Join us

वेगळ्या वाटेवरचा आश्वासक प्रयत्न...!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2017 3:32 PM

चित्रपटातून लेखक व दिग्दर्शकाला नक्की काय सांगायचे आहे, ते पक्के असले की इतर अडथळेही सहज पार करता येतात; याचे आश्वासक उदाहरण म्हणून 'ओली की सुकी' या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल.

Release Date: May 26, 2017Language: मराठी
Cast: तेजश्री प्रधान, संजय कापरे, भार्गवी चिरमुले, शर्वरी लोखरे, सुहास शिरसाट, वर्षा उसगावकर, सुबोध भावे
Producer: वैभव जोशीDirector: आनंद गोखले
Duration: १ तास ३० मिनिटGenre:
लोकमत रेटिंग्स
राज चिंचणकरचित्रपटातून लेखक व दिग्दर्शकाला नक्की काय सांगायचे आहे, ते पक्के असले की इतर अडथळेही सहज पार करता येतात; याचे आश्वासक उदाहरण म्हणून 'ओली की सुकी' या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. एकाचवेळी सामाजिक संदेश द्यायचा, त्याचवेळी पठडीतली गोष्ट न निवडता, चाकोरीबाहेरचा दृष्टीकोन ठेवत, कसलाही अविर्भाव न आणता पडद्यावर चांगले ते देण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे हा चित्रपट आहे.  'वाया गेलेली मुले', असा शिक्का कपाळावर बसल्यावर त्या मुलांच्या भाळी फार काही चांगले येण्याची शक्यता अजिबातच नसते. पण समाजात अशाही काही व्यक्ती निरलस भावनेने कार्यरत असतात; ज्यांच्या लेखी अशा मुलांच्या भवितव्याचा प्रश्न सतत विचाराधीन असतो. एनजीओ चालवणारी राधिका झोपडपट्टीतल्या अशाच काही मुलांना आयुष्य सकारात्मकतेने जगण्याचे बळ पुरवत असते. 'रावडी गॅंग' म्हणून वस्तीत कुप्रसिद्ध असलेल्या मुलांच्या टोळीला वस्तीने ओवाळून टाकलेले असते. या टोळीतल्या हाडक्याची आई कर्करोगग्रस्त असते. लौकिकार्थाने वाया गेलेली ही गॅंग एका क्षणी मात्र तिच्या उपचारासाठी कष्ट करून पैसे जमवण्याचा निश्चय करते. यातून या मुलांमध्ये वेगळीच जिद्द निर्माण होते. चुकीच्या वाटेवर गेलेल्या मुलांनाही सुधारण्याची संधी मिळायला हवी, हा या चित्रपटाचा गाभा आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शकीय जबाबदारी पेलणारे आनंद गोखले यांनी ही गोष्ट अतिशय संवेदनशीलतेने सादर केली आहे. अशा मुलांच्या व्यथा मांडताना त्यांनी केलेला अभ्यास लक्षात येतो. झोपड्पट्टीतले मुलांचे जीवन चित्रित करतानाही त्यांनी या मुलांचे वसतीस्थान म्हणून एका जुनाट, पण रंगीतसंगीत अशा ट्रकचा वापर करून घेत कलासंगती साधली आहे. मात्र या कथेचा आवाका फारच छोटा आहे आणि तो वाढवताना कसरत करावी लागल्याचे स्पष्ट होत जाते. योगेश राजगुरू यांचा कॅमेरा चित्रपटभर चांगला फिरला आहे. संकेत राजगुरू यांचे संकलनही उत्तम आहे. या चित्रपटात चिन्मय संत (हाडक्या), अदिती देवळणकर (मोगरा), प्रथमेश शिवले (नॅनो), क्षितीज कुलकर्णी (बालक), रितेश तिवारी (टोपली), अथर्व बागेवाडी (टिपऱ्या), रोहन शेडगे (बाटा), अरुण गावडे (गोवा) अशी 'वाया गेलेल्या मुलांची' टीम जमली आहे आणि त्यांनी तो धागा योग्यरित्या पकडत फूल टू टपोरेगिरी केली आहे. तेजश्री प्रधानला राधिकाच्या भूमिकेत फार काही करण्यास वाव नसला, तरी काही प्रसंगांत ती छाप पाडून जाते. भार्गवी चिरमुले, संजय खापरे, शर्वरी लोहोकरे यांच्या छोट्याश्या भूमिकाही लक्षात राहतात. एक वेगळी वाट चोखाळत केलेला आश्वासक प्रयत्न म्हंणून हा चित्रपट लक्षात राहू शकेल.