवासही खूप रोमांचक आहे.

लेखन-दिग्दर्शन : समाजातील कोणत्याही घटकासाठी प्रेरणादायी ठराव्यात अशा श्रीकांतसारख्या कथा वेळोवेळी रुपेरी पडद्यावर येणे गरजेचे आहे. दृष्टिहिनांचा जन्म इतरांसमोर हात पसरण्यासाठी असल्याचे श्रीकांतला बालपणापासून हिणवले जात असते, पण श्रीकांत हात पसरणारा नव्हे तर इतरांना नोकरी देणारा बनत बुरसटलेल्या विचारांना मूठमाती देतो. श्रीकांतचा लढा त्याच्यासारख्या असंख्य बंधू-भगिनींचा सायन्समधून शिक्षणाचा मार्ग मोकळा करतो. मध्यंतरानंतरच्या भागातील अहंकार आणि राजकारणाचा भाग वगळता इतर चित्रपट वास्तवदर्शी वाटतो. बारावीला प्रथम क्रमांक, राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची भेट, इंटरनॅशनल स्कॅालरशीप, भारतीय विकलांग क्रिकेट संघात निवड, बेसबॉल, पोहणे, बुद्धीबळातील प्रावीण्य यासारख्या गोष्टी श्रीकांतची प्रतिमा उंचावणाऱ्या ठरतात. भारतीय शिक्षण व्यवस्था, विमानसेवेतील त्रुटी आणि राजकारणावरही प्रहार केला आहे. 'पापा कहते है...' गाण्याचा छान वापर केला आहे.

अभिनय : राजकुमार रावच्या अभिनयाला तोड नाही. सर्वांगसुंदर अभिनयातून त्याने साकारलेल्या श्रीकांतचं वर्णन करण्यासाठी कदाचित शब्दही अपुरे पडतील. शिक्षिकेने ठरवले तर ती एखाद्या विद्यार्थ्याची कशा प्रकारे पाठराखण करत आईसुद्धा बनू शकते याचं उत्तम उदाहरण ज्योतिकाने अगदी सहजपणे सादर केलं आहे. शरद केळकरने साकारलेला संयमी मित्र चित्रपट संपला तरी मनात भरून राहातो. आलया एफच्या व्यक्तिरेखेत बाह्यसौंदर्यासोबतच अंतर्गत सौंदर्याचंही दर्शन घडतं. इतर कलाकारांनी चांगली साथ दिली आहे.

सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, वातावरण निर्मिती, गीत-संगीत, सिनेमॅटोग्राफी

नकारात्मक बाजू : मध्यंतरानंतरचा थोडासा भाग, मसालापटांच्या चाहत्यांना आवडणार नाही

थोडक्यात काय तर अशा प्रकारच्या कथा जगासमोर येणं ही काळाची गरज आहे. नियती आणि परिस्थितीसमोर हतबल न होता कायम संघर्ष केल्यास शिखरावर पोहोचणं कठीण नसल्याची दृष्टी देणारा हा चित्रपट प्रत्येकाने अवश्य पाहायला हवा.

टॅग्स :राजकुमार रावअलाया फर्निचरवालाशरद केळकर