या चित्रपटाची कथा देशातील पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा जीवनप्रवास आणि देशासाठी केलेल्या कामगिरीची गाथा सांगणारा आहे. 'राझी' आणि 'छपाक'सारखे आशयघन चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या या चित्रपटाने खूप उत्सुकता वाढवली आहे. ट्रेलरने यात भर घातली आहे. विकी कौशलचा दमदार अभिनय हिच या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू ठरली आहे.
कथानक : सलामी देणाऱ्या एका सैनिकाला सॅम स्वत:चे नाव विचारताच तो थोडा गोंधळतो आणि त्याच्या तोंडून 'सॅम बहादूर' असं निघतं. तिथून फ्लॅशबॅकमध्ये सिनेमा सुरू होतो. सैनिकी प्रशिक्षण घेताना घडलेल्या एक-दोन किस्स्यांनंतर थेट देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या सॅम यांची विविध रुपं सिनेमात दिसतात. बर्मामध्ये जापानी सैनिकांचा पिच्छा पुरवताना छातीवर नऊ गोळ्या झेलत त्यांचे मृत्यूच्या दारातून परतणे, भारत-पाकिस्तान फाळणी, देशद्रोहाच्या आरोपांची चौकशी, बंगालमधील रेफ्युजींसाठी केलेले कार्य आणि राजकीय पटलावर बळी देण्यासाठी थेट पंतप्रधानांना 'मेरे सोल्जर्स नहीं दूंगा' असं ठणकावून सांगणारे सॅम यात आहेत.
लेखन-दिग्दर्शन : अपेक्षेनुसार पटकथा नसल्याने निराशा होते. चित्रपटातील काही संवाद दमदार आहेत, पण बोलीभाषेत पारसी लहेजाचा अभाव जाणवतो. युद्ध प्रसंगही तितकेसे प्रभावी नाहीत. केवळ विकीचा अभिनय आणि त्याने मुख्य व्यक्तिरेखा साकारण्यासाठी घेतलेली मेहनत अखेरपर्यंत खिळवून ठेवते. बऱ्याच कलाकारांचं कास्टिंग परफेक्ट वाटत नाही. पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, यशवंतराव चव्हाण या महत्त्वाच्या व्यक्तिरेखांसाठी कलाकारांची निवड मिसमॅच वाटते. गुलजार यांनी लिहिलेल्या गीतांवर शंकर-एहसान-लॉय यांनी सुमधूर संगीतसाज चढवला आहे. इतर बारीक-सारीक डिटेलिंगवर अत्यंत बारकाईने लक्ष देण्यात आलं आहे.
अभिनय : अभिनयासाठी १०० गुण मिळवणाऱ्या विकीने सॅम बहादूर यांच्या रूपात पारितोषिकांवर आपला दावा सिद्ध केला आहे. देहबोलीपासून संवादफेकीपर्यंत सर्वांगाने सॅम यांची व्यक्तिरेखा साकारताना चित्रपटात कुठेही विकी दिसत नाही, हेच त्याचे 'कौशल्य' आहे. सिल्लूच्या भूमिकेत सान्या मल्होत्राने रंगवलेली व्यक्तिरेखा लक्षात राहणारी आहे. इंदिरा गांधीच्या रूपात फातिमा सना शेखसारख्या अभिनेत्रीला वाया घालवलं आहे. पं. नेहरूंच्या भूमिकेत नीरज काबी अजिबात शोभत नाहीत. पटेलांच्या भूमिकेतील गोविंद नामदेव यांच्या बाबतीतही तेच घडलं आहे. मोहम्मद झीशान अयूब या हरहुन्नरी अभिनेत्याला छोट्या भूमिकेवर समाधान मानावं लागलं आहे.
सकारात्मक बाजू : अभिनय, गीत-संगीत, संवाद, वातावरणनिर्मिती
नकारात्मक बाजू : पटकथा, दिग्दर्शन, कलाकारांची निवड
थोडक्यात काय तर कितीही उणीवा असला तरी विकीच्या अभिनयासाठी आणि एका महान सैनिकाने देशासाठी केलेली कामगिरी जाणून घेण्यासाठी विशेषत: आजच्या पिढीतील रसिकांनी हा चित्रपट एकदा पाहायला हवा.