सुवर्णा जैन
बायोपिक म्हटला की त्या चित्रपटाची साऱ्यांनाच उत्सुकता असते. त्यातच हा बायोपिक दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर असेल तर त्याची प्रतीक्षा चित्रपटरसिकांसह सारा महाराष्ट्र करत होता. सिनेमाच्या ट्रेलरपासूनच रसिकांना ‘ठाकरे’ या चित्रपटाची उत्सुकता होती. अवघा महाराष्ट्र आणि तमाम मराठी मनावर गारुड घालणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहणं ही रसिकांसाठी आणि त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या शिवसैनिकांसाठी जणू काही पर्वणी. रुपेरी पडद्यावर बाळासाहेबांची जोरदार एंट्री होते आणि सुरुवातीलाच दाखवला जातो तो बाबरी मशीद खटला. न्यायालयात हजर राहण्यासाठी बाळासाहेब पोहचतात तो क्षण नवाजुद्दीनने आपल्या अभिनयाने असा काही साकारलाय की साक्षात बाळासाहेब वावरतायत असा भास होतो. न्यायालयीन खटल्यापासून सुरू झालेली ठाकरे सिनेमाची कथा मग फ्लॅशबॅकमध्ये जाते. बाळासाहेब ठाकरे हे नेते असण्यासबोबतच एक उत्तम व्यंगचित्रकारसुद्धा होते. आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यातून बाळासाहेब कसे फटकारे मारायचे हे रसिकांना पाहायला मिळतं.
मराठी माणसाची होणारी मुस्कटदाबी, मराठी माणसाला दिली जाणारी वागणूक हे पाहून पेटून उठणारे व्यंगचित्रकार बाळ केशव ठाकरे रसिकांना भावतात. चित्रपटाच्या सुरूवातीला अॅनिमेशन आणि व्यंगचित्राचा प्रभावी वापर करून मराठी माणसाची अवस्था दाखवण्यात आली आहे. यानंतर मार्मिकचा जन्म, बाळ केशव ठाकरे ते बाळासाहेब ठाकरे असा प्रवास, शिवसेनेचा जन्म आणि ‘हा बाळ महाराष्ट्राला अर्पण करत आहे’ हे प्रबोधनकरांचे वाक्य रसिकांची दाद घेऊन जातं. बाळासाहेबांच्या आदेशावर काहीही करण्यासाठी तयार असलेले त्यांचे निष्ठावंत शिवसैनिक, आंदोलनं सारं काही मोठ्या खुबीने सादर करण्यात आले आहेत. चित्रपटातील काही प्रसंग विशेष उल्लेखनीय आणि कौतुकास्पद असेच आहेत. मोरारजी देसाईंच्या मुंबई दौऱ्याला विरोध, कृष्णाजी देसाईंची हत्या, जॉर्ज फर्नांडिस-बाळासाहेब यांच्यातील जेलमधील संवाद, इंदिरा गांधी-बाळासाहेबांची भेट, शरद पवार आणि बाळासाहेबांची राजकारणापलीकडची मैत्री असे चित्रपटातील कितीतरी प्रसंग लक्षवेधी वाटतात.
मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे, प्रखर देशप्रेमी, क्रिकेट प्रेमी, कलाप्रेमी, व्यंगचित्रकार, पती, मुलगा, भाऊ, पिता असे बाळासाहेबांचे विविध पैलू दाखवण्यात दिग्दर्शक अभिजीत पानसे यशस्वी ठरले आहेत. बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्यातील पती-पत्नीचं प्रेमळ नातंही तितक्याच खूबीने रुपेरी पडद्यावर साकारण्यात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अमृता राव यशस्वी ठरले आहेत. संपूर्ण चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारलेले बाळासाहेब प्रचंड प्रभावी वाटतात. बाळासाहेबांसारखी चेहरेपट्टी, लूक, त्यांच्यासारखे हावभाव, वावरणं यासह सगळी आव्हानं नवाजुद्दी सिद्दीकीने लिलया पेलली आहेत. नवाजुद्दीन एक उत्तम अभिनेता असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अभिनेत्री अमृता राव हिनेही तिच्या वाट्याला आलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिला आहे. रुपेरी पडद्यावरील बाळासाहेबांसोबतचे संवाद काळजाला भिडतात तसंच पती-पत्नीच्या नात्यामधील प्रेमही दाखवण्यात यशस्वी ठरतात. बाळासाहेब ठाकरे रुपेरी पडद्यावर रसिकांसमोर सादर करण्यात संजय राऊत आणि दिग्दर्शक अभिजीत पानसे यशस्वी ठरले आहेत. अनेक बारीकसारीक गोष्टी उत्तमरित्या मांडत पानसे यांनी आपलं दिग्दर्शक म्हणून कसब दाखवून दिलंय.
मातोश्रीवर मुस्लीम व्यक्तीने नमाज अदा करतानाचा सीन, मनोहर जोशींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर रिमोट कंट्रोलचा सीन किंवा फ्लॅशबॅकमधून न्यायालयीन खटला किंवा खटल्यातून पुन्हा फ्लॅशबॅक सारं काही चपखल बसवण्यात पानसे यशस्वी ठरले आहेत. सिनेमॅटोग्राफी, सेट विशेषतः शिवसेनाभवन, रोहन-रोहन यांचं संगीत, बॅकग्राउंड स्कोर या सगळ्या पातळीवर ठाकरे चित्रपट यशस्वी ठरला आहे. चित्रपटात उद्धव-राज यांच्याबाबत किंबहुना ठाकरे कुटुंबीयांबाबत अधिक काही दाखवलं जाईल अशी रसिकांना आशा होती, ती फोल ठरते. मात्र ठाकरे चित्रपटाच्या केंद्रस्थानी फक्त बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या सारख्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वाचा जीवनप्रवास २ तासांत रुपेरी पडद्यावर मांडणं शक्य नाही. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या जीवनाचे अधिक पैलू रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी रसिकांना ठाकरे-२ची प्रतीक्षा करावी लागणार आहे.