सुवर्णा जैन
९०च्या दशकात तुमचा जन्म झाला असेल आणि तुम्ही अॅनिमेटेड चित्रपटाचे चाहते असाल तर ‘द लायन किंग’ नाव ऐकूनच तुमच्या आठवणींना उजाळा मिळेल. गेल्या काही दिवसांत जुन्या चित्रपटांना नव्या रुपात आणि नव्या ढंगात सादर करण्याचा ट्रेंड सुरू आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला अल्लादीन याचं उदाहरण आहे. याच धर्तीवर आता १९९४ सालच्या ‘द लायन किंग’ला नव्या ढंगात आणि नव्या रुपात रसिकांच्या भेटीला आणलं आहे. किंग खान शाहरुख आणि त्याचा लेक आर्यनमुळे हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. बाप लेकाच्या या जोडीने चित्रपटातील अॅनिमेटेड प्राणी पात्रांना आवाज दिला आहे.
जंगलाचा राजा मुफासा असून तो जंगलातील प्रत्येकाचं रक्षण करतो. जंगलात सुख शांती नांदेल यासाठी मुफासा प्रयत्नशील असतो. मुफासाचा भाऊ स्कार त्याचा द्वेष करत असतो. मुफासाला हटवून आपणच जंगलाचा राजा बनावं अशी त्याची इच्छा असते. मात्र मुफासाचा लेक सिंबा मुफासाच्या गादीचा खरा वारसदार असतो. तोच मुफासाचा वारसा चालवणार हे सर्वश्रुत असतं. मुफासा आणि सिंबा या बाप-लेकाचं नातं गहिरं आहे. दोघांचं एकमेकांवर प्रेम आणि जीव आहे. मात्र एका अपघातात मुफासाचा मृत्यू होतो आणि सिंबाचं जीवन पालटतं. सिंबा मुफासाचा वारसदार बनतो का? स्कारने मुफासाला कट रचून मारलं का?, सिंबाच्या आयुष्यात कोण येतं? यासह विविध प्रश्नांची उत्तरं या चित्रपटात मिळतील.
चित्रपटाच्या हिंदी अवतारात मुफासाच्या पात्राला शाहरुखने आवाज दिला असून सिंबाच्या पात्राला शाहरुखचा लेक आर्यनने आवाज दिला आहे. शाहरुखने दिलेल्या आवाजामुळे मुफासाचं पात्र दमदार वाटतं. आर्यननं पहिल्यांदाच चित्रपटात आवाज दिला असून तो तितकाच भावनिक वाटतो. शाहरुख आणि आर्यन या बाप-लेकाच्या नात्यातील प्रेमळपणा, जिव्हाळा मुफासा आणि सिंबा पाहताना जाणवतो. मुफासा-सिंबाचे भावनिक दृश्यं प्रभावी वाटतात. सिंबाच्या वाट्याला बहुतांशी गंभीर आणि भावनिक दृश्यं आली आहेत.
मूळ चित्रपटाप्रमाणे या चित्रपटातही टिमॉन आणि पुंबाची पात्रं कथेत नवा जीव आणतात. दोघांची एंट्री चित्रपटाच्या कथेला मजेशीर तितकंच दमदार बनवतात. टिमॉनच्या पात्राला श्रेयस तळपदेनं तर पुंबाच्या पात्राला संजय मिश्राने आवाज दिला आहे. दोन्ही पात्रं पोट धरून हसवतात. स्कारच्या पात्राला आशीष विद्यार्थी यांनी तर जाजूच्या पात्राला असरानी यांनी आवाज दिला आहे. जाजूचे संवाद सुरुवातीपासूनच मनोरंजक आणि गंमतीशीर वाटतात.
चित्रपटाची खासियत व्हिज्युअल इफेक्ट आहे. प्राण्यांच्या प्रत्येक हरकती ज्या पद्धतीने सादर करण्यात आल्यात त्या प्रशंसनीय आहेत. चित्रपटाचं संगीत पात्रांच्या आवाजाला मिळतंजुळतं आहे. जिथे पात्राच्या चेहऱ्यावर हावभाव कमी वाटतात ती कसर चित्रपटाचं संगीत भरून काढतं. ''हकुना मटाटा'' हे रसिकांच्या ओठावर नक्कीच तरळत राहिल. कॉमिक्स बुक वाचलेल्यांसाठी हा चित्रपट तुम्हाला तुमच्या बालपणात नक्कीच घेऊन जाईल. आजच्या पिढीला म्हणजेच बच्चेकंपनीलाही हा चित्रपट नक्कीच भावेल.