Join us

Student Of The Year 2 Movie Review : निव्वळ पोरखेळ आणि टाईमपास

By तेजल गावडे | Published: May 10, 2019 2:49 PM

'स्टुडंट ऑफ द ईयर २'मध्ये दोन मुली आणि एक मुलगा अशी त्रिकोणी प्रेमकथा गुंफण्यात आलीय.

Release Date: May 10, 2019Language: हिंदी
Cast: टायगर श्रॉफ, तारा सुतारिया, अनन्या पांडे, आदित्य सील
Producer: करण जोहर, हिरू यश जोहर, अपूर्वा मेहताDirector: पुनीत मल्होत्रा
Duration: २ तास २६ मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

- तेजल गावडे

'स्टुडंट ऑफ द ईयर' चित्रपटातून सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन व आलिया भट यांच्यासारखे कलाकार बॉलिवूडमध्ये दाखल झाले.  या चित्रपटाला व त्यातील कलाकारांना रसिकांनी दाद दिली. त्यानंतर तब्बल सहा वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्या भागात  दोन मुलगे आणि एक मुलगी असा लव्ह ट्रँगल पहायला मिळाला होता. मात्र आता 'स्टुडंट ऑफ द ईयर २'मध्ये याउलट चित्र असून यात दोन मुली आणि एक मुलगा अशी त्रिकोणी प्रेमकथा गुंफण्यात आलीय.

या चित्रपटातून अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे व अभिनेत्री तारा सुतारियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या दोघींना या चित्रपटात साथ लाभलीय अॅक्शन स्टार टायगर श्रॉफची. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली होती.

चित्रपटाची सुरूवात होते ती रोहन शर्मा (टायगर श्रॉफ)च्या स्वप्नाने. रोहनचे मृदुला उर्फ मिया (तारा सुतारिया)वर नितांत प्रेम असते. रोहन व तारा देहरादूनच्या एका सामान्य पिशोरीलाल चमनदास महाविद्यालयात शिकत असतात. पण, मृदुला शहरातील प्रसिद्ध महाविद्यालयात सेंट थेरेसामध्ये प्रवेश घेेते. त्यामुळे रोहनला मियाची कमतरता जाणवत असते. रोहनला देखील स्कॉलरशीप मिळते आणि त्यालादेखील त्या महाविद्यालयात प्रवेश मिळतो. रोहन मियाच्या प्रेमामुळे त्या कॉलेजमध्ये जातो. पण, मिया आपल्या करियरबाबत खूप महत्त्वकांक्षी असते. महाविद्यालयात सामान्य कॉलेजमधून आल्यामुळे रोहनला कमी लेखले जाते. तर श्रेया मेहरा (अनन्या पांडे) ही श्रीमंत बापाची बिघडलेली हट्टी मुलगी असते. ती रोहनला त्रास देण्यात कोणतीही कसर ठेवत नाही. तर तिचा भाऊ मानव मेहरा जो सेंट थेरेसा महाविद्यालयाची शान असतो.

मिया आणि रोहनच्या प्रेमात मानव मेहरा (आदित्य सील)ची एन्ट्री होते आणि त्यांच्या नात्यात दुरावा येतो तर रोहन आणि मानवमध्ये वैर निर्माण होते. रोहन मानवला मारतो म्हणून त्याला महाविद्यालयातून काढले जाते. त्यामुळे रोहन पुन्हा त्याच्या पिशोरीलाल महाविद्यालयात परततो.

मात्र रोहन मानवला २९व्या वार्षिक आंतर महाविद्यालयीन डिग्निटी कप स्पर्धेत हरविण्याचे चॅलेंज करतो. याच स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्याला स्टुडंट ऑफ द ईयरचा किताबही देण्यात येणार असतो. या दरम्यान श्रेया आणि रोहनमध्ये देखील मैत्री व प्रेम निर्माण होते. मात्र मियादेखील पुन्हा रोहनच्या आयुष्यात येते. त्यामुळे स्टुडंट ऑफ द ईयरची ट्रॉफी आणि डिग्निटी कपसाठीच्या स्पर्धेत कोण बाजी मारते आणि रोहनच्या आयुष्यात मिया बाजी मारेल की श्रेया, हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल.

स्टुडंट ऑफ द ईयर २ चित्रपटाची कथा हलकी फुलकी असून अंतिम टप्प्यात गंभीर होत जाते. कथा कॉलेजवर आधारीत असली तरी एक सीन सोडला तर लेक्चर किंवा अभ्यासाचा सीन नाही, ही गोष्ट जरा खटकते. पण, टायगर श्रॉफने दमदार अभिनय व अ‍ॅक्शनमधून तरूणाईला चांगलीच भुरळ पाडली आहे. ट्रेलर पाहून हे महाविद्यालयाचे स्टुडंट वाटतात का? अशी टीका करण्यात आली होती. मात्र कुठेही ते तिघे कॉलेजचे विद्यार्थी नसल्याचे वाटत नाही. तारा व अनन्या यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. तरीदेखील त्यांनी त्यांची भूमिका खूप छान साकारल्या आहेत.

आदित्य सीलने निगेटिव्ह भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. गिली गिली अक्खा हे गाणे खूप छान चित्रीत झाले आहे. चित्रपट कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. मात्र उत्तरार्धात डिग्निटी कप स्पर्धेतील अटीतटीचा सामना रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

पुनीत मल्होत्राने दिग्दर्शनाची जबाबदारी चोख बजावली आहे.संगीताबाबत बोलायचे झाले तर विशाल-शेखर यांचे संगीत बेताचेच आहे तसेच सिनेमॅटोग्राफर रवी के. चंद्रन यांनी सगळी दृश्ये कॅमेऱ्यातून छान टिपली आहेत.

एकंदरीत कलाकारांचा अभिनय, कॉलेज लाईफ, लव स्टोरी, भांडण-कुरघोडी आणि कबड्डीचा रंगलेला अटीतटीचा सामना पाहण्यासाठी हा चित्रपट नक्की पहा. 

टॅग्स :स्टुडंट ऑफ द इअर 2करण जोहरटायगर श्रॉफतारा सुतारियाअनन्या पांडे