मोहीम फत्ते! 'सुभेदार'ची कोंढाण्यावर पताका; अभिमान वाटावा अशी तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा
By ऋचा वझे | Published: August 24, 2023 02:34 PM2023-08-24T14:34:29+5:302023-08-24T16:27:44+5:30
Subhedar Movie Review : शिवराय अष्टकातील पाचवे पुष्प 'सुभेदार' प्रदर्शित होतोय. जाणून घ्या कसा आहे हा सिनेमा
>>ऋचा वझे
राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी 'स्वराज्य' हे स्वप्न पाहिलं. रयतेच्या कल्याणासाठी आणि लेकीबाळींच्या सुरक्षेसाठी मुघलांच्या जाचातून सुटका होणं गरजेचंच होतं. स्वप्नपूर्तीच्या या प्रवासात राजांना अनेक सवंगड्यांची मोलाची साथ मिळाली. त्यापैकीच एक नरवीर तानाजी मालुसरे. शिवराय अष्टकातील पाचवे पुष्प 'सुभेदार' (Subhedar) हा दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) लिखित, दिग्दर्शित सिनेमा २५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.
कथानक
छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगताना नरवीर तानाजी मालुसरेंशिवाय कथा पूर्ण होऊच शकत नाही. शिवबांना तानाजी मालुसरे नक्की भेटले कसे इथपासून कहाणी सुरू होते. तानाजी मालुसरेंचे मामा 'शेलार मामा' हे भाच्याची शिवबांशी भेट घडवून आणतात. धिप्पाड अस्वलाशी दोन हात करणाऱ्या तानाजींना पाहून शिवबा प्रभावित होतात. महाराजांचा विश्वास संपादन केल्यानंतर तानाजींना 'सुभेदार' हे पद मिळतं. तर दुसरीकडे कोंढाणा किल्ल्यावर मुघलांचं राज्य असल्याचं पाहून राजमाता जिजाऊ अस्वस्थ होतात. एक महिन्याच्या आत कोंढाणा किल्ला जिंकणार असं शिवाजी महाराज जिजाऊंना वचन देतात. यासाठी तानाजी मालुसरे यांना रायगडावर येण्याचा निरोप धाडला जातो. मात्र, तेव्हा कळतं की तानाजींच्या मुलाचं - रायबाचं लग्न आहे. अशावेळी तानाजींवर ही जबाबदारी देणं शिवबांना योग्य वाटत नाही आणि ते स्वत: मोहिमेवर जायचं ठरवतात. मात्र, हे तानाजींना समजताच ते महाराजांना 'कोंढाण्याचं पान म्याच उचलणार असं आश्वासन देतात. 'आधी लगीन कोंढाण्याचं मंग रायबाचं'. तिकडे उदयभान १५०० सैनिक, १५५ तोफा, १५०० तलवारी घेऊन सज्ज असतो तर इकडे तानाजी केवळ ५०० मावळे हवेत असं सांगून योजना आखतात. अखेर तो क्षण येतो. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली सूर्याजी, बहिर्जी नाईक, शेलार मामा ५०० मावळ्यांना घेऊन मोहिमेला निघतात. घोरपडे बंधूंच्या मदतीने मागच्या बाजूने किल्ला सर केला जातो आणि दुश्मनांवर आक्रमण केलं जातं. तानाजी आणि उदयभान शेवटी समोरासमोर येतात. तेव्हा शिवबांना दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यांची असलेली जिद्द आणि पराक्रम बघण्यासारखाच आहे.
लेखन-दिग्दर्शन
इतिहास मांडत असताना तो फक्त भव्यदिव्य न दाखवता प्रेक्षकांच्या काळजालाही भिडला पाहिजे, याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. सिनेमाचा पूर्वार्ध कथेच्या संकलनाच्या दृष्टीने काहीसा कंटाळवाणा वाटतो. मात्र उत्तरार्धात ती सर्व कसर भरून निघते. मध्यंतरानंतरचा भाग प्रेक्षकांचं लक्ष जराही विचलित होऊ देत नाही आणि अखेरपर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वी होतो. सिनेमॅटोग्राफीत दिग्पालने पहिल्यांदाच 'पारकोर' या खेळाच्या प्रकाराचा प्रयत्न केला आहे जो यशस्वी झालाय. बहिर्जी नाईक आणि उदयभान यांच्यात झालेल्या झटापटीवरुन ते लक्षात येईल. संवादफेक याहून धारदार करता आली असती, मात्र कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे शक्य होते. 'आले मराठे... ' हे दिग्पालनेच लिहिलेलं गाणं चांगलं झालं आहे. दिग्दर्शनाच्या दृष्टीने हिंदीत आलेल्या 'तानाजी' सिनेमापेक्षा 'सुभेदार' नक्कीच आपलं वेगळेपण दाखवतो.
अभिनय
कलाकारांचा अभिनय सिनेमाची जमेची बाजू आहे. राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने अतिशय कणखर भूमिका साकारली आहे. चिन्मय मांडलेकरने छत्रपतींचा अगदी साधा, सरळ अभिनय करत कुठेही मोठेपणाचा आव आणलेला नाही. उदयभानाचा वध करणाऱ्या तानाजी मालुसरेंची ताकद ती काय असेल हे अजय पुरकरने विलक्षणरित्या दाखवून दिलंय. यासाठी त्याने शरीरयष्टीवर घेतलेली मेहनत स्पष्ट दिसते. तर समीर धर्माधिकारीने शेलार मामाची भूमिका उत्तम निभावली आहे. तानाजींच्या पत्नीची सावित्रीची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्मिता शेवाळे प्रत्येक सीनमध्ये उठून दिसली आहे. याशिवाय आस्ताद काळे आणि मृण्मयी देशपांडे यांचा अभिनयही कौतुकास्पद आहे. अभिनेत्री अलका कुबल यांचीही या सिनेमातून शिवराय अष्टकाच्या सीरिजमध्ये एंट्री झाली आहे. दिग्पाल लांजेकरने स्वत: बहिर्जी नाईक साकारले आहेत. दिग्दर्शनासोबतच त्यांचा अभिनयही वाखणण्याजोगा आहे.
सकारात्मक बाजू : अभिनय, सिनेमॅटोग्राफी, गाणी
नकारात्मक बाजू : पूर्वार्धात सिनेमाची हळूवार गती
थोडक्यात : शिवराय अष्टकातील 'सुभेदार' हे पाचवा सिनेमा मोठ्या पडद्यावर नक्कीच बघण्यासारखा आहे. उत्तरार्धात क्षणोक्षणी डोळे पाणावतात. दिग्पालने पुन्हा एकदा त्याच्या नजरेतून आणखी एका योद्ध्याची कथा उत्तमरित्या दाखवली आहे.