सरोगसी या विषयाकडे आपल्याकडे फार गांभीर्याने पाहिले जात नाही. मूल होत नाही, म्हणून सरोगसी करायची, असे एखाद्या जोडप्याने म्हटल्यास घरातील वडीलधारी मंडळींचा कायमच विरोध असतो. सरोगसीबद्दल असलेले समज-गैरसमज दूर करण्यासाठी ‘करार’ हा चित्रपट येत आहे. या चित्रपटात आपल्याला क्रांती रेडकर, सुबोध भावे आणि उर्मिला कोठारे पाहायला मिळणार आहेत. क्रांती आणि सुबोधची जोडी या आधी आपल्याला ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’ या चित्रपटात पाहायला मिळाली होती. या चित्रपटातील भूमिकेबद्दल क्रांतीने सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत ती सांगते, ‘‘करार’ या चित्रपटात मी अत्यंत वेगळ्या भूमिकेमध्ये आहे. सरोगसी या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. सरोगसीबद्दल आपल्याकडे फारच गैरसमज असतात. अनेक वेळा कुटुंब, समाज या गोष्टीला स्वीकारत नाही. त्यामुळे सरोगसी म्हणजे नेमके काय? सरोगसीचे फायदे आणि तोटे काय असतात, या सर्वच गोष्टींवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.’ सुबोध-क्रांती आणि उर्मिला हे तिघे पहिल्यांदाच आपल्याला या चित्रपटाद्वारे एकत्र पाहायला मिळणार आहेत.