एकीकडे नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइमवरील एकापेक्षा एक सरस वेबसीरिजचा बोलबाला असताना दुसरीकडे काही मराठी वेबसीरिजनेही आपलं ठसा उमटण्याचा प्रयत्न करत आहेत. यात सध्या गाजत असलेल्या 'स्त्रीलिंग-पुल्लिंग' या वेबसीरिजचा उल्लेख करावा लागेल. शुद्धदेसी मराठीच्या या पहिल्याच वेबसीरिजची चर्चा चांगलीच रंगली आहे. सध्या या वेबसीरिजचे दोन एपिसोड रिलीज करण्यात आले असून कथेत पुढे काय होणार याची उत्कंठा वाढली आहे.
काय आहे कथा?
पल्लवी एक साधी-सरळ आणि सोज्ज्वळ मुलगी... तिच्या जीवनात अचानक आलेल्या एका वादळाने ती पुरती हादरुन जाते. यातून कसं बाहेर यावं किंवा हे वादळ कसं रोखावं हे तिला सुचेनासं होतं. अशातच ती तिच्या दोन बेस्ड फ्रेन्ड प्रिया आणि अर्चना यांची भेट घेते. या मेत्रिणी काहीतरी मदत करतील या उद्देशाने घाबरलेली पल्लवी त्यांना तिच्यासोबत घडलेल्या नेमक्या प्रकाराबाबत सगळंकाही सांगते. पल्लवीसोबत घडलेला प्रकार ऐकून तिच्या मैत्रिणीही हादरतात आणि तिला मदत करण्याचा निर्णय घेतात. मग काय? या तिघी मेत्रिणी या सर्व गोंधळामागे असलेल्या व्यक्तीचा शोध घ्यायला लागतात. मग पुढे काय होतं? पल्लवीसोबत काय घडलं? यातून ती कशी बाहेर येते? तिला यातून बाहेर कोण काढतं? हे दाखवणारी कथा या 'स्त्रीलिंग-पुलिंग' वेबसीरिजची आहे.
पहिला एपिसोड
पहिल्या एपिसोडमध्येच पल्लवीला ती प्रेग्नेंट असल्याचं समजतं. या घाबरलेल्या स्थितीत ती तिच्या दोन खास मैत्रिणींना तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगते. खूप विचार करुन तिघी ज्या मुलामुळे पल्लवी प्रेग्नेंट राहिली त्याचा शोध घेण्याचा निर्णय घेतात. अशातच त्यांच्यांच कॉलेजमधील एका सच्या नावाच्या तरुणाला ही भानगड माहीत होते. तो सर्वांना सांगणार तर नाही ना...याची भीती तिघींच्या मनात घर करते. दुसरीकडे पल्लवीच्या आईला घरात प्रेग्नन्सी टेस्ट कीट सापडतात आणि इथेच पहिला एपिसोड संपतो.
दुसरा एपिसोड
दुसऱ्या एपिसोडमध्ये पल्लवी आणि तिच्या दोन मैत्रिणी सच्याची मदत घेण्याची विचार करतात. पण पल्लवीसोबत शारीरिक संबंध ठेवलेल्या त्या मुलाचा शोध कसा घ्यायचा असा प्रश्न उभा ठाकतो. सच्या त्यांना यात मदत करण्यास तयार होतो. आता सच्या त्यांना कशी मदत करणार हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
'स्त्रीलिंग पुल्लिंग'मधील आकर्षण
मुळात एकीकडे हिंदी वेबसीरिजचा बोलबाला वाढत असताना दुसरीकडे मराठीत अजून तितक्या मोठ्या प्रमाणात वेबसीरिजची निर्मिती होताना दिसत नाही. अशात तरुणांना आकर्षित करणारी ही 'स्त्रीलिंग-पुल्लिंग' वेबसीरिज लक्ष वेधून घेते. या वेबसीरिजच्या तशा अनेक जमेच्या बाजू आहेत. त्यातील एक म्हणजे या वेबसीरिजचं टायटल. 'स्त्रीलिंग पुल्लिंग' या टायटलमुळेच यात नेमकं काय असणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तरुणाईत वापरली जाणारी भाषा यात आहे. त्यासोबतच उत्कंठा वाढणारी कथाही आहेच. सोबतच यात अनेक बोल्ड सीन्सही आहेत. तसेच तरुणाईमध्ये सहज दिल्या जाणाऱ्या शिव्याही आहेत. पण शिव्या टाळल्या असत्या तरी काही तसा फरक पडला नसता. कारण शिव्यांनी कोणताही वेगळा इम्पॅक्ट होताना दिसत नाही. उलट ते जरा ऑडच वाटतं.
यंग आणि एनर्जेटिक कलाकारांचा कल्ला
'स्त्रीलिंग-पुलिंग' वेबसीरिजचं लेखन-दिग्दर्शन 'चौर्य', 'यंटम' आणि 'वाघेऱ्या' या सिनेमाचं दिग्दर्शन करणारे समीर आशा पाटील यांनी केलं आहे. या वेबसीरिजमध्ये कथा तरुणांची असल्या कारणाने सर्वच तरुण कलाकारांना संधी देण्यात आली आहे. निखील चव्हाण, भाग्यश्री न्हालवे, सायली पाटील, आरती मोरे आणि ऋतुराज शिंदे यांच्या मुख्य भूमिका आहेत. भाग्यश्री न्हालवेने यात पल्लवीची भूमिका साकारली आहे. या दोन एपिसोडमध्ये तरी सर्वांनी आपापल्या भूमिकांना चोख साकारल्या आहेत.
शेअरचॅट App डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.