अजय परचुरे
सूर सपाटा,मार रपाटा,याच गड्याचा काढीन काटा हे ऐकून भले अनेकांचं रक्त सळसळत असेल ,अंगात स्फूरण चढत असेल. मात्र सूर सपाटा हा सिनेमा पाहून मात्र हे स्फूरण काही केल्या चढत नाही तर उतरतंच. सध्याच्या मराठी सिनेमाची निर्मितीमूल्य आणि तांत्रिक बाजू जरी सफाईदार झाल्या असल्या तरी कथानक आणि सादरीकरणाच्या टप्प्यावर अजूनही बरेच मराठी सिनेमे उत्कृष्ठ किंवा चांगले या वर्गात मोडत नाहीत हे जळजळीत वास्तव आहे. सूर सपाटा हे त्यातीलच एक उदाहरण आहे.
चिंचोली काशीद या अगदी लहानग्या गावातील जिल्हा परिषद विद्यालयातील नववीच्या वर्गात शिकणाºया ७ मुलांची ही कहाणी. टग्या, दिग्या, इस्माईल, पूर्णा, झंप्या,परल्या,ज्ञाना या मैत्रीने घट्ट बांधलेल्या ७ मित्रांची त्यांच्या शाळेत टवाळ म्हणून ख्याती असते. अभ्यासाच्या नावाने बोंब मात्र कबड्डीमध्ये भारी तरबेज अशी ही ७ मुलं. शाळेचे मुख्याध्यापक सहाने सर या मुलांनी टवाळकी सोडून अभ्यास करावा आणि नववीतून दहावीत गेल्यावर चांगला अभ्यास करून शाळेचा निकाल १०० टक्के लागावा यासाठी प्रयत्न करीत असतात. दरम्यान या मुलांना आंतरशालेय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत भाग घेऊन आपलं अस्तित्व दाखवण्याचे वेध लागतात. मात्र सहाने मास्तरांचा या टवाळखोर विद्यार्थ्यांनी स्पर्धेला जावं यासाठी विरोध असतो. मुलं स्पर्धेला जाण्यासाठी इरेला पेटतात आणि नको त्या गोष्टी करून बसतात. याचा राग येऊन सहाने मास्तर या मुलांना शाळेतून काढून टाकतात. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मग ही मुलं रात्रीच्या अंधारात शाळेत जाऊन स्पर्धेच्या फॉर्मवर शाळेचा शिक्का मारून ,आणि हे फॉर्म चोरून थेट ठाण्यातील आंतरशालेय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा गाठतात. मग ते ही कबड्डी स्पर्धा जिंकतात का ?गावातील शाळेचे मुख्याध्यापक, मुलांचे पालक त्यांना मदत करतात का?कोण या मुलांच्या पाठीशी उभा राहतो?आणि स्पर्धेच्या शेवटी काय घडतं हे हा सिनेमा पाहिल्यावरच कळेल.
कथानक जरी बरं असलं तरी यामधील काही गोष्टी अगदीच बाळबोध वाटतात. गावातील तळ््याकाठच्या जागेवर मुलं ज्या ठिकाणी कबड्डी खेळत असतात ती जागा मास्तर शिपायाच्या मदतीने खणून काढतात. यानंतर मुलं प्रचंड रडतात. मात्र कबड्डीप्रती जिद्दी असणाºया मुलांना गावांत दुसरीकडे कबड्डी खेळायला जागाच नसेल का ? असा प्रश्न पडतो. सिनेमात बॉलिवूड फेम गोविंद नामदेव यांना जरी सहाने मास्तरांचं मुख्य कॅरेक्टर दिलं असलं तरी अनेक ठिकाणी त्यांचा अभिनय भयंकर लाऊड झाला आहे. चक दे इंडियासारखा हॉकी या खेळावर आधारित असणारा एक अप्रतिम सिनेमा भारतीय सिनेसृष्टीला यापूर्वीच मिळाला आहे. कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतील खेळ आहे. मात्र त्याचे नुसते चित्रीकरण करण्यापेक्षा ती मुळात खेळली कशी जाते. त्याचे नियम काय आहेत याचा अभ्यास करणे फार गरजेचे होते. उपेंद्र लिमये, संजय जाधव,प्रवीण तरडे, आनंद इंगळे यांनी आपपाल्या भूमिका चोख केल्या आहेत. पण मूळातच सिनेमाच्या कथानकात फारसा दम नसल्याने या चांगल्या कलाकारांचा मात्र नाईलाज झालाय. सिनेमातील ७ प्रमुख मुलांनी आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका त्यांच्या कुवतीप्रमाणे रंगवल्या आहेत. मात्र सिनेमा संपल्यावर दर्जेदार काही पाहायला मिळालं याचा काहीच आभास आपल्याला होत नाही हे दुर्देव आहे. सिनेमाची निर्मितीमूल्य आणि तांत्रिक बाजू मात्र छान झाल्या आहेत. पण चकचकीत सिनेमात गोष्ट आणि सादरीकरणही तितकंच महत्वाचं आहे ह्या गोष्टीचा इथे आर्वजून उल्लेख करावासा वाटतो.