रेणूका शहाणे एक खूप चांगली अभिनेत्री असण्यासोबतच खूप चांगली दिग्दर्शक आहे. तिने रिटा हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाला समीक्षकांनी डोक्यावर घेतले होते. आता त्रिभंग या चित्रपटाद्वारे रेणुकाने ती एक खूप चांगली दिग्दर्शिका असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. महिला सक्षमीकरणावर आधारित असलेल्या या चित्रपटात एका लेखिकेची कथा मांडण्यात आली आहे.
त्रिभंगमध्ये आपल्याला तीन पिढींमधील महिलांची कथा पाहायला मिळते. तिन्ही महिलांचे आयुष्य या चित्रपटात खूप चांगल्याप्रकारे मांडण्यात आले आहे. एक लेखिका आपल्या उतारवयात आपल्या आयुष्यातील सगळ्या घटना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे ठरवते. तरुणपणी तिच्या सासूने तिला प्रचंड छळले असते. तिच्या त्रासाला कंटाळून तिने घर सोडले आणि तिच्या लेखनप्रवासाला तिने सुरुवात केली. तर दुसऱ्या पिढीतील महिलेने अभिनय आणि नृत्यामध्ये करियर केले आहे तर तिसरी पिढी ही या दोन्ही पिढींपेक्षा अधिक समजूतदार असून तिला काय करायचे याची तिला चांगलीच जाणीव आहे. या तिन्ही महिलांचे जीवन दिग्दर्शिका रेणुका शहाणे यांनी खूपच चांगल्याप्रकारे मांडले आहे.
त्रिभंगची कथा प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवते. तसेच या चित्रपटाचे संवाद देखील मस्त जमून आले आहे. केवळ या चित्रपटातील अनेक संवाद हे मराठीत आहे. त्यामुळे अमराठी प्रेक्षकांना चित्रपट पाहाताना सबटायटलचा आधार घ्यावा लागणार आहे. तसेच या चित्रपटात अनेक शिव्या आहेत. या चित्रपटात इतक्या शिव्या टाकण्याची खरंच गरज होती का असा प्रश्न नक्कीच पडतो आणि त्यातही काजोलच्या व्यक्तिरेखेने शिव्या देणे तसेच काजोलला सिगारेट पिताना दाखवणे हे गरजेचे होते का असे हा चित्रपट पाहाताना नक्कीच जाणवते.
काजोल, तन्वी आझमी आणि मिताली पालकर या तिघींनी त्रिभंग या चित्रपटात खूपच चांगला अभिनय केला आहे. या तिघींच्याही अभिनयाला द्यावी तितकी दाद कमी आहे. पण खरे श्रेय हे रेणुका शहाणेचे आहे. रेणुकाने या चित्रपटाची कथा खूपच चांगल्याप्रकारे लिहिली आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा तिने खूपच चांगल्याप्रकारे उभी केली आहे. एक दिग्दर्शक म्हणून तिला प्रत्येक फ्रेममध्ये काय पाहिजे याचा तिने चांगलाच अभ्यास केलेला आहे.