Join us

‘तुम बिन2’: जुन्याची सर नव्याला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2016 5:38 PM

तुम बिन सिनेमा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरला होता. त्याच धर्तीवर आता तुम बिन 2 हा सिक्वेल रसिकांच्या भेटीला येतोय.

Release Date: November 18, 2016Language: हिंदी
Cast: नेहा शर्मा, आदित्य सील, आशिम गुलाटी
Producer: भुषण कुमार, कृष्ण कुमार, अनुभव सिन्हाDirector: अनुभव सिन्हा
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
सन २००१ मध्ये अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शित केलेला ‘तुम बिन’ हा चित्रपट आणला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. विशेषत: यातील गाणी लोकांनी डोक्यावर घेतली होती. आज तब्बल १५ वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वल अर्थात ्न‘तुम बिन2’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.‘तुम बिन2’ची कथा सुरु होते ती स्कॉटलंडमध्ये. एका स्कीर्इंग अ‍ॅक्टिडेंटनंतर तरण(नेहा शर्मा)हिचा होणारा पती अमर (आशिम गुलाटी) अचानक बेपत्ता होतो. अपघातात त्याचा मृत्यू झाला, असेच सगळे समजतात. या धक्क्याने तरण तुटून पडते. पण तरणच्या बहिणी आणि अमरचे वडिल (कवलजीत) तरणला एक नवे आयुष्य सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करतात. अपघाताच्या जवळपास आठ महिन्यानंतर तरण या सर्वांच्या मदतीने नवे आयुष्य सुरु करू पाहते. पण अमरसोबत घालवलेला प्रत्येक क्षण तिचा पिच्छा पुरवतो. ती अमरला जितके विसरण्याचा प्रयत्न करते, तितका तो तिच्यासमोर येतो. याचदरम्यान चित्रपटात शेखरची(आदित्य सील) एन्ट्री होते.  तरण व शेखरची नजरानजर होते आणि  शेखरचा सहवास तिला हवाहवासा वाटू लागतो. दोघांमध्येही प्रेम फुलत असतानाच अमर जिवंत असल्याचे तरणला कळते. याच वळणावरून तरणची कथा पुढे सरकते आणि एका अतिशय सामान्य अशा क्लायमॅक्ससह संपते. हा क्लायमॅक्स पाहताना ‘सलामी’ आणि शाहरूख खानचा ‘दिवाना’हे चित्रपट हटकून आठवतात.  २ तास २७ मिनिटांच्या या सीक्वलमध्ये ‘तुम बिन’ सारखी कथा, गाणी, रोमान्स असा सगळा मसाला आहे. पण आजच्या ‘२०-२०’च्या जमान्यात  २ तास २७ मिनिटांचा हा चित्रपट ‘५० ओव्हरच्या क्रिकेट मॅच’ सारखा वाटतो. पाकिस्तानी मुलाचा फर्स्ट हाफमधील सीक्वेंस आणि काही गाणी चित्रपटात जबरदस्तीन कोंबली असल्याचा फिल देतात.  सिनेमा पाहतांना हा ‘तुम बिन’चा सीक्वल आहे, असे वाटत असले तरी पडद्यावरची कथा अतिशय जुनी वाटते. चित्रपट सुरु होताच तिसºया मिनिटालाच गाणे सुरु होते आणि एकापाठोपाठ एक अशा गाण्यांनी चित्रपट उगाच लांबत जातो. चित्रपटातील ‘तेरी फरियाद’सारखी गझल व काही गाणी निश्चितपणे चांगली आहेत. पण गरज नसताना टाकलेली काही गाणी निश्चितपणे  खटकतात. तेवढाच नेहा शर्मा, आशिम आणि आदित्य यांचा सुमार अभिनयही मनाला खटकतो. चित्रपटात स्कॉटलंडचे सौंदर्य अप्रतीमरित्या पडद्यावर दर्शवले गेले आहे. पण ‘तुम बिन’ आणि  ‘तुम बिन२’मध्ये १५ वर्षांचे अंतर आहे, हेच कदाचित दिग्दर्शक अनुभव सिन्हा विसरले आहेत. आणखी एडिटींग झाली असती तर कदाचित हा सीक्वलही ‘तुम बिन’ इतका रंगला असता. एकंदर काय तर आधीचा ‘तुम बिन’पाहून तुम्ही हा सीक्वल पाहायला जाणार असाल तर तुमच्या हाती निराशाच लागेल. पण हलकं फुलकं काही पाहण्याची इच्छा असेल तर तुम्ही ‘तुम बिन2’ एकदा बघू शकता.