आपल्या आसपास मारामारी, भांडणं, रक्तपात अशा गोष्टी घडत नसतात. सर्वसामान्य माणसाच्या घराशेजारी राहणारी माणसंही त्यांच्यासारखीच साधीसुधी असतात. उगाच भांडणतंटा नाही, रुसवेफुगवे नाही. कधी एखादी खुसपटं किंवा चुगली शेजारीपाजारी करतीलही पण त्यांच्या मनात कायम प्रेम लपलेलं असतं. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की, प्रत्येकाच्या घरातली प्रमुख व्यक्ती म्हणजे बाप! एरवी 'बाप' हा अबोल राहून घरातली प्रत्येक गोष्ट न्याहाळत असतो. पण जेव्हा त्याचा दडलेला आक्रोश बाहेर येतो तेव्हा बापाच्या डोळ्यात डोळे घालण्याची हिंमत होणार नाही. आता मी सांगितलेल्या पहिल्या अन् दुसऱ्या गोष्टीचा परस्परसंबंध नाही. पण या दोन गोष्टींची जाणीव 'गुल्लक 4' पाहून झाली. पुन्हा एकदा मिश्रा परिवारातील नवीन किस्से अन् गोष्टी भेटीला आल्या आहेत.
कथानक:
ज्यांना 'गुल्लक' माहितीय त्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. पण ज्यांना 'गुल्लक'विषयी काहीच कल्पना नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगायचं तर.. या वेबसिरीजमध्ये मिश्रा कुटुंबाची गोष्ट दिसते. संतोष मिश्रा (वडील), शांती मिश्रा (आई), अन्नू मिश्रा (मोठा मुलगा), अमन मिश्रा (शेंडेफळ) या चौघांचं कुटुंब. आजवर झालेल्या तिन्ही सीझनमध्ये प्रत्येकी पाच एपिसोड दिसतात. या पाच भागांमध्ये वेगवेगळे किस्से दिसतात. या गोष्टींमध्ये कॉमन फॅक्टर आहे तो म्हणजे घरातला गुल्लक. सध्याच्या काळात गुल्लकला 'पिगी बँक' हा पर्यायी शब्द झालाय. गुल्लकच्या नजरेतून आपल्याला मिश्रा कुटुंबाशी निगडीत पाच वेगवेगळे किस्से दिसतात. 'गुल्लक 4'मध्येही असेच पाच वेगवेगळे किस्से पाहायला मिळतात.
'गुल्लक 4' मध्ये दिसतं की, अन्नू आता घरातला जबाबदार मुलगा झाला असून जॉब करतोय. वडील संतोष मिश्रा कुटुंबाचा डोलारा सांभाळत आहेत. अमन दहावी पास झाल्यावर पौगंडावस्थेत पदार्पण करतोय. त्याचं राहणीमान बदललं आहे. त्यामुळे सर्वांना त्याच्या वागण्याबद्दल चिंता सतावतेय. सर्वात शेवटी येते कुटुंबातील आई शांती. आईला सर्वांचीच काळजी असते. यंदाच्या मिश्रा कुटुंबातील किस्से भावूक करणारे आहेत. हे किस्से सर्वसामान्य माणसांच्या रोजच्या जीवनाशी लागू असल्याने जास्त भिडणारे आहेत. विशेषतः 'गुल्लक 4' चा शेवटचा एपिसोड डोळ्यात पाणी आणणारा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 'गुल्लक'चा अनुभव संस्मरणीय आहे.
दिग्दर्शन:
श्रेयांश पांडे यांनी 'गुल्लक 4' चं दिग्दर्शन केलंय. TVF ने 'गुल्लक'ची निर्मिती केलीय. सध्या गाजत असलेली 'पंचायत 3' वेबसिरीज सुद्धा TVF ची आहे. TVF चे निर्माते कंटेंटच्या बाबतीत प्रेक्षकांना अजिबात निराश करत नाही. 'गुल्लक 4' सुद्धा लिखाणात तगडी असलेली वेबसिरीज आहे. त्यामुळे लिखाणात सशक्त असलेला कंटेंट जेव्हा ऑन कॅमेरा साकार होतो तेव्हा काहीतरी अद्भूत बघायला मिळतं. दिग्दर्शक आणि क्रिएटर श्रेयांश पांडे यांनीही चांगलं दिग्दर्शन केलंय. मिश्रा परिवाराशी प्रेक्षक पहिल्या फ्रेमपासून जोडले जातील याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतलीय. आवश्यक तिथे संगीताचा वापर केल्याने प्रसंग भिडण्यास मदत होते. याशिवाय मिश्रा कुटुंबाचं बदलणारं वातावरण अचूक हेरलं आहे. शेवटच्या एपिसोडमध्ये नेहमीप्रमाणे एक सुखद धक्का देण्याचं काम दिग्दर्शकाने केलंय.
अभिनय:
'गुल्लक 4' मध्ये आधीच्या सीझनप्रमाणे प्रमुख चार कलाकारांनी पुन्हा एकदा सहजसुंदर अभिनयाचं दर्शन घडवलंय. संतोष, शांती, अन्नू, अमन या चौकोनी कुटुंबामध्ये अनुक्रमे जमील खान, गीतांजली कुलकर्णी, वैभव राज गुप्ता, हर्ष मयर यांंचा अभिनय बघायला मिळतो. खऱ्या आयुष्यातही या चौघांचंच कुटुंब आहे असा भन्नाट अभिनय हे चारही कलाकार करतात. या सीझनमध्ये हर्षचा परिपक्व होणारा अभिनय पाहणं खास गोष्ट आहे. शेवटच्या एपिसोडमध्ये पिता-पुत्र अर्थात जमील आणि हर्ष यांनी सुरेख काम केलंय. मराठमोळ्या गीतांजली कुलकर्णी आईच्या भूमिकेत लक्षात राहतात. वैभवने सुद्धा आनंद उर्फ अन्नूचा स्वाभिमान उत्तम दाखवला आहे. सुनिता पवारही 'बिट्टू की मम्मी'च्या भूमिकेत खळखळून हसवतात. शिवांकीत परिहार पुन्हा एकदा गुल्लकच्या आवाजात छाप पाडतो.
अशाप्रकारे 'गुल्लक 4' मध्ये पुन्हा एकदा तुमच्या आमच्या घरातली गोष्ट पाहायला मिळते. ही गोष्ट हसवते, रडवते आणि अंतिमतः अंतर्मुख करते. सीरिजचा शेवट पाहून प्रत्येकाला आपल्या वडिलांना मिठी मारण्याची इच्छा होईल यात शंका नाही.