गीतांजली आंब्रे
स्वत:साठी तर इथं प्रत्येकजण जगतो पण हे जगणं जेव्हा दुसऱ्यासाठी असते त्यावेळी आयुष्य जगण्याची मजा आणि व्याख्या दोनही बदलेल्या असतात. याच आशयावर आधारित वरुण धवन आणि श्रद्धा कपूरचा ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ सिनेमा आहे. एक कला, दोन टीम आणि ज्या तिसऱ्याच्या आनंदासाठी ही स्पर्धा जिंकण्याचा निर्धार करतात, मग सुरु होतो तो डान्सचा मुकाबला.
ही गोष्ट आहे लंडनमध्ये राहणाऱ्या पंजाबी कुटुंबातील सहेज (वरुण धवन) आणि इनायतची (श्रद्धा कपूर). दोघांचा धर्म आणि देश वेगवेगळा असतो त्यामुळे दोघे एकमेकांचे कट्टर वैरी असतात. दोघे एकमेकांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र दोघांची पॅशन एकच असते ती म्हणजे डान्स. सहेज (स्ट्रिट डान्सर) आणि इनायत (रुल ब्रेकर्स) लंडनमध्ये दोन लोकल डान्सचे ग्रुप चालवतात. त्याच दरम्यान लंडनमध्ये 'ग्राऊंड झीरो' ही डान्स कॉम्पिटीशन जाहीर होते. दोन्ही टीमला ही स्पर्धा जिंकायची असते. मात्र दोन्ही टीमचा स्पर्धा जिंकण्याचा हेतू वेगळाअसतो. याच दरम्यान एंट्री होते अण्णाची (प्रभू देवाची). प्रभू देवाच्या एंट्रीनंतर गोष्टीत अनेक ट्विस्ट आणि टर्नस येतात आणि या स्पर्धेकडे बघण्याचा दोन्ही टीमचा दृष्टीकोनचं बदलून जातो.