स्वरगंधर्व सुधीर फडके म्हणजे अर्थातच बाबूजी यांची जीवनगाथा दाखवणारा हा चित्रपट म्हणजे जणू संघर्ष आणि संगीताच्या सुरावटीवरील अलौकिक प्रवासच आहे. कलाकारांची अचूक निवड, तसेच प्रसंग आणि गाण्यांचा केलेला अचूक वापर ही योगेश देशपांडेंच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या चित्रपटाची वैशिष्ट्ये आहेत.
कथानक : बाबूजींनी लोकवर्गणीतून तयार केलेल्या 'वीर सावरकर' चित्रपटातील 'सागरा प्राण तळमळला...' या गाण्यापासून चित्रपट सुरू होतो. पुढे अॅड. विनायक वामनराव फडके यांच्या घरातील राम फडके यांचं बालपण दाखवतो. मुलाचा संगीताकडील कल ओळखून वडील रामला कोल्हापूरातील गंधर्व संगीत विद्यालयातील वामनराव पाध्ये यांच्याकडे संगीताचं शिक्षण घेण्यासाठी नेतात. दुसरीकडे हिराबाई बडोदेकरांची गाणी ऐकून राम तयार होत असतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट होते. 'असाच गात रहा आणि तुझ्या हातून देशसेवा घडो', असा आशीर्वाद ते देतात. न. ना. देशपांडे एका कार्यक्रमात रामचा उल्लेख सुधीर असा करतात आणि रामचे सुधीर फडके बनतात. त्यांचा पुढील प्रवास खडतर असतो. याच प्रवासात ते रसिकांचे लाडके बाबूजी बनतात.
लेखन-दिग्दर्शन : हा चित्रपट एक प्रेरणादायी प्रवास आहे. बाबूजींच्या मामाकडच्या आठवणी, दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न, नाना गाडगीळांशी मैत्री, संगीतवर्ग सुरू करण्याचा ध्यास, 'तू एकटा नाहीस, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत', हे डॉ. हेडगेवार यांचे आशीर्वचन, पावलोपावली रा.स्व.संघाचा आधार, गिरगावातील क्राऊन बिल्डिंगमधील खोलीत दाटीवाटीनं राहणं, १९३९ मध्ये नाशिक आणि नंतर कार्यक्रमाच्या शोधत मालेगाव-करनाल-अंबाला भटकंती, १९४४ मध्ये कोलकात्याला संगीत कंपनीत नोकरी करताना बाबूजी म्हणून संबोधलं जाणं, ग. दि. माडगूळकर तसेच साहेबमामा फतेहलाल यांची भेट, दादरा-नगर हवेलीमधील पोर्तुगीज छावणीवरील हल्ला असे बरेच टप्पे यात आहेत. 'विकत घेतला श्याम...', 'इथून दृष्ट काढते...', 'एक धागा सुखाचा...', 'देव देव्हाऱ्यात नाही', 'तोच चंद्रमा नभात...', 'फिरत्या चाकावरती देशी...', 'देणाऱ्याचे हात हजारो...', 'संथ वाहते कृष्णामाई...' या बाबूजींच्या गाण्यांचा त्यांच्या संघर्षमय जीवनकाळातील दृश्यासाठी सुरेख वापर केला आहे. हा प्रवास पाहताना कित्येकदा डोळ्यांच्या कडा ओल्या होतात, तर काही ठिकाणी संदर्भ समजून घ्यावे लागतात. पोर्तुगीज छावणीवरील हल्ला प्रभावी वाटत नाही.
अभिनय : प्रौढ वयातील बाबूजींची भूमिका सुनील बर्वेने एकरूप होऊन साकारली आहे. 'आया गोकुल में छोटा सा राजा...' हे गाणं गाण्यासोबत प्रत्येक दृश्यात सुनीलने जीव ओतला आहे. आदिश वैद्यने साकारलेली तरुणपणातील व्यक्तिरेखाही खूप छान झाली आहे. पत्नीच्या भूमिकेत मृण्मयी देशपांडेने सुरेख साथ दिली आहे. गीत रामायणाच्या पहिल्या गाण्याचा प्रसंग छान जमून आला आहे. सागर तळाशीकरने देहबोली आणि संवादफेकीच्या बळावर गदिमा सजीव केले आहेत. विभावरी देशपांडे, मिलिंद पाठक, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, परितोष प्रधान, अविनाश नारकर यांनी छोटयाशा भूमिकाही प्रभावीपणे साकारल्या आहेत. डॉ. हेडगेवारांच्या भूमिकेत शरद पोंक्षे शोभून दिसतात, पण अटलबिहारी वाजपेयींच्या रूपात ऋषिकेश जोशी खटकतो.
सकारात्मक बाजू : पटकथा, गीत-संगीत, दिग्दर्शन, अभिनय, कला दिग्दर्शन
नकारात्मक बाजू : चित्रपटाची लांबी, संकलन, काही उणीवा
थोडक्यात काय तर हा केवळ चरित्रपट नसून जीवन जगण्याचा संगीतमय मंत्र आहे. ही फक्त शब्द-सूरांची मैफल नसून, संघर्षमय जीवनाची सोनेरी पहाट आहे. त्यामुळे प्रत्येकाने वेळ काढून अवश्य पहावा.