या चित्रपटात दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या हवाई दलातील फायटर्सचे थरारक जीवन दाखवले आहे. वेळप्रसंगी सीमारेषा ओलांडून शत्रूला घरात घुसून कंठस्नान घालण्याची प्रचंड शक्ती असलेल्या देशातील खऱ्याखुऱ्या नायकांच्या कार्याला दिलेली जणू ही मानवंदनाच आहे. हा सिनेमा ॲक्शन-इमोशनचा थरारक अनुभव देतो.
कथानक : अतिरेकी कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी देशातील सर्वोत्तम कॅाम्बॅट एव्हीएशन्सची क्विक रिस्पॉन्स टीम बनवली जाते. यात शमशेर पठाणिया 'पॅटी', मीनल राठोड 'मिनी', सरताज गिल 'ताज', बशीर खान 'बॅश' आदींचा समावेश असतो. राकेश जय 'रॅाकी' यांचा ग्रुप कॅप्टन असतो. या टिमला ट्रेनिंग देण्याचं काम सुरू असताना पुलवामा येथे जवानांच्या गाडीवर अतिरेकी हल्ला होतो. त्यानंतर सर्जिकल स्ट्राईकच्या अपेक्षेत असणाऱ्या पाकिस्तानला बालाकोट येथे एअर स्ट्राईक करत सडेतोड उत्तर दिलं जातं. त्यानंतर बरंच काही घडतं.
लेखन-दिग्दर्शन : भारतीय हवाई दलावर सिनेमा बनवण्याची संकल्पना वाखाणण्याजोगी असली तरी आव्हानात्मक होती. पटकथेत वैमानिकांचं जीवन, मुलीचा वैमानिक बनण्यासाठी संघर्ष, वैयक्तीक आकसापोटी वरिष्ठांकडून घेतले जाणारे निर्णय, हवाई दलाची शिस्त, देशभक्तीची भावना, जय हिंदचा अर्थ असं बरंच काही आहे. 'उन्हें दिखाना पडेगा बाप कौन है', 'फरक हम पैदा करते है', 'रूल से ज्यादा जरुरी जीत है', 'पीओके तुमने आॅक्युपाय किया है, मालिक हम है' हे संवाद देशभक्तीची भावना जागवत टाळ्या-शिट्ट्या मिळवतात, तर 'आज मेरी बेटीने मेरे बाप को हरा दिया' हा संवाद भावूक करतो. 'तिरंगे से खूबसुरत कफन नहीं होता' हा शेर अफलातून आहे. मिनीचे आई-वडील भेटल्यावर पॅटी जे सांगतो आणि त्यानंतर मिनीचे आई-वडील येऊन तिला भेटतात हे दोन्ही सीन्स हृदयस्पर्शी झाले आहेत. 'मेरी हिर आस्मानी', 'तेरा कर्ज चुकाया है, वंदे मातरम...' हि गाणी श्रवणीय आहेत. 'इश्क थोडा थोडा दोनों जगह...' हे गाणं कापलं आहे. हवेत असताना भारत-पाकिस्तानचे पायलट एकमेकांशी बोलतात हे पटत नाही.
अभिनय : सर्वच कलाकारांनी आपली निवड सार्थ ठरवली आहे. युद्धभूमीत आक्रमक, तर वरिष्ठांसमोर संयमी व्यक्तिरेखा ऋतिक रोशनने सुरेखपणे साकारली आहे. दीपिका पदुकोणने स्त्री वैमानिकाच्या भूमिकेत जीव ओतला आहे. मर्यादा न ओलांडणारी ऋतिक-दीपिकाची केमिस्ट्रीही आहे. अनिल कपूरने पुन्हा एकदा जबरदस्त अभिनय केला आहे. करण सिंग ग्रोव्हरने महत्त्वपूर्ण भूमिका पूर्ण ताकदीनिशी साकारली आहे. आशुतोष राणांची भूमिका लांबीने कमी असली तरी एका संवादाच्या बळावर त्यांनी बाजी मारली आहे.
सकारात्मक बाजू : लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संवाद, वातावरणनिर्मिती, सिनेमॅटोग्राफी
नकारात्मक बाजू : व्यत्यय आणणारा मध्यंतराचा केंद्रबिंदू, तांत्रिक उणीवा
थोडक्यात काय तर यात एअर ॲक्शनचा थरार रोमांचक आहे. अतिरेक्यांच्या हल्ल्यावर भारताची रिॲक्शन पाहण्याजोगी असल्याने एकदा तरी हा चित्रपट पाहायला हवा.