अजय परचुरे
एखादी स्त्री आपल्या घरासाठी दिवसभर राब राब राबत असते. घरावर कोणतंही संकट येऊ दे घरातील स्त्री त्याचा नेटाने मुकाबला करून त्यावर मात करते. मात्र आपण कधी या गोष्टीचा विचार केला का की त्या राबणाऱ्या स्त्रीचं नेमकं घर कोणतं ? त्या राबणाऱ्या घरात खरंच तिचं अस्तित्व पाहिलं जातं का ?तिला तिचं स्वातंत्र्य मिळतं का ? तिच्या अधिकारात नेमक्या कोणत्या गोष्टी असतात का ? आणि मुळात तिला जे करायचं आहे त्याची मोकळीक तिला मिळते का ? असे बरेच प्रश्न सध्याच्या काळात पुढे येतायत आणि त्यांना कोणतंही ठोस उत्तर कोणालाही सापडलेलं नाही. मात्र वेलकम होम मध्ये खूप सोप्या पध्दतीने त्या प्रश्नाची उकल मांडण्यात आली आहे. आणि ते ज्या पध्दतीने मांडण्यात आले आहेत त्याने सिनेमाला एक वेगळी उंची मिळाली आहे.
डॉ. सौदामिनी आचार्य (मृणाल कुलकर्णी) पुण्यात एका सुखवस्तू घरातील स्त्री आपल्या याच अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी, आपल्या हक्काच्या घराचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नवऱ्याच्या घरातून बाहेर पडते. आणि तडक आपल्या माहेरी येते. सौदामिनीचे आईवडिल अप्पासाहेब जोशी(डॉ.मोहन आगाशे) आणि विमल जोशी( उत्तरा बावकर) आणि सौदामिनीची लहान बहिण मधुमती (स्पृहा जोशी) तिच्या या निर्णयावर प्रश्नांची सरबत्ती न करता तिला समजून घेण्यावर जास्त भर देतात. सौदामिनी घर सोडताना आपल्या वृध्द सासूलाही ज्यांची मानसिक अवस्था बरी नाहीये तिलाही माहेरी घेऊन येतात. कारण त्यांना त्या अवस्थेत सांभाळण्यासाठी कोणीही नसतं आणि सौदामिनीचा नवरा तिच्याबरोबर भांडण झाल्याने कोणालाही न सांगता कुठेतरी निघून गेलेला असतो. त्याही परिस्थितीत सौदामिनी आपल्या सासूला म्हणजेच माईंना(सेवा चौहान) आणि आपल्या मुलीला कुकी(प्रांजली श्रीकांत) आपल्या घरचा आधार देतात. आणि त्यालाही माहेरच्या मंडळींची उत्तम साथ मिळते. सौदामिनीने घेतलेल्या या निर्णयावर तिचा लहानपणीचा मित्र सुरेश (सुमित राघवन) तिची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न करतो. मात्र आपल्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या सौदामिनीचा निर्णय ठाम असतो. आपण घेतलेल्या निर्णयाचे परिणाम काय होतील? हे आपण निभावून नेऊ ना ?आपल्या मुलीचं पुढचं आयुष्य घडवण्यासाठी काय काय करावं लागेल या प्रश्नांची उकल करत असण्याच्या दरम्यान तिला काही माणसं भेटतात . त्यातील काही घरातील नातेवाईक आणि काही घराबाहेरील असतात. त्यांच्या बोलण्यातून तिला तिचाच मार्ग सापडत जातो. आणि आपण घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य यावर तिचं मत बनतं. शेवटी सौदामिनीने आपल्या हक्कासाठीचा निर्णयात तिची माहेरची मंडळी ठाम उभी राहतात का ? तिला तिचं स्वतंत्र अस्तित्व मिळतं का ? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हा सिनेमा पाहणं नक्कीच गरजेचं आहे. सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लेखक ,दिग्दर्शक जोडीचा हा पुन्हा एकदा एक अप्रतिम सिनेमा आहे. मुळात या सिनेमाचा आत्मा म्हणजे या सिनेमाची कथा आणि सुमित्रा भावेंनी लिहीलेले संवाद आहेत. या सिनेमातून जी प्रश्नांची उकल होते त्यात कलाकारांच्या अभिनयाबरोबरच या संवादांचाही तितकाच समावेश आहे. ज्या संवादांनी सिनेमाला एका निराळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. अतिशय गंभीर विषय साध्या सोप्या भाषेत मांडण्यासाठी सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर यांना पैकीच्या पैकी गुण आहेत.
सिनेमातील मुख्य भूमिका अर्थात सौदामिनी( मृणाल कुलकर्णी) मृणालच्या आजपर्यंतच्या सिनेकारर्किर्दीतील एक अप्रतिम भूमिका तिने साकारली आहे. इतका मोठा निर्णय घेताना होणारी मानसिक स्थिती, घुसमट ,आपल्या लहान मुलीला ही गोष्ट समजावून सांगताना होणारी घालमेल ,आणि अश्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी असणारा आत्मविश्वास मृणालने आपल्या अभिनयातून अप्रतिमरित्या साकारली आहे. डॉ.मोहन आगाशे आणि उत्तरा बावकर यांनी सौदामिनीच्या आईवडिलांच्या भूमिकेत एक प्रकारची जान आणली आहे. आपल्या मुलीने घेतलेल्या निर्णयाकडे पाहण्याचा या दोघांचा दृष्टिकोन दोघांनी उत्तम साकारला आहे. सुमित राघवन हे रसायनच अजब आहे. आपल्या लहानपणीच्या मैत्रिणीने घेतलेल्या निर्णयात तिला समजून घेणारा सुरेश सुमितने उत्तम रंगवला आहे. स्पृहा जोशीने सौदामिनिच्या बहिणीच्या भूमिकेत खूप प्रभाव पाडला आहे. माईंच्या भूमिकेतील सेवा चौहान विशेष लक्षात राहतात. सिध्दार्थ मेनन,सारंग साठे, दीपा श्रीराम,प्रांजली श्रीकांत यांनी आपल्या लहानश्या भूमिकेतही उत्तम रंग भरले आहेत. सिनेमाचं संगीतही श्रवणीय आहे. पार्थ उमराणी या संगीतकाराने या खुदा,राधे राधे , चार भिंती,किर्रर्र रान ही अतिशय श्रवणीय गाणी या सिनेमाला दिली आहेत. आपल्या अस्तित्वाचा ,घराचा ठाव घ्यायचा असेल तर हा सिनेमा पाहायलाच हवा